श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
प्रपत्ती : संपूर्ण शरणागतीचे तत्त्वज्ञान
भक्ती, तत्त्वज्ञान आणि कृपायोगाचा दिव्य संगम
प्रस्तावना : अहंकारापासून अनंताकडे
मानवी जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात एक असा टप्पा येतो की जिथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवते. त्याच्या अध्यात्मप्रवासात एक क्षण असा येतो की प्रयत्नांची शिडी संपते आणि कृपेचे आकाश सुरू होते.
ज्ञान, कर्म, साधना, तपस्या — या सर्व मार्गांनी प्रयत्न करताना अखेरीस मनाला उमगते की अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी अहंकाराचा सर्वस्वी त्याग आणि परमेश्वरावर संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे. याच अवस्थेला भारतीय ‘ विशिष्ठाद्वैत तत्वज्ञान’ परंपरेत “प्रपत्ती” असे म्हणतात.
संस्कृतमधील “प्र + पत्” या धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द पूर्णपणे शरण जाणे, स्वतःला अर्पण करणे असा अर्थ व्यक्त करतो.
भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध वचन या तत्त्वज्ञानाचे सार सांगते —
“सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥”
(भगवद्गीता १८. ६६)
या एका श्लोकात प्रपत्तीचा संपूर्ण आध्यात्मिक अर्थ सामावलेला आहे.
१. प्रपत्ती : तात्त्विक संकल्पना
प्रपत्ती म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे.
भक्तीमार्गात ही अवस्था तेव्हा येते जेव्हा साधकाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. त्या क्षणी तो म्हणतो —
“मी नाही; सर्व काही तूच. ”
या भावनेचे वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, “आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥” माणूस स्वतः काही करीत नाही; करणारा खरा परमेश्वरच आहे.
२. रामानुजाचार्य आणि प्रपत्तीचा मार्ग
आचार्य रामानुज (१०१७–११३७) यांनी प्रतिपादित केलेल्या विशिष्टाद्वैत वेदान्तात प्रपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
त्यांच्या मते जीव आणि परमेश्वर यांचे नाते शेष–शेषी असे आहे —
जीव हा परमेश्वरावर अवलंबून असलेला अंश आहे.
रामानुजाचार्यांच्या “शरणागति गद्य” या ग्रंथात ते परमेश्वराला विनवतात —
“नारायण! तव पादारविन्दयोः शरणं प्रपद्ये।”
ही केवळ प्रार्थना नसून पूर्ण आत्मसमर्पणाची अनुभूती आहे.
३. प्रपत्तीची सहा अंगें
या परंपरेत शरणागतीची सहा लक्षणे सांगितली आहेत —
“अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।
रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्ववरणं तथा ।
आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ॥”
या सहा अंगांमध्ये प्रपत्तीचे संपूर्ण स्वरूप दिसते.
अनुकूलस्य संकल्पः — ईश्वराला अनुकूल तेच आचरण करणे
प्रतिकूलस्य वर्जनम् — प्रतिकूल गोष्टींचा त्याग
रक्षिष्यतीति विश्वासः — परमेश्वर रक्षण करील हा दृढ विश्वास
गोप्तृत्ववरणम् — त्यालाच पालनकर्ता मानणे
आत्मनिक्षेपः — पूर्ण आत्मसमर्पण
कार्पण्यम् — स्वतःची दीनता स्वीकारणे
४. भक्तिमार्गी संतपरंपरेतील प्रपत्ती
संतपरंपरेत प्रपत्तीचा भाव अत्यंत सजीवपणे व्यक्त झाला आहे. दासबोधात समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
“आपण मिथ्या साचा देव । देव भक्त अनन्यभाव ।… या नाव आत्मनिवेदन ॥”
(४. ९. २२)
रामरायाकडे समर्थ मागणे काय मागतात पहा, “मजविण तू मज दे रे राम! “
मीराबाईंचं ईश्वराशी हे एकरूप होणं पहा…
“लाली मेरे लालकी जिथ देखूं तिथं लाल
लाली देखन मै गयी, मै ही होगई लाल! “
तुकाराम महाराज म्हणतात,
“घालुनिया भार राहिलो निश्चिंती ।
……….
खुंटले सायास आणिक या जीवां ।
धरिले केशवा पाय तुझे ॥
तुज वाटे आता करी रे अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी ॥”
संत एकनाथ महाराज म्हणतात,
” अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥
माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ ।
अनाथांचा नाथ जनार्दन ॥
एका जनार्दनी एकपणे उभा ।
चैतन्याची शोभा शोभतसे ॥ “
५. प्रपत्ती आणि कृपायोग
प्रपत्तीचा मार्ग हा केवळ साधकाच्या प्रयत्नांवर आधारित नाही; तो ईश्वरकृपेवर आधारित आहे. भक्त सतत प्रेमपूर्वक भजन करतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला मार्ग दाखवतो.
श्रीवैष्णव तत्त्वज्ञानात मोक्ष हा केवळ साधकाच्या साधनेचा परिणाम नसून परमेश्वराच्या निरपेक्ष कृपेचा प्रसाद मानला जातो. प्रपत्ती म्हणजे त्या कृपेचे द्वार उघडणारी अंतःकरणाची अवस्था होय.
६. प्रपत्तीचे आध्यात्मिक सौंदर्य
प्रपत्ती म्हणजे पलायन नव्हे; ती आहे अहंकारावर मात करून अनंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया.
जेव्हा भक्त म्हणतो —
“मी तुझा आहे; तूच माझे सर्वस्व आहेस. ”
तेव्हा त्या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील भेद विरघळतो, द्वैत विरते!
७. आत्मनिवेदन आणि प्रपत्ती
नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन’ आणि रामानुजाचार्यांची ‘प्रपत्ती’ हे दोन्ही पूर्ण शरणागतीचे सिद्धांत आहेत, पण त्यांची तात्त्विक चौकट, रचना आणि पायऱ्यांमध्ये स्पष्ट भेद आहे.
आत्मनिवेदनची व्याख्या:
नवविधा भक्ती ही भगवद्गीतेच्या भक्तियोगावर आधारित नऊ पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्यात नववी पायरी ‘आत्मनिवेदन’ आहे. यात भक्त स्वतःचा देह, मन, धन, कर्तृत्व आणि फळ—सर्वस्व भगवंताला समर्पित करतो, “मी तुझाच” ही श्रद्धा दृढ पणे अंतःकरणात बाळगतो. यात ईश्वरावर संपूर्ण विश्वास आणि स्वातंत्र्य-अहंकाराचा पूर्ण त्याग करून वाट्याला आलेल्या सुख-दुःखाला त्याचीच इच्छा मानणे हे मुख्य आहे.
प्रपत्तीची व्याख्या:
रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांतात प्रपत्ती ही शरणागतीची प्रक्रिया आहे, जी कर्म-ज्ञान-भक्तींपेक्षा थेट परमेश्वरकृपेवर अवलंबून आहे. यात वर उल्लेखिलेली सहा अंगे आहेत: अनुकूल कर्मांचा संकल्प, प्रतिकूलांचा त्याग, रक्षकत्वाचा विश्वास, गोप्तृत्वस्वीकार, कार्पण्य (असहाय्यता) आणि आत्मनिक्षेप (आत्मार्पण). ही संरचित, शास्त्रोक्त पद्धत मोक्षासाठी एकमेव साधन मानली जाते
साम्याचे मुद्दे:
दोन्ही सिद्धांतांचा केंद्रबिंदू “पूर्ण समर्पण” हा आहे—अहंकारत्याग, ईश्वरकेंद्रित जीवन, कृपेवरील अवलंबन आणि स्वतःचे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण. भावार्थाने ही एकाच अध्यात्मिक सत्याची दोन रूपे दिसतात.
भेदाचे मुद्दे:
भावतत्त्वाने दोन्ही जवळजवळ समान आहेत, पण शास्त्रीय रचना, परंपरा आणि तात्त्विक चौकटीमुळे हे वेगळे सिद्धांत मानले जातात. त्यांना एकच म्हणता येत नाही.
८. उपसंहार : समर्पणातच अनंत
मानवी जीवनात ज्ञान, साधना, तपस्या आणि कर्म यांना महत्त्व आहे. परंतु या सर्व प्रयत्नांचा अंतिम अर्थ तेव्हाच उमगतो जेव्हा साधकाला समर्पणाची अनुभूती प्राप्त होते.
प्रपत्ती म्हणजे प्रयत्नांचा पराभव नव्हे;
ती आहे अहंकारावरचा विजय होय.
भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा ही जाणीव उमलते —
“देवा, मी तुझा आहे. ”
तेव्हा परमेश्वरही जणू त्याला अश्वासक उत्तर देतो —
“हो, तू माझाच आहेस.”
अशा या दिव्य संवादातच भक्तीचा परमोच्च क्षण जन्म घेतो.
आणि त्या क्षणी साधकाला उमगते —
समर्पणातच स्वातंत्र्य आहे,
आणि शरणागतीतच मोक्ष आहे!
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




