श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “उत्तर वाहिनी परिक्रमा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
एखादी गोष्टी का करायची? या प्रश्नाचे उत्तर ती गोष्ट करायची हेच असतं. मग ही गोष्टी आपण आपली करायची, कोणीतरी विचारलं म्हणून, सोबत मिळते म्हणून, भावना, श्रध्दा, नवीन अनुभव, गंमत, स्वार्थ आणि सोबत परमार्थ अशा अनेक गोष्टींची सांगड या उत्तरात असते. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करायची का? याचं उत्तर वरच्या सगळ्या गोष्टींचा एकत्र घेतलेला निर्णय होता. माझ्या बाबतीत निर्णय माझा नसतोच, तर याला बरोबर घ्यायचं का हाच निर्णय समोरच्याला घ्यावा लागतो. आणि असाच निर्णय मागच्या दोन तीन ट्रिपचा माझ्याबद्दल त्यांना अनुभव असूनसुध्दा त्यांनी घेतला होता. आता मला बरोबर का घेतलं याचं उत्तर, आणि उत्तर वाहिनी परिक्रमा मला सोबत घेत, कशी व्यवस्थित पार पाडायची याचं उत्तर त्यांना द्यायचं होत. त्यामुळेच उत्तर वाहिनी परिक्रमा करायची का? हा प्रश्न माझ्या बाबतीत निकाली निघाला होता. मला सोबत घेणं आणि सोबत परत आणण हिच इतरांच्या बाबतीत परिक्रमा असते.
तर नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करायचं ठरलं. मराठी चैत्र महिन्यात हि परिक्रमा सुरु होते, आणि फक्त महिनाभरच असते. गुजरात येथील तिलकवाडा इथून वासुदेव कुटीर आश्रमात संकल्प करून यात्रा सुरु करावी अस ठरलं. साधारणपणे तिथूनच सुरु करतात. गरुडेश्वरजवळील रामपुरा ते तिलकवाडा या भागात नर्मदा उत्तरेकडे वाहते, म्हणून उत्तर वाहिनी परिक्रमा. उत्तरवाहिनी भागात परिक्रमा करणे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते. साधारण एकवीस किलोमीटर इतका परिक्रमा मार्ग आहे.
खरतर मला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तेव्हाच मी सोडून सगळ्यांनी संकल्प केला होता. आणि यांनी संकल्प केल्यामुळे माझा झाला होता. पण तो माझ्या बाबतीत होता. धार्मिक बाबतीत हा संकल्प तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात केला. आमचा मुक्काम गरुडेश्वर या ठिकाणी होता. आणि तिलकवाडा इथून वासुदेव कुटीर आश्रम येथून सकाळी पाच वाजता परिक्रमा सुरु करायची म्हंटल तर आम्हाला पहाटे तीन साडेतीन वाजता गरुडेश्वर सोडणे आवश्यक होते. आम्ही तसे जमवले सुध्दा. यासाठी रात्री दोन वाजताच सगळे उठले होते. हो सगळे, कारण आम्ही जवळपास पंधरा, सोळा जणं होतो. आणि सोळा लोकं इतक्या सकाळी सर्व आटोपून तयार होणं हाच एक सोहळा असतो. पण आम्ही तो पार पाडला.
ठरल्याप्रमाणे वासुदेव कुटीर आश्रमात संकल्प करून बरोबर पाच सव्वा पाचला नर्मदे हर च्या गजरात परिक्रमा सुरु केली. याच मंदिराच्या बाजूला एक हनुमान मंदिरपण आहे. हा मारुतीराया रामदास स्वामींंनी स्थापन केलेल्या पैकी एक आहे. पहाटे पाचच्या अगोदर विधीवत संकल्प सांगायला आश्रमात गुरुजी होते. त्यांच्याशी बोलतांना समजले परिक्रमेला जाणाऱ्या भक्तांना संकल्प सांगण्यासाठी रात्रभर ते आश्रमातच होते. म्हणजे आम्ही झोप घेऊन परिक्रमा करायला निघालो तेव्हा ते निद्राधीन होण्यासाठी निघणार होते.
सुरुवातीचा काही रस्ता गावातूनच होता. परिक्रमा मार्ग असे फलक जागोजागी आढळले. पण आगोदर हीच परिक्रमा केलेले दोन चार जणं आमच्यात असल्याने ते आमचे विदाऊट इंटरनेट लाईव्ह गुगल मॅप होते. पहाटे सुध्दा आमच्या पुढे आणि मागेही बरेच चालणारे दिसले.
गावातला रस्ता संपल्यानंतर शेतातून जाणारा कच्चा असलातरी चांगला रस्ता होता. पहाटेची वेळ, थंड वातावरण, आजूबाजूला केळीची शेती, आजुबाजूला रस्त्यावर दिसेल इतका प्रकाश टाकणारे लाईट होते. जे लाईट प्रखर प्रकाश देत होते. शिवाय रस्त्यावर सेवाभावाने चहा देणारे बरेच तसच पैसे घेऊन खाद्यपदार्थ चहा, बिस्किट, चाॅकलेट, थंड पेय विकणारेही बरेच होते. आम्ही सेेवाभावी मंडळींनी दिलेला चहा घेऊनच निघालो होतो. व सकाळची साडेपाच सहाची वेळ असल्याने थंड पेय विकत घेण्याचा आमचा प्रतिसाद पण थंडच होता.
पुढे एका शंकराच्या मंदिरात परत चहा, खायला काही, शिवाय थंडगार नाही पण गार असणारं ताक अस मुबलक प्रमाणात आग्रह करुन घ्या म्हणणारे होते. इथे थंड ताकाचा आस्वाद घेत पुढे सरकलो. ताक काय, लस्सीच होती. आणि… माझ्यासारख्याला अवघड वाटणारा एक सिमेंटचा जिना आला. मला उतरायला थोड अवघडच गेलं, पण सोबतची मंडळी, त्यांनी दोन्ही हाताला धरून दिलेला आधार, यामुळे तो जिना उतरण्यात यशस्वी झालो आणि पुढे पाय टाकायला सुरुवात केली. मनात म्हंटल जीना इसीका नाम है। यात जगणं म्हणजे जीना, आणि सिमेंटचा जिना यांचा संगम होता.
हा जिना उतरून आता आमची वाटचाल नर्मदेच्या बाजूने, आणि तिच्या साक्षीने सुरु झाली. आता बरोबर चालणारे आम्ही मागेपुढे व्हायला लागलो होतो. माझा स्पीड कमी पडत होता, कोणाला तरी माझ्या सोबत सतत रहाव लागत होत. मला बसण्याऊठण्याचा त्रास असल्याने जमेल तस, जमेल तिथे, जमेल तेवढावेळ बुड टेकवत मी परिक्रमेत माझं बुड टिकून राहिल याची काळजी घेत होतो. तर पुढे गेलेले काही माझी वाट पाहण्यात आपलं बुड टेकवून घेत होते.
नर्मदा नदी आणि मगर यांच एक अतूट नातं आहे. नर्मदेच वाहन मगर आहे, आणि अशी परिक्रमा करतांना मगर दिसली तर परिक्रमा पावते अस कोणीतरी म्हणालं. मग काय? आमची नजर पाण्यात कुठे मगर दिसते का? यावरच. एरवी मगर म्हंटली कि बुडबुडे येणारा मी आज पाण्यावर बुडबुडे दिसले तरी त्यात मगर शोधायचा प्रयत्न करायला लागलो. मगर वो मगर नजर आयीच नही.
आता किती अंतर झालं असेल, अजून किती अंतर चालायचं आहे? जमेल का आपल्याला? या विचारात असतानाच या किनाऱ्यावरुन त्या किनाऱ्यावर माणसांना घेऊन जाणाऱ्या बोटी जवळच दिसायला लागल्या. मग काय? माझ्या बोटी बोटीत परत एक ऊर्जा निर्माण झाली. आणि पावलं थोडी भराभर पडायला लागली. पण तरीही ती इतरांपेक्षा सावकाश आणि मागेच होती.
पण हा उत्साह जेवढ्या लवकर आला तेवढ्याच लवकर मावळला. खरतर आता सुर्य वरवर सरकायला सुरुवात झाली होती. पण माझा मावळत चालला होता. कारण बोटीपर्यंत जायला नर्मदेच्या कोरड्या पात्रातून चालत जावं लागणार होत. आणि पात्रातले ते गोटे वरवर दिसायला चांगले वाटत असले तरी त्या नर्मदेच्या गोट्यांवरुन पायी लवकर चालणं वाटलं तितकं सोप्प नव्हत. त्याचा त्रास व्हायला लागला होता. पण यामुळेच नर्मदेतला गोटा असं म्हणण्याच्या मागे नक्की काय भावना असतात हे समजलं. (थोडक्यात परिक्रमा अगदीच वाया गेली नाही. काहितरी शिकायला मिळालं… आणि मनातच नर्मदे हर… असा जयघोष केला.)
कसतरी करत एकदाच बोटीपर्यंत पोहोचलो, पण बसण्यापूर्वीच ती भरली आणि या गोट्याला किनार्यावर ठेवून मार्गस्थ झाली. प्रकरण येवढ्यावरच थांबल नाही. तिथे शेजारी शेजारी थोड्या अंतरावर चार पाच बोटी लावण्याची सोय होती. पण दुसरी बोट शेवटच्या जागेवर लागली. त्या बोटीत बसण्यासाठी ठराविक वेळत तेवढ अंतर परत गोट्यांवरुन कसरत करत जाणं मला कठीण होत. मग या जागेवर येणाऱ्या बोटीतच बसायच असा निर्णय मी घेतल्याने माला बोटीत चढवण्यासाठी थांबलेल्यांना पण तिथेच थांबाव लागलं. बाकी सगळे बोटीवर चढत होते, आणि मला चढवायचं होत. पण बोट भराभर येत होत्या. पाचसात मिनीटंच वाट पहावी लागली. मला बोटीत चढवण्याचा आणि उतरवण्याचा कार्यक्रम झाला. मी येईपर्यंत माझ्या पत्नीसह काही मंडळी पलिकडे माझी वाट पहात ऊन्हात थांबले होते. त्यांना परिक्रमेचा पुढचा प्रवास सुरु करता येत नव्हता.
पलिकडच्या तिरावर उतरलो, परिक्रमा अर्धी झाल्याच समाधान वाटलं, पण ते क्षणिक ठरलं. कारण पुढचा प्रवास सुरु करायलाच चांगल्या पंधरा वीस पायर्या चढायच्या होत्या. किंवा रस्त्याने गेलोतर रस्ता चांगलाच चढ असणारा होता. परत एकदा ऊत्साह मावळला.
पण याठिकाणी जिथून परिक्रमा सुरु केली तिथे परत जाण्यासाठी रिक्षा मिळू शकते असं समजलं. मग सगळा जोर पायर्या चढण्याचं सोडून रिक्षा मिळाली तर परत फिरण्यावर लावला. यात माझ्या पत्नीलाही माझ्या सोबत परत फिरण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या निर्णयामुळे परिक्रमा पूर्ण करण्याच्या तिच्या विचारावर (नर्मदेच) पाणी फिरलं.
थोडक्यात परिक्रमा पूर्ण करायची या वासुदेव कुटीर इथे झालेल्या विचारातून आम्ही फुटीर झालो. आणि मिळेल त्या रिक्षाने परत वासुदेव कुटीर गाठायचं ठरवलं. आणि परिक्रमा पूर्ण करु शकलो नाही. पण राहिलेल्या सगळ्यांनी परिक्रमा पूर्ण केली…
असो, हा पण एक अनुभव घेतला. यातही अजून काही चांगल्या काही मनाला न पटणार्या गोष्टी आहेत. पण कुटीर ते फुटीर, आणि फुटीर ते कुटीर हाच प्रवास मोठ्ठा झाल्याने चांगल्या व मनाला न पटणार्या गोष्टी परत सवडीने पाहू…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




