श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे  (13 ऑगस्ट 1898 – 13 जून 1969)

महाराष्ट्रात, जी बहुगुणी, बहुआयामी व्यक्तिमत्वं होऊन गेली, त्यामधे आचार्य प्र. के. अत्रे हे एक महत्वाचे नाव. ते शिक्षणतज्ज्ञ होते. क्रमिक पुस्तकांचे निर्माते होते.  कवी-लेखक होते. उत्तम वक्ते होते. खंदे पत्रकार होते. राजकारणी होते. लोकप्रीय नाटककार होते. चित्रपट निर्माते होते. ‘हात लावीन तिथे सोनं’ म्हणता येईल, अशी प्रत्येक क्षेत्रातली  त्यांची कारकीर्द होती. त्यांच्याच शब्दात त्यांचं वर्णन करायचं झालं, तर म्हणता येईल, ‘असा महापुरुष गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि पुढची दहा हजार वर्षे होणार नाही.’

आचार्य अत्रे यांची सुरुवातीची कारकीर्द अध्यापनाची आहे. त्यांनी कॅंप एज्यु. सोसायटी हायस्कूलमधे मुख्याध्यापक म्हणून काम केले. ही तळा-गाळातली शाळा त्यांनी नावा-रूपाला आणली. त्यांनी मुलांसाठी राजा धनराज गिरजी हायस्कूल व मुलींसाठी आगरकर हायस्कूल या शाळा काढल्या. प्राथमिक विभागासाठी ‘नवयुग वाचन माला’ व माध्यमिक विभागासाठी ‘अरुण वाचन माला’ ही क्रमिक पुस्तके तयार केली. त्यापूर्वी असलेल्या पाठ्यपुस्तकातून मुलांच्या वयाचा विचार केलेला नसे. अत्रे यांनी मुलांचे वय, आवडी-नावाडी, अनुभव विश्व विचारात घेऊन पाठ्य पुस्तके तयार केली. त्यामुळे ती सुबोध आणि मनोरंजक झाली. शिक्षण क्षेत्राला त्यांचे हे महत्वाचे योगदान आहे.         

आचार्य अत्रे  यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्यांची वाणी आणि लेखणी दमदार, धारदार होती. त्याला विनोदाचे अस्तर असायचे. त्यामुळे त्यांचे लेखन आणि भाषण दोन्हीही लोकप्रिय झाले. त्यांनी अध्यापन, रत्नाकर, मनोरमा, नवे अध्यापन, इलाखा शिक्षक ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जयहिंद हे सांज दैनिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते खूपच लोकप्रिय झाले.

आचार्य अत्रे  यांच्या  चांगुणा, मोहित्यांचा शाप, या कादंबर्या , अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले हे कथासंग्रह,  गीतगंगा आणि झेंडूची फुले हे कविता संग्रह प्रकाशित झालेत. झेंडूची फुले हा कविता संग्रह म्हणजे त्या काळी लिहिल्या गेलेल्या काही सुप्रसिद्ध कवितांची विडंबने आहेत. काव्यक्षेत्रात या कविता म्हणजे त्यांनी चोखाळलेली एक वेगळीच वाट आहे. त्यानंतरही अशा प्रकारचे लेखन क्वचितच कुठे दिसले. ‘मी कसा झालो’ आणि कर्हेहचे पाणी ( खंड १ ते ५) ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तके. याशिवाय अत्रे यांनी, अत्रेटोला, केल्याने देशातन, दुर्वा आणि फुले, मुद्दे आणि गुद्दे अशी आणखी इतरही पुस्तके लिहिली. 

आचार्य अत्रे  यांची नाटकेही गाजली. त्यात भ्रमाचा भोपळा, कवडी चुंबक, मोरूची मावशी, साष्टांग नमस्कार यासारखी विनोदी नाटके होती, तर उद्याचा संसार, घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, प्रीतिसंगम, डॉ. लागू यासारखी गंभीर नाटकेही होती.

आचार्य अत्रे यांच्या प्रतिभेचा आविष्कार चित्रपट सृष्टीतही झालेला दिसून येतो. नारद-नारदी, धर्मवीर, प्रेमवीर, ब्रॅंडीची बाटली, बेगुनाह ( हिन्दी) इ. चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. नयुग पिक्चर्स तर्फे लपंडाव, श्यामची आई हे चित्रपट काढले. त्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यापैकी श्यामची आईला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सुवर्ण कमळ मिळाले. ‘सुवर्ण कमळ मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट. त्यांच्या चित्रपट सृष्टीच्या झगमगत्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला.

पुरस्कार, सन्मान, गौरव

विष्णुदास भावे या सांगलीयेथील नाट्यसंस्थेतर्फे त्यांना १९६० साली भावे गौरव सुवर्ण पदक मिळाले. पण अत्रे यांचे वैशिष्ट्य असे की अनेक संस्था अत्रे यांच्या नावे पुरस्कार देतात.

अशोक हांडे, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम करत. तर सदानंद जोशी हे ‘मी अत्रे बोलतोय’, हा एकपात्री प्रयोग करत.  

अत्र्यांची लोकप्रियता एवढी होती की त्यांच्या निधंनांनंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक गावी अनेक वेगवेगळ्या संस्था काढल्या गेल्या. अत्रे कट्टा, अत्रे संस्कृतिक मंडळ, अत्रे नाट्यगृह,  अत्रे कन्याशाळा, अत्रे विकास प्रतिष्ठान, अत्रे सास्कृतिक भवन अशा अनेक संस्था त्यांच्या नावे निघाल्या. वरळी आणि सासवड इथे त्यांचा भाव्य पुतळा उभारलेला आहे. 

अत्रे यांच्यावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली. दिलीप देशपांडे, सुधाकर वढावकर, शिरीष पै, सुधीर मोर्डेकर, आप्पा परचुरे, श्याम भुर्के इ.नी त्यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.

आज अत्रे यांचा स्मृतीदिन. त्या निमित्त या अष्टपैलू प्रतिभावंताला शतश: अभिवादन! ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments