?१५ ऑक्टोबर  – संपादकीय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ?

? वैविध्यपूर्ण विचारांचं सोनं नेहेमीच लुटत राहणाऱ्या ई – अभिव्यक्तीच्या सर्व लेखक – लेखिका, कवी – कवयित्री आणि सर्व रसिक वाचकांना आजच्या “दसऱ्याच्या शुभदिनी“ संपादक मंडळाकडून अनेकानेक शुभेच्छा. ?

आज “वाचन-प्रेरणा दिन“ — जगभरातील संपूर्ण साहित्यक्षेत्राला ज्यांच्यामुळे प्रसिद्धीच्या आणि लौकिकाच्या झोतात येण्यास आणि दीर्घकाळ त्या झोतात राहण्यास उद्युक्त केले जाते, अशा तमाम रसिक वाचकांना या विशेष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मा. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन-प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्व विकास, साहित्य आणि भाषाविकास यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, हा दूरदर्शी विचार यामागे आहे. डॉ. कलाम म्हणत असत की ‘एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.’ त्यांचा रोख मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण वर्गाकडे होता.

 “ जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे सकल जन “ हा अतिशय व्यापक विचार श्री. रामदास स्वामींनीही खूप वर्षांपूर्वी समाजाला दिलेला आहे. इथे 

 “ शहाणे “ या शब्दाचा अर्थ ‘विवेक-विचार- समृद्ध’  हाच अपेक्षित आहे, असे निश्चितपणे म्हणावे लागेल. आणि आपले विचार इतरांच्या विचारांशी ताडून पाहिले तरच ते जास्त जास्त समृद्ध होऊ शकतात. इतरांचे विविध विषयांवरचे विचार जाणून घेण्यासाठी  “वाचन “ हा  राजमार्ग आहे. . अभिवाचन, काव्यवाचन, समूह वाचन, वाचन कट्टा, असे अनेक उपक्रम याच उद्देशाने सुरु झालेले दिसतात. म्हणूनच, प्रत्येक जातिवंत वाचकाने इतर अनेकांना वाचनासाठी प्रेरणा द्यावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जावा , एवढीच अपेक्षा. 

☆☆☆☆☆

आज १५ ऑक्टोबर — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन . ( १५/१०/१९३१ –२७/०७/२०१५ ) 

“  पीपल्स प्रेसिडेंट “ म्हणून गौरवले जाणारे भारताचे ११ वे राष्ट्रपती, भारतरत्न पुरस्कार आणि इतर कितीतरी पुरस्कारांचे मानकरी, “ मिसाईल मॅन “ म्हणून जगभरात ख्यातनाम असलेले, आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांचेच “ प्रेरणास्थान “ असणारे एक सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ — अशी डॉ. कलाम यांची ओळख खरंतर सर्वांनाच आहे. 

त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगण्याची गोष्ट अशी की इतक्या विविध कामांमध्ये सतत अतिशय कार्यमग्न असूनही डॉ. कलाम यांनी पंचवीसहूनही जास्त पुस्तके लिहिलेली आहेत. ही बहुतेक सर्व पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिलेली असली, तरी इतर अनेक भाषांप्रमाणेच मराठीतही ती अनुवादित केली गेली असल्याने मराठी वाचकांसाठी ज्ञानाचा आणि माहितीचा मोठाच खजिना उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी काही पुस्तकांचा नामोल्लेख इथे करणे फक्त  उचितच नाही तर आवश्यक आहे ——–” Wings of Fire “– “ अग्निपंख “ हे त्यांचे आत्मचरित्र. // “ अदम्य जिद्द “ – (अनुवादित नाव ) // “ Ignited Minds–Unleashing the power within India “–” प्रज्वलित मने “ // “ India – My Dream “ // “India 2020 – a vision for The New millenium “ —-

“ भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध “ // “ सायंटिस्ट टू प्रेसिडेंट “ याच अनुवादित नावाचे त्यांचे आत्मकथन // “ Turning Points “– याच नावाने मराठी अनुवाद . ——आणि इतर कितीतरी पुस्तके. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, सन २०१२ मध्ये त्यांनी भारतीय तरुणांसाठी 

“ भ्रष्टाचाराचा पराजय करण्यासाठी मी काय करू शकतो “ या विषयावर आधारित एक कार्यक्रम सुरु केला होता. त्यांना फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी सन्मानपर पुरस्कार प्रदान करून गौरवले होते. खरोखरच भारताचे “ भूषण “ ठरलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी अतिशय मनापासून आदरांजली . 

☆☆☆☆☆

आज प्रसिद्ध कवी श्री. नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन. ( १५/१०/१९२६ – १६/०८/२०१० ) 

समाज परिवर्तन व्हायलाच हवे, हा विचार अगदी मनापासून करणाऱ्या श्री. नारायण सुर्वे यांनी आपला हा विचार स्वतःच्या कवितांमधून, अनेक कवनांमधून अतिशय प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. हा विचार कविवर्य केशवसुत यांच्या जातकुळीतला होता. याबाबत अशी एक आठवण सांगितली जाते की, श्री. पु.ल.देशपांडे एकदा असे म्हणाले होते की, “ अरे, केशवसुत कशाला शोधताय ? तुमचा केशवसुत परळमध्येच रहातोय.” या एकाच वाक्यात सुर्वे यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं गेलं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. श्री सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता, असं त्यांच्या कविता बघता म्हटलं जातं—–

“शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले , रात्र धुंद झाली —

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली —-” किंवा —

“असे आम्ही लक्षावधी नारीनर, दिवस असेतो वावरतो–

राबता , खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवून घेतो —” 

 —-अशा धाटणीची  त्यांची कविता संवेदनशील मनाला थेटपणे  जाऊन भिडणारी आहे. 

१९९५ साली परभणी इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्री. सुर्वे यांनी भूषविले होते. पद्मश्री पुरस्काराबरोबरच सोविएत रशियाच्या नेहरू अवॉर्डसह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे, तळागाळातल्या साहित्यिकांना आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी, “ नारायण सुर्वे कला अकादमी “ स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या नावानेही काही पुरस्कार दिले जातात. त्यांचे काव्यसंग्रहही प्रकाशित झाले आहेत. कवितेची अशी वेगळी वाट आपलीशी करणारे कविवर्य नारायण सुर्वे यांना विनम्र श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

मराठी नाटककार आणि विनोदी लेखन करणारे साहित्यिक श्री. वसंत सबनीस यांचाही आज स्मृतिदिन  ( ६/१२/१९२३ – १५/१०/२००२ ) 

सुरुवातीच्या काळात कवी म्हणून ओळख प्राप्त केलेले श्री. सबनीस, पुढे विनोदी लेखक आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले. चिल्लरखुर्दा, मिरवणूक, आमची मेली पुरुषाची जात , असे त्यांचे बरेच विनोदी लेखसंग्रह, आणि, बोका झाला संन्यासी, आत्याबाईला आल्या मिशा , अशासारखे बरेच विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच सौजन्याची ऐशी तैशी , गेला माधव कुणीकडे, घरोघरी हीच बोंब, अशी त्यांची नाटके गाजलेली आहेत. विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या नाटकाने तर यशस्वितेचा विक्रम केलेला आहे. तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्वाचा प्रयत्न म्हणून त्यांचा “ छपरी पलंगाचा वग “ या नावाचा वग खूपच उल्लेखनीय ठरला होता, आणि त्यावरूनच “ विच्छा माझी —” हे नाटक साकार झाले. मार्मिक राजकीय भाष्य आणि चतुर संवाद ही वैशिष्ट्ये असणाऱ्या या नाटकाने लोकनाट्याला वेगळे परिमाण दिले. या नाटकाचे “ सैंय्या भये कोतवाल “ हे हिंदी रूपांतरही खूप लोकप्रिय झाले. सबनीस यांनी लिहिलेले दोन एकांकिका-संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना दोन वेळा महाराष्ट्र राज्याचा ‘ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार ‘ दिला गेला होता. “ किशोर “ या तेव्हाच्या प्रसिद्ध मासिकाचे ते प्रमुख संपादक होते. श्री. वसंत सबनीस यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.  

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(संपादक मंडळासाठी)

ई अभिव्यक्ती मराठी

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षणमंडळ, “ साहित्य- साधना दैनंदिनी “ . २) गूगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments