श्री सुहास रघुनाथ पंडित

? २३ जानेवारी –  संपादकीय  ?

२६ मे- कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरींचा आज जन्मदिन - MH20 News : Aurangabad Latest News | Live News | Happenings

राम गणेश गडकरी :

कविवर्य गोविंदाग्रज, विनोदी लेखन करणारे बाळकराम आणि लोकप्रिय नाट्यलेखक राम गणेश गडकरी यांना तुम्ही ओळखता का असे कुणी विचारले तर बिनधास्तपणे तिघांनाही ओळखतो म्हणून सांगावे.कारण हे तिघेही एकच आहेत.

रा.ग.गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन केले तर बाळकराम या नावाने विनोद लेखन केले.गडकरी या नावाने नाट्यलेखन केले असले तरी नाट्यसृष्टीत ते गडकरीमास्तर या नावाने ओळखले जात होते.

गडकरी यांच्या लहानपणीच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले.त्यांचा गोविंद हा लहान भाऊही गेला.त्यानंतर ते पुण्याला आले.न्यू इंग्लिश स्कूल व नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.त्याच वेळेला त्यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीशी संबंध आला.ते त्यांच्या’ रंगभूमी ‘ या मासिकात लेखन करू लागले.तसेच शि.म.परांजपे यांचा ‘काळ’ व ह.ना.आपटे यांच्या ‘करमणूक’या मासिकातून लेख,कविता लिहू लागले.त्याच वेळी त्यांचे नाट्यलेखनही चालू होते.

एकच प्याला,गर्वहरण,पुण्यप्रभाव,प्रेमसंन्यास, भावबंधन,राजसंन्यास,वेड्याचा बाजार या गडक-यांच्या नाट्यकृती. एकच प्याला व भावबंधन ही नाटके अत्यंत लोकप्रिय ठरली.या नाटकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक सर्व नावे पाच अक्षरी आहेत.

केवळ नाटकेच नव्हे तर एकच प्याला मधील सुधाकर,तळीराम,सिंधु आणि भावबंधन मधील घनश्याम आणि लतिका ही पात्रे आजही लोकप्रिय आहेत.उत्कृष्ट संवाद हे या नाटकांचे आणखी एक वैशिष्ट्य . गडकरी हे मराठीचे शेक्सपियर होते असे  म्हणतात ते योग्यच आहे.

वाग्वैजयंती हा गोविंदाग्रजांचा एकमेव कविता संग्रह.मात्र यात छंदोबद्ध कवितांपासून मुक्तछंदातील कवितेपर्यंत सर्व प्रकार वाचावयास मिळतात.तसेच अगदी लहान म्हणजे चार ओळींच्या कविताही आहेत आणि प्रदीर्घ कविताही आहेत.

बाळकराम यांनी नाट्यछटा,संवाद,विडंबन यातून विनोदी लेखन केले आहे .हे सर्व लेखन उच्च अभिरुची संपन्न आहे.संपूर्ण बाळकराम हे पुस्तक याचे द्योतक आहे.

याशिवाय गडकरींनी स्फुट लेखन केले आहे.तसेच चिमुकली इसापनीती हे जोडाक्षर विरहीत छोटेसे पुस्तकही लिहीले आहे.

आचार्य अत्रे,वि.स.खांडेकर,ना.सि.फडके,रा.शं.वाळिंबे, भवानीशंकर पंडित,प्रवीण दवणे अशा अनेक नामवंत साहित्यिकांनी गडकरी यांचे जीवन व साहित्य यावर विपुल लेखन केले आहे.त्यांच्या नावे नाट्य स्पर्धाही घेतल्या जातात. महाराष्ट्र शासनातर्फे दिवंगत नाट्य कलाकाराच्या पत्नीला पुरस्कार दिला जातो.तो गडकरी यांच्या पत्नी रमाबाई गडकरी यांच्या नावे दिला जातो.

साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण करणारा हा महान साहित्यिक वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी स्वर्गवासी झाला.

आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.!! 

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments