श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तांडव…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

तांडव हा एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. हे पुरुषप्रधान नृत्य असून ते शिवाने प्रवर्तित केले. संगीत रत्नाकरात (७. ५. ६) दिलेली तांडवाची उत्पत्ती अशी…

प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्नयुक्तं ततो हरः।

तण्डुना स्वगणाग्रण्या भरताय व्यदीदृशत्।।

लास्यमस्याग्रतः प्रीत्या पार्वत्या समदीदृशत्।

बुध्दवाथ ताण्डवं तण्डोर्मर्त्येभ्यो मुनयोsवदन्।।

अर्थः- नंतर शिवाने आपण पूर्वी केलेले उद्धतनृत्य आठवून ते आपल्या गणातील अग्रणी असलेल्या तण्डूकरवी भरतमुनींना दाखविले. तसेच लास्य हे नृत्यही पार्वतीकरवी मोठ्या आवडीने भरतापुढे करवून दाखविले. तण्डूने करून दाखविले ते “तांडव” असे जाणून भरतादी मुनींनी ते नृत्य मानवांना शिकविले.

या नृत्याचे सात प्रकार आहेत ते असे…

१) आनंदतांडव २) संध्यातांडव ३) कालिका तांडव ४) त्रिपुरतांडव ५) गौरीतांडव ६) संहारतांडव ७) उमातांडव

हे सातही प्रकार नटराज शिवाला प्रीय होते.

काही काव्य ग्रंथातून दुर्गा, गणेश, भैरव, श्रीराम इ. च्या तांडवाचे वर्णन आढळते. रावणविरचित शिवतांडव स्तोत्राखेरीज आदि शंकराचार्य रचित दुर्गा तांडव (महिषासुर मर्दिनी संकटाविमोचन स्तोत्र), गणेश तांडव, भैरव तांडव तसेच श्रीभागवतानंद गुरु रचित श्रीराघवेंद्रचरितम् मधे राम तांडव स्तोत्र आहे. असे म्हणतात की रावणाच्या भवनातील पूजन समाप्त झाल्यावर शिवाने, महिषासुराला मारल्यानंतर दुर्गा मातेने, गजमुखाच्या पराभवानंतर गणेशाने, ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदल्यानंतर आदिभैरवाने तर रावणवधाच्या वेळी श्री प्रभुरामचंद्राने तांडव केले होते.

वरील सात प्रकारांपैकी गौरीतांडव आणि उमातांडव ही दोन्ही उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यात शिव हा ‘भैरव’ अथवा ‘वीरभद्र’ या स्वरूपात असतो. त्याच्या सोबत उमा अथवा गौरी असते. तो जळत्या चितांनी युक्त अशा स्मशान भूमीत भूतगणांच्या साथीने हे भयानक नृत्य करतो.

(संदर्भः- अ. भा. सं. कोष, खं. ४ पृ. ७३)

संध्यातांडवाचे वर्णन शिवपुराणातील “शिवप्रदोषस्तोत्रा”त आहे. त्यावर आधारित “संध्यातांडव” ही कविता रसिकांसाठी पुढे देत आहे. तिची गुणवत्ता वाचकांनी ठरवावी.

या कवितेतील पहिल्या कडव्यात ‘ळ’ आणि ‘र’ या वर्णांच्या प्रयोगाकडे, साधलेल्या अनुप्रासाकडे वाचकांनी विशेष लक्ष द्यावे. आजपर्यंत कविश्रेष्ठ गदिमांचे “घननीळा लडिवाळा” हे एकमेव गीत “ळ ” या वर्णाच्या योजनेसाठी उदाहरण म्हणून सांगितले जाते. या पृष्ठभूमीवर या कवितेतील ‘ळ’ या वर्णाच्या अनुप्रासाचे महत्व. बघा कसे वाटते ते.

आपला अभिप्राय मात्र प्रार्थनीय आहे आणि त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करतोय.

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

भूत गणांचा संघ घेउनी स्मशान भूमिवरी

‘संध्या तांडव’ करितो भैरव सवे सती गौरी।।धृ।।

*

चिता भस्म चर्चिले तनूवर गळा व्याळ माळ

जटाभार माथ्यावर त्यावर चंद्रकोर शीतल

रुंडमाळ, करमाळ रुळतसे विशाळ वक्षावरी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।१।।

*

धडाडणाऱ्या चिता भयंकर वाऱ्यावर हलती

कभिन्न काळी भुते नाचती फेर धरुनि भवती

रक्त-कृष्ण वर्णाचे मिश्रण विचित्र भयकारी!

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।२।।

*

सिद्ध सदाशिव नृत्यालागी त्रिशूळ सरसावुनी

ब्रह्मा दे करताल, वाजवी मृदंग शारङ्पाणी

लक्ष्मी गाई, इंद्र वाजवी रत्नांकित बासरी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।३।।

*

घुमू लागले डमरू डिम् डिम्, मृदंग धिं धिं धिगि धिक्

सरस्वतीच्या वीणेमधुनी सूर सुरेल अलौकिक

कुणी वाजवी शंख, मंजि-या, कुणि वाद्ये शततारी

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।४।।

*

देव दाटले, असित लोटले, यक्ष अप्सरांसवे

किन्नर गाती, देवल देती दाद तयांच्या सवे

डुलू लागला गोल धरेचा, शेष फणा सावरी!

संध्यातांडव करितो भैरव सवे सती गौरी ।।५।।

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments