प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – सत्यभामाबाई टिळक ! – लेख क्र. १७ ☆ प्रा.भारती जोगी ☆
एक रात्र! केसरी वाडा शांत!! सगळे निद्राधीन… अशा वेळी राजद्रोहाच्या शिक्षेत मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांना ६ वर्षांचा कारावास झाल्याची बातमी सांगायला काकासाहेब खाडिलकर पोहोचले. पण खूप रात्र झाल्यामुळे रात्रभर घराबाहेर ओट्यावरच बसून राहिले. सत्यभामाबाईंनी सकाळी दरवाजा उघडला, आणि त्यांना पाहताच काकासाहेबांचा अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी अत्यंत धीरोदात्तपणे उच्चारलेले शब्द होते… ” तिकडे शिक्षा झाली हे सांगण्यासाठीच तुम्ही येथे आलात ना? मग असे बायकांसारखे रडत काय बसलात? शिक्षा काही चोरी, लबाडी सारख्या गुन्ह्यासाठी झालेली नाही. लोकांच्या कल्याणासाठी झटण्याच्या गुन्ह्यासाठी झाली आहे. हात-पाय गाळून बसण्यात काय अर्थ आहे? उठा… रडू नका. कामाला लागा. “
हे शब्द होते, आपल्या पतीच्या कार्याशी एकरूप झालेल्या… स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलेल्या एका झंझावाती वादळाच्या जीवनातील झुळुकेचे! पती धगधगती ‘मशाल ‘तर पत्नी ‘नंदादीप ‘! शांतपणे, अखंड तेवणारा!!
पतीच्या राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या अग्नी कुंडात आपलं संपूर्ण जीवन हसत-हसत समर्पित करणारी ही समिधा म्हणजे… लोकमान्य टिळकांची पत्नी… सत्यभामाबाई! पूर्वाश्रमीच्या ‘तापीबाई ‘! कोकणच्या मुक्त हवेत, नारळी, पोफळी च्या सहवासात वाढलेली एक सुदृढ अंगापिडाची बाला! त्या काळानुसार बालविवाह होऊन टिळकांच्या घरात सून म्हणून पुण्यात आलेली. स्वभावाने अतिशय नम्र, अबोल, संस्कारी! अलौकिक अशा साधेपणाची मूर्ती!
लग्न करून आल्यावर लक्षात आले की, आपली लग्न गाठ ही एका राष्ट्रभक्ती ने उसळलेल्या झंझावाताशी झालीये. सत्यभामेनं ठरवूनच टाकलं त्या झंझावाताच्या वेगाशी, जोमाशी एकरूप होत, त्यातच विलीन व्हायचं, एका विधायक रूपात!!
आणि मग… सत्यभामाबाई टिळकांच्या मागे सावली सारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या शांत, मूक त्यागामुळे आणि समर्थ अशा साथीमुळेच टिळक कोणत्याही कौटुंबिक चिंतेशिवाय स्वातंत्र्य चळवळीत सर्वस्व देऊ शकले.
लोकमान्य टिळक नेहमी म्हणत,
” माझे संसाराकडे दुर्लक्ष असले तरी मुलांचे संगोपन आणि त्यांच्यावर सुयोग्य संस्कार करण्यास सत्यभामा समर्थ आहे. “
आणि खरंच सत्यभामाबाईंनी…
” आदर्श स्त्री जीवन हे मातृशक्तीतून प्रकटते “… हे आपल्या ६ अपत्यांचं सुयोग्य संगोपन करून सिद्ध च केले.
पुण्यातील केसरी वाडा सत्यभामाबाईंच्या शांत, मूक, मौन संघर्षाचा साक्षीदार आहे. वाड्यातलं ‘माजघर ‘ त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं केंद्रस्थान आणि आश्रय स्थान होतं जणू काही!
त्या माजघराच्या परिघात राहूनच त्यांनी… राजकीय चर्चा, बैठका, क्रांतिकारकांची ये-जा, पै पाहुणे, केसरी वृत्तपत्राचे कर्मचारी… या सगळ्यांचं आदरातिथ्य, , जेवणाची सोय अगदी विनातक्रार करून ‘अन्नपूर्णा’ च सिद्ध केले.
माजघरातल्या क्रांतीची मूक नायिका होती ती!
त्याच माजघरात राहून… ब्रिटिश पोलिसांच्या अनेक धाडी, घरावर आलेली जप्ती, पतीला वारंवार होणाऱ्या तुरुंगवासाच्या शिक्षा… हे सगळं अत्यंत नि:शब्दपणे आणि धीरोदात्तपणे सहन केलं, पेललं ही आणि झेललं ही! मनातलं वादळ चेहऱ्यावर किंवा शब्दांतून व्यक्त नाही होऊ दिलं.
स्वतः अंधारात राहून लोकमान्यांना प्रकाश देत राहिल्या. त्यांच्या भव्य कार्या मागे शांतपणे, स्थिर राहून एखाद्या दीपस्तंभा सारखा आधार झाल्या त्या!!
टिळकांच्या आयुष्यातील ” ताई महाराज खटला “… हा अत्यंत वादग्रस्त आणि मानसिक त्रासाचा होता. या परिस्थितीत घराची अब्रू, पतीची पत सत्यभामाबाईंनी ढळू दिली नाही. मोठ्या संयमाने तोंड दिले. त्यावेळी टिळकांनी सत्यभामाबाईंना जे पत्र लिहिले होते ते त्या दोघांतील… मूक आणि घट्ट मानसिक नात्याचा पुरावा आहे.
सत्यभामाबाईंचं करारी आणि ठाम रूप ही दिसलं ते त्यांच्या त्याच माजघराच्या सीमेवर उभं राहिलेलं! घरात महत्त्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्रे आहेत असे कळल्यावर, तपासाला आलेल्या इंग्रज अधिका-याला त्यांनी रणरागिणी च्या आवेशात सुनावले, ” घरातील स्त्रियांच्या खाजगी भागात प्रवेश करता येणार नाही. “… या तेजस्विनी च्या तेजापुढे ब्रिटिश अधिकारी ही नमला… मागे हटला!!
या तेजस्विनी चं त्यागमयी रूप ही दिसलं ते केसरी च्या सुरुवातीच्या खडतर, कठीण आणि आर्थिक अडचणीच्या काळात! त्यावेळी आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून स्वतः चे लग्नातील दागिने आणि कौटुंबिक चीजवस्तू हसतमुखाने गहाण ठेवल्या. हा आर्थिक त्याग खूपच मोठा म्हणावा असाच आहे!
एक महान राष्ट्र नेता घडण्यामागे केवळ वैचारिक संघर्ष पुरेसा नसतो तर तितकीच खंबीर साथ देणा-या धैर्याच्या मूर्ती ची गरज असते.
या धैर्यशील समिधेने आपल्या घराचा उंबरठा कधी ओलांडलाच नाही. बडेजावाची हौस नव्हतीच. दोन साधी पातळे, हातात दोन काळ्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र! स्वतः ताक, दूध, फळे यावरच जास्तीत जास्त रहात. उपासच असत. मात्र माधुकरी मागणा-यांना ही अन्नपूर्णा भरभरून, भरपूर देई.
टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं आणि पहिल्यांदाच या धीरोदात्त, शांतपणे जळणा-या समईतल्या शुभ्र कळेचा जणू धीरच खचला. आपला पती काही आता परत येत नाही अशी त्यांच्या मनाची समजूत झाली. त्यांची जगण्याची आसक्तीच सुटली. औषध घेणे ही टाळू लागल्या. या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.
७ जून १९१२… या दिवशी सत्यभामा नावाची एक समिधा राष्ट्रभक्ती च्या धगधगत्या होमकुंडात समर्पित झाली… एक तेजस्वी प्राणज्योत मंडालेच्या दिशेने निघून गेली…
सत्यभामाबाई निवर्तल्यानंतर… एका परिचिताने त्यांचं एक रेखाचित्र बनवलं. त्यांच्या पुतण्याला ते खूप आवडलं, तो ते घेऊन लोकमान्यांकडे गेला… ते रेखा चित्र बघून टिळकांनी म्हंटलं,
” ती अशी नव्हतीच! … ती कशी होती हे फक्त मलाच ठाऊक आहे. “
असं म्हणतांना त्यांचे ओठ थरथरले, डोळ्यातलं पाणी उपरण्यानं टिपलं आणि शांत झाले.
… हेच तर ना ते पती-पत्नीतलं एकरूपत्व! परस्पर ऐक्य! आणि त्या बळावर होणारं पतीचं लोकोत्तर, लोकमान्य कार्य! हीच ती क्रांतीकारकांची ताकद!!
हीच ती समिधा जिचं समर्पित होणं बाळ गंगाधर टिळकांना थेट “लोकमान्य ” या उपाधीस पात्र ठरण्यास पूरक ठरलं!!!!!!
– लेख क्र. १७.
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





