मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… – लेख क्र. ७ ☆ मंजिरी येडूरकर ☆

दमयंती धर्माधिकारी – – 

वर्धा जिल्ह्यातील श्रीमंत मालगुजार श्री मिरापूरकर यांची एकुलती एक कन्या! जन्म १९०४ साली झाला. कृष्णाबाई हे तिचे माहेरचे नांव. लहानपण अतिशय श्रीमंतीत गेले. अर्थात विवाह बालपणीच झाला. मध्य प्रदेशातील मूळ तापी येथील धर्माधिकारी घराणे म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धतीचे एक उत्तम उदाहरण होते. त्यांच्या घरात धर्माधिकारी आडनावाची किमान शंभरावर माणसं होती. तरी रूढींपेक्षा विज्ञान दृष्टीवर भर असल्याने स्त्रियांमध्येही प्रगतीशीलता होती. अशा घरात दादा म्हणजे शंकर धर्माधिकारी यांच्याशी कृष्णाबाईंचा विवाह झाला आणि ती दमयंती धर्माधिकारी झाली. दादांचे वडील त्र्यंबक धर्माधिकारी हे न्यायाधीश होते. त्यामुळे सुखवस्तू घराणे! दादाही खूप शिकतील असे वाटत असतानाच लग्नानंतर लगेचच त्यांनी कॉलेज शिक्षण सोडून देऊन गांधींच्या असहकार चळवळीमध्ये उडी घेतली. आणि नागपूरच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात 30 रुपये महिना पगारावर शिक्षकाची नोकरी पत्करली. दमयंतीचा संन्याशाबरोबरचा संसार सुरू झाला. नाव शंकर होतेच.

महात्मा गांधींच्या तत्त्वाचा अंमल असल्याने दोघेही पती-पत्नी खादीचे पुरस्कर्ते होते. भाजीसाठी नेलेल्या पैशातून पुस्तके खरेदी करून घरी येणारे दादा! त्यामुळे सगळ्या संसाराचा भार हा दमयंतीकडेच आला. तिला दादा मालकीण बाई म्हणत असत.

तत्त्वासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या दारिद्र्याचे वैभव काही वेगळेच असते. त्यात एक वेगळीच मस्ती असते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते नागपूरहून वर्ध्याला राहायला आले. वर्ध्याची बजाज वाडी म्हणजे निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या कार्यकर्त्यांचे एकत्र कुटुंबच होते. महात्मा गांधींची कर्मभूमी होती. त्यामुळे तिथले वातावरण भारलेले होते. सांप्रदायिक, धार्मिक, रूढी, परंपरा यात दादा कधीच गुरफटले नाहीत. त्यांच्या या लोकविलक्षण मतांशी आणि प्रयोगांशी दमयंतीला जुळवून घ्यावे लागले. त्यामुळे मुलांच्या मुंजी झाल्या नाहीत. लग्नंही नोंदणी पद्धतीने झाली. ज्या मंदिरात हरिजनांना प्रवेश नसेल त्या मंदिरात दादांच्या घरातीलही कोणी पाऊल टाकत नसे. तीर्थक्षेत्री काही कारणाने दमयंती गेली तरी देवाचे दर्शन न घेता ती परत येत असे. ज्या सणावारी ब्राह्मण जेवायला बोलवायची पद्धत असते, तिथे दमयंतीकडे मात्र पैकू हा भंगी जेवायला असे. त्यामुळे ती अनेक जातीच्या व धर्माच्या मुला मुलींची आई झाली होती.

१९४१ चा वैयक्तिक सत्याग्रह हा गांधींच्या सत्याच्या चळवळीचा उच्चांक होता. या आंदोलनात पहिल्यांदा दमयंती बाईंनी प्रत्यक्ष भाग घेतला.

दमयंतीबाईंनी शरयूताई धोत्रे यांच्याबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा खेड्यांचा पायी दौरा केला. या दौऱ्यात त्या ब्रिटिश सरकारच्या जुलमी धोरणांविरुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धात भारतीयांना बळजबरीने सामील करून घेण्याविरुद्ध बोलल्या व जोरदार युद्धविरोधी प्रचार केला. अनेक जाहीर सभा घेऊन भाषणे केली. खेड्यापाड्यात जाऊन अशी प्रक्षेभक भाषणे केल्यामुळे अटक झाली. अटके नंतर न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडताना त्यांनी अत्यंत स्वाभिमानी व कणखर भूमिका घेतली. दमयंतीबाई म्हणाल्या, ” माझ्यासारख्या संसारी, कौटुंबिक वृत्तीच्या स्त्रीलाही, राजकारणात फारसा रस नसताना, महात्मा गांधींच्या या पवित्र चळवळीत उतरावे असे वाटले, कारण ब्रिटिश सरकारचे अत्याचार आता असह्य झाले आहेत. कोणत्याही नागरिकाला स्वाभिमानाने जगणे अशक्य झाले आहे. साम्राज्यशाही व हिटलरशाही ही जुळी भावंडे आहेत. हिटलरचा जरी नयनाट झाला तरी इंग्लंडच्या रूपाने हिटलरशाही जिवंत राहील. हिंदुस्थान गुलाम असताना त्याने या महायुद्धाला मदत करणे हे राष्ट्रदोहाचे ठरेल. हिटलरशाही व साम्राज्यशाहीचा अंत गांधीजींच्या अहिंसक मार्गानेच होईल. त्यामुळे या हिसक युद्धाला आमचा विरोध असेल. आपल्याला जर खरोखरीच सरकारचे नोकर या नात्याने लोकांचे खरे हित करायचे असेल तर या युद्धाला विरोध करणे व अहिंसेचा मार्ग स्विकारणे हे आपले कर्तव्य ठरते. ” या खटल्यात तुरूंगवासाची शिक्षा झाली. १९४२ मधे हा तुरूंगवास संपला.

दादा तर कित्येक वेळा तुरुंगात जात होते. अशा वेळी घर सांभाळणे, दादांच्या हालचालीत गुप्तता पाळणे अशा जबाबदाऱ्या उचलाव्या लागत होत्या.

पती-पत्नी दोघेही तुरुंगात असताना सगळ्या कुटुंबाने अगदी चौदा वर्षाच्या मुलाने (न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी) सुध्दा भूमिगत राहून आंदोलनात भाग घेतला होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही दमयंतीबाईंनी भाग घेतला होता. तेव्हाही जवळजवळ तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.

या तुरुंगवासात त्यांनी पहिले की मोठमोठी माणसे सुद्धा तुरुंगात सवलती मिळविण्यासाठी ज्या क्षुद्रपणे वागतात त्याचा दमयंती बाईंच्या मनावर परिणाम झाला. त्या क्रांतिकारकांच्या मनातील प्रतिमा डागाळल्या. हा सर्व मानसिक त्रास त्यांना सहन झाला नाही. त्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला. अशाच अवस्थेत तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली. पण सगळा संसार उद्ध्वस्त झाला. परिस्थिती शेवटपर्यंत सुधारली नाही व २६ मे १९७३ रोजी एक क्रांती ज्योत अनंतात विलीन झाली.

तोपर्यंत त्या जिवंत आहेत की नाही याची चौकशीही कुणी कधी केली नाही, हे शल्य त्यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये घर करून राहिले.

– लेख क्र. ७.  

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted