श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 294
☆ धूळ आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सत्य कायम बोलणारे कूळ आहे
आरशावर का तरीही धूळ आहे
*
मुंगळ्यांना लोभ काही सोडवेना
पाय त्यांचे ओढणारा गूळ आहे
*
ना वयाची बंधने ना शिस्त काही
रीलचे या वाढलेले खूळ आहे
*
टाळता येणार नाही माणसाला
प्राक्तनाने रोवलेला सूळ आहे
*
आगगाडी पाहिली मी कोकणारी
भार येथे सोसणारा रूळ आहे
*
भाग्य माझे तोलणारा फक्त ईश्वर
झाकलेला त्याच हाती तूळ आहे
*
झाड आहे मातीवरती वाढणारे
आणि खाली गाडलेले मूळ आहे
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




