श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१२
☆ नववर्षाचं स्वागत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
ऐन मध्यरात्री
गतवर्षाचा हात सोडून
दुसऱ्याच क्षणी
त्याने
एक वर्षासाठी
नववर्षाचा हात धरला आहे
या क्षणीक आनंदासाठी
शोभेच्या दारुचा धूर
आणि
झिंग आणणाऱ्या
दारुचा पूर
आपण सारेच अनुभवतो
नववर्षाचा सूर्य पाहून
पक्षाचे थवे
आकाशात झेपावले
रात्रीचा धूर
अजून आकाशा कवेत
विसावला होता
त्याचा त्रास
पाखरांना
श्वसन घेताना
होत होता
दारुच्या पुरात
वाहून आलेले
काही युवक
अजून
लोळत पडले आहेत
नववर्षाचा सूर्य
त्यांनी पाहिलाच नाही
बरंच काही
दिलं घेतलेल्या
गतवर्षाच्या आठवणींना स्मरून
झालं गेलं विसरून
आपण सर्वांनी
नववर्षाचं स्वागत
केलं पाहिजे…!
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





