कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २८३ – विजय साहित्य
☆ दोषी…! ☆
(मात्रा वृत्त – २५ मात्रा)
☆
माझ्याआधी, मलाच गेले, वाचून कोणी
उपदेशाचे, डोस पाजले, हासून कोणी. १
*
चेष्टा, टिंगल, आणी टवाळी, झाली कविता
आदर देता, सादर झाले, आतून कोणी.२
*
घनिष्ठ झालो, बघता बघता, या मनी नांदलो
काळजास त्या, दिली उभारी, राहून कोणी. ३
*
हळवेली पण, मधाळ बोली, संजीवन ते
श्वास फुलांचे, अत्तर गेले, माखून कोणी.४
*
नको तेवढे, वाटत गेलो, धन शब्दांचे
अक्षर काळे, भास्कर झाले, लाजून कोणी.५
*
जपली नाती, वेळ देऊनी हिशेब नाही
नाते गेले, मनासारखे, वागून कोणी.६
*
मतभेदाचे, आले वारे, कडकड नाही
घरात गेले, वहात तेव्हा, पाहून कोणी.७
*
हाकेसरशी, दमात एका, आधार झालो
विश्वासाला, हलाल केले, मागून कोणी.८
*
घर शेणाचे, घर मेणाचे, जमले नाते
अनुभवांचे, दार घेतले, लावून कोणी.९
*
हात लिहिते, थांबले कधीचे कळले नाही
विडा निरोपी, हातावरचा, चाखून कोणी.१०
*
लळा लावूनी, गळा कापला, कविराजाचा
स्वभाव ठरला, दोषीच तेव्हा, टाळून कोणी.११
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



