मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “येरझारा…” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
*
हपापलेल्या कावळ्यांनी गजबजलंय रान
अन कावकाव करण्याला सारखंच उधाण…
या फांदीवरून त्या फांदीवर.. सतत त्यांच्या येरझारा
झाडाखाली वाढत चाललाय.. नैतिकतेचाच सारा कचरा…
पण कावळ्यांना त्याची खंत नाही.. बाकी कसलेच भान नाही
झाड झालंय केविलवाणं.. पण त्यांना बघायला उसंतच नाही…
“ झाडाची पर्वा आम्ही का करायची? ”.. गरजच कुठे आहे या प्रश्नाची
काळजी फक्त टोपी सांभाळण्याची.. फिकीर नाहीच बाकी कशाची…
‘ज्यांना काळजी वाटतेय त्यांना वाटू दे.. राग येतोय तर खुशाल येऊ दे
पण झाड त्यांच्या मालकीचं नाही.. एवढं मात्र अशांच्या लक्षात राहू दे’…
‘आमच्या नावावर आम्ही करून घेतलाय.. कधीच या झाडाचा सातबारा
इतरांना काय करायचंय कसा नि केव्हा.. अशा विचारांना आम्ही देतच नाही थारा’…
‘आम्ही असेच भिरभिरत राहणार.. मनोरे स्वप्नांचे तर रचतच राहणार
गरजेनुसार सहज स्वप्नं बदलणार.. या फांदीवरून त्या फांदीवर…
सतत येरझारा मारतच राहणार..
सतत येरझारा मारतच राहणार… ‘
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





खूप छान कविता मंजूषा ताई