कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २९७ – विजय साहित्य
☆ झुक झुक गाडी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टाक्षरी..)
☆
मनातली आगगाडी
किती वेगात धावते..?
गूढ गहन भावना
अंतरात सामावते. ..!
*
नाही खिडक्या नी दारे
काचपेटी भुयारात
घेई विश्वाचा आढावा
अंतरीच्या परीघात….!
*
सुख दुःख यात्रेकरू
किती येती किती जाती..?
क्षणकाल प्रवासात
मन जुळविते नाती…!
*
सवयीचे भाऊबंद
विश्वासाचे दोन हात
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
शिकवती प्रवासात…!
*
स्वभावाचे बाळकडू
गूढ गहन अगम्य
चूक भूल द्यावी घ्यावी
राग लोभ व्हावा क्षम्य…!
*
अशा धावत्या गाडीत
अव्यक्ताने व्यक्त व्हावे
येता मुक्कामाचे गाव
संवादाचे हात घ्यावे…!
*
दिसे एकटी जरी ती
आठवांची उरी यात्रा
विना तिकीट धावते
सांभाळीत प्राणिमात्रा…!
*
विचारांच्या काहूरात
मन जपते मनाला
अशी झुक झुक गाडी
गूढ गहन क्षणाला…!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

