कावेरी सुतार
कवितेचा उत्सव
|| बाप, नवरा अन् मुलगा || ☆ कावेरी सुतार ☆
☆
लहानपणीच त्याच्या हातांत, घराचं ओझं दिलं जातं,
मुलगा आहेस तू, रडायचं नाही, हे मनावर बिंबवलं जातं.
.
शिक्षण सुटतं, स्वप्नं तुटतात, ओढ लागते तीकामाची,
तरीही जगाला किंमत नसते, त्याच्या घामाची अन् श्रमाची.
.
नोकरी नसेल तर स्वतःच्याघरात, तो उपरा होऊन जगतो,
प्रत्येकाच्या नजरेतली टोचणी, तो निमूटपणे बघतो.
.
लग्नानंतर तर फक्त सुखाचे, मुखवटे त्याला लेवावे लागतात,
स्वतःची फाटकी झोळी लपवून, दुसऱ्यांचे हट्ट पुरवावे लागतात.
.
तिला वाटतं तो कठोर आहे, त्याला काहीच वाटत नाही,
पण त्याच्या काळजाचा हुंदका, कधीच शब्दांत फुटत नाही.
.
मुलांची फी, कधी बायकोचाअबोला,
या सगळ्यांच्या ओझ्याखाली, झालाय अधांतरी झोला.
.
तो जुनेच कपडे घालतो, जेणेकरून घर नीट दिसावं,
तो अर्धपोटी झोपतो, जेणेकरून मुलांनी सुखात हसावं.
.
तिला दिसतात फक्त त्याचे, रागीट अन् ताठर डोळे,
पण त्यालाच माहीत आहे, त्याने किती अश्रू आतच गिळले.
.
दिवसभर दुनियेच्या लाथा खाऊन, जेव्हा घरी परततो,
तेव्हाही तक्रारींचा पाऊस, त्याच्याच उंबरठ्यावर असतो.
.
पुरुष आहे म्हणून त्याचं, माणूसपणच हरवून जातं,
आणि अखेरच्या श्वासापर्यंत, तो फक्त एक ‘जबाबदारी‘ म्हणून उरतो.
अखेरच्या श्वासापर्यंत, तो फक्त एक ‘जबाबदारी‘ म्हणून उरतो…
☆
© कावेरी सुतार
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
