कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव #३०० – विजय साहित्य
☆ जागा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
विषय : माझा गाव
(वृत्त : लवंगलता – मात्रा विभाग : ८-८-८-४ = २८)
☆
गावासंगे नाळ जोडली शिवार माझी आई
वेशीवरची, दाट बाभळी, आठवणींची शाई…!१
*
गावदेवता नव्या मंदिरी वाट पाहते जेव्हा
उरूस जत्रा, जमतो मेळा, माळावरती तेव्हा…!२
*
सहा ऋतूंचे, सहा सोहळे, पार वडाचा पाही
नदी किनारी,औदुंबर तो, सवे ऋतूंच्या राही…!३
*
घरे गावची, नटली थटली, शहरी वारा, प्याली
सुख सोयींनी, रमा पाहुणी, वाजत गाजत आली…!४
*
शाळा,रस्ते , ग्राम चावडी, कात टाकली वाटे
जुन्या नव्याची, ऊन सावली, उरात क्षणभर दाटे…!५
*
रूप बदलले मम गावाचे, नसे बदलली,माया
परस्परांच्या, दिठी मिठीला आतुर होते, काया…!६
*
जितराबाने, भरला गोठा, दुध दुभत्याने,चरवी
सणवाराला,आपुलकीने, भरून जाते पडवी…!७
*
अजून येतो, वास फुलांना, साद घालती वाटा
अजून येते,धावत कोणी, रूतता पाई काटा…!८
*
संस्कारांची, जुनाट वसने, गावकुसावर, मुरली
पाय धुळीच्या, पायघड्यांवर, माया ममता,उरली…!९
*
गाव घराचे,नवीन वासे, माणुसकीचा धागा
अजून ठेवली मम गावाने, हृदयामध्ये जागा…!१०
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

