श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मेंदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
हातावरची तुझ्या साजणी अजून आहे मेंदी ओली
मुरेल तितकी गडद होउनी खुलून येते छानच लाली
*
तुझे भेटणे ठरले तेव्हा निरोप होता तुला मिळाला
तूच मनाने अवघडलेल्या वाट पाहिली झाडा खाली
*
झाली ओळख पहिली तेव्हा मनात होती धडकी भरली
दोघांमधले मिटवून अंतर अशीच झाली होती बोली
*
होकाराने जुळले नाते फुलून गेलो आनंदाने
दोघांनाही तेव्हा कळले बोलायाचे हसून गाली
*
उगी कशाला भांडायाचे रुसवे फुगवे पाळायाचे
संसाराच्या प्रगतीसाठी होतच असते बोलाचाली
*
दोघांनीही चुका शोधल्या तिथेच झाली सारी गलती
समेटघडला क्रोध निवळला रात निवळली सुंदर झाली
*
जगणे म्हणजे कसरत असते जीवन भर ती करत जायची
जपत जायची सर्व माणसे वावरणारी सभोवताली
*
नकोस चिंता करत बसू तू खुशाल गावू जीवन गाणे
संसाराची खांद्यावरती पेलायाची असते डोली
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






