कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०२ – विजय साहित्य
☆ कालिदास दिन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
कवी कालिदास दिन
आषाढाची प्रतिपदा
काव्य शृंगार तिलक
प्रासादिक ही संपदा. १
*
जोडोनीया दोन्ही कर
समर्पित शब्द फुले
स्वीकारावी शब्दार्चना
लाभू देत विश्व खुले. २
*
कुलगुरु कालिदास
काव्य शास्त्र अनुभूती
शब्द संपदा संस्कृत
अभिजात कलाकृती. ३
*
महाकवी कालिदास
काव्य कला अविष्कार
निसर्गाचे सहा ऋतू
ऋतू संहार साकार.४
*
अलौकिक प्रेमकथा
मालविका अग्निमित्र
खंडकाव्य मेघदूत
सालंकृत शब्द चित्र. ५
*
शिव आणि पार्वतीची
कथा कुमार संभव
अभिज्ञान शाकुंतल
प्रेमनाट्य शब्दोच्चय.६
*
राजा पुरूरवा आणि
नृत्यांगना उर्वशीचे
अभिजात कथानक
निजरूप प्रतिभेचे. ७
*
मेघा बनवोनी दूत
यक्षराज आराधना
कालिदासे वर्णियेली
प्रेमसाक्षी संकल्पना. ८
*
अग्रगण्य अभिव्यक्ती
कालिदास साहित्याची
शब्दोशब्दी सामावली
शब्द शक्ती सृजनाची. ९
*
चित्रकार, शिल्पकार
यांचे वंदनीय स्थान
साहित्यिक शिरोमणी
कालिदास दैवी ज्ञान.१०
*
अशी प्रेरणा चेतना
व्यासंगात रूजलेली
कालिदासी साहित्यात
काव्यसृष्टी फुललेली. ११
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







