श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३५
☆ भैरवी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सांजवेळी भैरवी तो गात आहे
सूर्य ढळला होत गेली रात आहे
*
कंठ आता साथ त्याला देत नाही
ही सुरांची थांबली बरसात आहे
*
काजव्यांनी व्यर्थ केला संप जेव्हा
रात्र तेव्हा जिंकली युद्धात आहे
*
एकतारीचीच केवळ साथ होती
तार तुटली आणि झाला घात आहे
*
निर्गमाची वेळ झाली का तरीही
तो अडकला या इथे पाशात आहे
*
तेल म्हणजे श्वास आहे या प्रभेचा
संपता ते शांत होते वात आहे
*
या यमाला टाळणेही शक्य नाही
ठाकलेला तो उभा दारात आहे
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




