कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०४– विजय साहित्य
☆ बोलणाऱ्या भिंती…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
सुख, दुःख, राग, लोभ
चार भिंती बोलतात
भाव भावनांच्या रंगी
सुखैनैव रंगतात. .!१
*
अस्तित्वाचे ओरखडे
जाती बोलूनीया बोल
शिकविती एकमेका
साधुनीया समतोल…!२
*
भिंती बोलक्या घराच्या
देती घरा घरपण
नात्या नात्यांतील वाद
दडवीती क्षण क्षण…!३
*
बोलणाऱ्या भिंतीतून
कळे जग आहे कसे
मनातल्या स्पंदनांचे
भिंतीवर खोल ठसे…!४
*
भिंती बोलक्या शाळेच्या
संस्कारांची पाठशाळा
सुविचार, नकाशांची
रेखाटती चित्रमाला…!५
*
सामाजिक संदेशाचे
काम करी बिनचूक
रंग उडालेल्या भिंती
जाती बोलूनीया खूप…!६
*
लोक कला संस्कृतीचे
भिंती बोलक्या माहेर
पिढ्या जपती वारसा
माया ममता आहेर…!७
*
संसाराचा गोतावळा
चार भिंतीतला खेळ
शब्दाविना सांधतात
नात्या नात्यांमध्ये मेळ…!८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




