श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३७
☆ भावनेचा कोपरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
चंद्र होता सोबतीला लाजरा
साथ त्याला धुंद देतो मोगरा
*
तार होती वादकाने छेडली
स्पर्श होता देह झाला बावरा
*
पावसाची वाजता ही पावले
मी मनाचा मोर पाही नाचरा
*
शांत का ही होत नाही वादळे
ती म्हणाली या मनाला सावरा
*
ओठ व्हावे का तिचेही तांबडे
मी विड्याचा चावताना तोबरा
*
तृप्त झालो एवढा होतो तरी
एक कोरा भावनेचा कोपरा
*
चंद्र आहे रात्र सारी जागतो
ही सकाळी झोप येते पामरा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






