कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०६ – विजय साहित्य ?

☆ मृत्यू नंतर…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अक्षर छंद – १७ अक्षरी द्विपदी. वीस ओळी.)

‌मृत्यूनंतर, यमलोकाचा,

प्रवास होतो, सुरू

आठवणींना, काळीज वेडे,

पहा लागते, स्मरू.

*

यमदूताच्या, सवे निघाली,

आत्म ज्योतीची, यात्रा

तिथे न चाले, कलेवरी त्या,

इहलोकीची, मात्रा.

*

मृत्यू नंतर, हिशेब होतो,

पदा पदांचा, जेव्हा

गंगा यमुना, गालावरती,

खळाळ धावे, तेव्हा…!

*

नश्वर देहा, सोडून जाते,

व्यक्ती ‌लाडकी, जेव्हा

प्रवास चालू, परलोकीचा,

आज्ञातातील, तेव्हा.

*

मृत्यू नंतर, सरते सारे,

उरे न काही, मागे

आप्त मंडळी, करती चर्चा,

आठवणींना, जागे

*

मृत्यू नंतर, फिरतो आत्मा,

मागे उरते, माया

दहा दिसांनी, पिंडदान ते,

श्रृती स्मृतींची, छाया.

*

आला एकटा, जाई एकटा,

कैक जोडली, नाती

काळ घेऊनी, पहा धावतो

कुणा न लागे, हाती.

*

मृत्यू नंतर, कुणी पाहिला,

प्रवास ज्याचा, त्याचा

ज्ञात क्षणांनी, कर्म फलाचा

संचीत केला, साचा.

*

असा प्रवासी, सखा सोबती,

दूर देशी त्या, राही

हळव्या नेत्री, दुनिया त्याची,

कशी वागते, पाही.

*

अंतरातले, आभास त्याचे,

पहा सांगती, काही

संपून गेला, प्रवास आता,

मागे फिरणे नाही.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted