कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०७ – विजय साहित्य ?

☆ मित्र…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(सोळाक्षरी द्विपदी…)

दुःख जाणूनीया माझे,भाव मनीचे वाचतो,

ओठांवरी हास्य सदा, मन माझे सावरतो…!

*

शब्द तुझे आश्वासक,वादळात देतो साथ

जेव्हा उरतो एकटा, तुझ्या आठवांची बात…!

*

तेज किरणांचे होतो, हरवून जातो जेव्हा

“आहे मीच तुझ्या सवे!” बोल ऐकवीतो तेव्हा…!

*

शिकवतो जगायला, देतो आधाराचा हात

दुःख येता माझ्या दारी, होतो मदतीचा हात…!

*

मित्रा तुझे रूप असे, नाही शब्दातीत खेळ

सुख दुःख भावनांचा, आहे भावस्पर्शी मेळ…!

*

वेदनांचे दोन थेंब,जेव्हा दिसती डोळ्यात

डोळे पुसण्याला येतो, शब्द  धावत ओठांत..!

*

कधी चुका माझ्या झाल्या कधी वाटाच चुकल्या

रागावल्या दुरावल्या, नाही मैत्रीस मुकल्या…!

*

काळ जरी हा सरला,गेलो मित्रा दूर जरी ,

आपुलकी विश्वासाची बरसेल वर्षा उरी…!

*

जीवनाच्या सायंकाळी, नाही कुणावर रोष

अनुभवे आकळला, सारा स्वभावाच्या दोष…!

*

मैत्र आणि मैत्रीतला, तूच अनवट सेतू

शब्दाविना जाणतोस अंतरीचे सारे हेतू…!

*

धागा कधी न तुटतो, असा जरतारी शेला

सांभाळतो श्रृती स्मृती अनुराग, अलबेला…!

*

देवाकडे मागतो मी,”हात” तुझा हाती हवा

जन्मोजन्मी तूच मित्रा, दिठी मिठीत दिसावा…!

*

निरोपाचा नाही शब्द, माझ्या हृदय कोषात

तुझे संजीवन मित्रा, आठवांच्या आरशात…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted