सुश्री नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव पैंजण ☆ सुश्री नीलम माणगावे ☆

दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून

माझी आजी स्वयंपाकघरातून माजघरात

माजघराततून स्वयंपाकघरात

एखाद्या सम्राज्ञीसारखी

ठुमकत फिरायची.

ओझ्याने तिचे पाय भरून यायचे.

दुखायचे. खूपायचे.

घोटे काळे ठिक्कर पडायचे.

कधी जखम व्हायची, चिघळायची . रक्त वहायचं

पण नादाच्या भूलभुलैय्यातून बाहेर न पडता

पैंजणाखाली फडकं बांधून

जखमांना ऊब देऊन ती राज करायची.

 

माझ्या आईने पैंजण सोडून

नाजूक, हलक्या, तोरड्या घालायला सुरुवात केली

ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं

आपल्याच तोर्‍यात ती

स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची

सगळीकडे मनमुराद फिरायची

अधनं मधनं का होईना, तोरड्या टोचायच्या.

साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे.

पण सारे दुर्लक्षून

ती राज-राणीसारखी भिरभिरायची.

 

मी तर….अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं

काहीच नको म्हणून

पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं.

हलक्याशा चपला, बूट, सॅंडल घालता घालता

घरच नव्हे तर अंगणही ओलांडून

मी बाहेर पाऊल टाकलं

पण कधी कधी माझ्याही नकळत

चपला घसरतात. सॅंडल बोचतात. बूट चावतात.

पण मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी

मी सारे सहन करते.

 

आता मात्र माझी मुलगी म्हणते

आई, पैंजण नको, तोरड्या नको,

चप्पल, बूट, सॅंडल नको.

ते पकडणं नको. घसरणं नको.

काही काही काहीच नको.

अग पायाखालचे काटे मोडण्यासासारखे

पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी

पुढल्या का होईना शतकाआधी.

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

स्त्री वेदनेचे नेमके चित्रण