श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – उचित ना कळे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
उचित न कळे इंद्रियाचे ओढी /
मुखे बडबडी शिकलें तें //१//
*
आपण जाऊन न्यावें नरकास /
फळे बेताळीस कुळें जग //२//
*
अबोलणें बोले डोळे झांकुनियां /
बडबडी वांयां दंभासाठीं //३//
*
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी /
नाचे देखोवेखी जाणों खरे //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
माणसाला इंद्रिय सुखाची अनावर ओढ लागल्यामुळे आपल्या साठी योग्य काय आहे अयोग्य काय आहे याचे भानच उरत नाही. पण तो जे शिकलेला आहे ते मात्र तोंडाने केंव्हाही आणि काहीही बडबडत रहातो आपले डोळे झाकून भान हरपून जे बोलणे अयोग्य आहे ते ही बोलत सूटतो. तेव्हा बोलताना त्यांची होणारी केविलवाणी स्थिती बघण्या सारखी होते. पण जाणकारांना या सगळ्याची खरी पारख आहे. कोण वरवरचे बोलत कसा नाचत आहे तो मनोमन जाणत़ो.
माणूस इंद्रिय सुखाच्या आधीन होतो. आहारी जातो, तेव्हा तो आंधळा झालेला असतो. आपण जे करतोय ते आपल्या हिताचे आहे की अहितकारक आहे हे त्याला कळतच नाही. हे सर्व जाणून घेवून ही माणूस वायफळ बडबड करत सुटतो. कारण आपण चारबुके शिकलेलो आहोत याचा त्याला इतरांपढे टेंभा मिरवायचा असतो. म्हणूनच तो जे बोलणे योग्य नाही ते ही बोलत रहातो. आणि आपल्या इंद्रियसुखाची नको तितकी भलावण करून घेतो. पण खरोखरचा ज्ञानी माणूस हे सर्व सहजपणे ओळखतो. त्याला ख-याखोट्याची पूर्ण जाणीव होते. समोरचा माणूस फक्त वरवरच्या कोलांट्या मारत आहे हे त्याला कळते. पण अशा बेजबाबदार वागण्याने आपणच आपली इज्जत घालवून घेत आहोत हे मात्र बडबडनाराला कसे कळत नाही बरे.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






