श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – दैव तुम्हां अवघें आहे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
सदैव तुम्हां अवघें आहे /
हातपाय चालाया //१//
*
मुखी वाणी कांनीं कीर्ती /
डोळे मूर्ति देखावया //२//
*
अंध बहिर ठकलीं किती /
मूकी होती पांगुळ //३//
*
घरा आगी लावुनि जागा /
न पळे तो गा वांचेना //४//
*
तुका म्हणे जागा हिता /
कांहीं आता आपुल्या//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
देवाने तुम्हाला चालता पळता यावे म्हणून हातपाय दिलेत. त्यांचा उपयोग करून तुम्ही स्वतःचालायला शिका.
तुम्हाला बोलता यावे यासाठी तूमच्या मुखात वाणी ठेवली आहे. तुमचीच कीर्ती ऐकण्यासाठी कानही दिलेले आहेत. आंधळे बहिरे पांगळे असे कितीतरी अभागी जीवही येथे आहेत. तेही जगतातच की. मग तुम्ही धडधाकट असूनही स्वतःच्या हिताचा विचार का करत नाही. तुम्ही जागे असतानाच तुमच्या स्वतःच्या घराला आग लावता आणि वाचण्यासाठी तेथून पळून ही जात नाही मग असा माणूस कसाकाय वाचेल बरं. अशा वेळी आपल्या हिताचा विचार करायला नको का? आपण स्वतः ज्या गोष्टी करत आहेत त्या आपल्या आणि आपल्या समाजाच्या हिताच्या नाहीत. आपल्या कुटुंबाच्या हिताच्या नाहीत हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही त्या का टाळत नाही. कारण आपण खोटया मोह मायेच्या जाळ्यात पुरते अडकून पडलेले असतो आणि जाणूनबुजून त्या गोष्टी करत बसतो. म्हणजे आपणच आपल्या घराला आग लावत असतो. घराला आग लागली आहे आता आपण आपल्याला वाचायला येथून दूर पळायला पाहिजे हे ठाउक असूनही आपण तसे करत नाही. आपण अशा चुकीच्या ब-याच गोष्टी जाणूनबुजून करत असतो. त्यांचा त्याग करत नाही. सारे काही माहिती असते पण मोह सोडवत नाही. असे जर वागलात तर शेवटी तुमच्या नशिबी कपाळमोक्ष येईल. म्हणून स्वताच्या हिताचा विचार करा. देवाने जे दिले आहे त्याचा उपयोग करा. सन्मार्गाला लागा. आणि नामसंकीर्तनात रंगून जा. तेच तुमच्या हिताचे ठरेल.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






