सौ. अर्चना सुरेश देशपांडे
जीवनरंग
☆ नवं नातं… भाग-२ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
(हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सवाला रमा आईसह मारुती मंदिरात गेली होती. जन्मसोहळा झाल्यावर प्रदक्षिणा घालून प्रसाद घेण्यासाठी रमा थांबली होती. प्रसाद घेऊन वळल्यावर तो तरुण तिला दिसला. तिला एकदा वाटले या तरुणांबद्दल आईला सांगावे पण काही न बोलता ती आईसह घाईघाईने देवळातून बाहेर पडली.) इथून पुढे – –
एकदिवस कॉलेजमधील काम संपवून ती स्टॉप वर आली. वळवाचा पाऊस पडून गेला होता. अजूनही आकाशात काळे ढग होते. कधी परत पाऊस पडेल याची शाश्वती नव्हती. रमा बस स्टॉप वर येताच बस आली पण ती राजवाडा पर्यंत जाणारी होती. पाऊस येण्यापूर्वी निदान तिथपर्यंत तरी पोचले तरी हरकत नाही असा विचार करून तिने त्या बसने जाण्याचा निर्णय घेतला. राजवाडा स्टॉप येताच ती बसमधून उतरली. पुढील बस पकडण्यासाठी चालू लागली, पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठले होते. कपडे सांभाळत, खड्डे चुकवत रस्ता ओलांडत असताना तिला एका दोनचाकी वाहनाचा धक्का लागला आणि ती खाली पडली. लोक तिच्याभोवती जमा झाले. तिला मदत न करता त्या गाडीचा नंबर पाहिला का? पोलिसांना फोन करून नंबर कळवला का ?अशी नुसती चर्चा करत राहिले. पाठीमागच्या बसने तो तरुण आला. सर्वच बस काही कारणाने स्टॅन्ड पर्यंत न जाता राजवाडा पर्यंतच थांबत होत्या. त्यामुळे तो तरुणही तिथेच उतरला. बसमधून खाली उतरल्यावर गर्दी पाहून थांबला. गर्दीतून पुढे आला त्यावेळी रमा खाली बसली आहे हे त्यांनी पाहिले. त्यांने पटकन रमाला पाणी प्यायला दिले. थोडी तरतरी आल्यावर तिने उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उभे राहता येईना. तेव्हा त्या तरुणाने एक दोन जणांच्या मदतीने रमाला फुटपाथवर आणून बसवले. वेदनेने ती कण्हत होती. त्याने लगेच ऍम्ब्युलन्स ला फोन केला. ऍम्ब्युलन्स येताच तिच्यामधून रमाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. केस पेपर करताना हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी विचारले, ” आपले पेशंटशी नाते काय आहे? तो उदगारला, ” मी यांचा भाऊ आहे”सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर तिला इंजेक्शन देऊन झोपवले गेले, जवळच्या खुर्चीवर तिची पर्स होती. त्याने पर्समधून कॉलेजचे ओळखपत्र काढले. कार्डावर तिचे नाव, घरचा पत्ता आणि घरचा फोन नंबर होता. त्या क्रमांकावर त्यानं घरी फोन केला. फोन तिच्या आईने उचलला. ” मी सोहम कारखानीस बोलतोय, तुमच्या रमाचा अपघात झाला आहे थोडासा मार लागला आहे मी “स्नेह”
हॉस्पिटल मध्ये तिला दाखल केले आहे. तुम्ही”स्नेह “हॉस्पिटल मध्ये यावे.
मी बातमी ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती झटकन साडी बदलून रिक्षाने दहा मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोचली. सोहम वाट पाहत उभा होताच, एक स्त्री तिच्या चेहऱ्यावर काळजी आहे ते पाहताच सोहम पटकन पुढे झाला, ” आपण रमाच्या आहे का ?”
“हो मी रमा ची आई राधिका सबनीस, रमा कशी आहे ? कुठे आहे?”
“त्या आत मध्ये आहेत, नर्स ने इंजेक्शन दिले आहे त्यामुळे त्यांचा डोळा लागला आहे. काळजी करू नका”.
सोहम सोबत राधिका बाई रमाच्या खोलीत गेल्या. तिच्या चेहऱ्यावरून तिला अजून वेदना होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे तीअजून झोपलली आहे हे त्यांनी जाणले. तिला त्या अवस्थेत पाहतात राधाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले.. सोहमने त्यांना धीर दिला.
दोघेही डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी एक्स-रे पाहून ऑपरेशन करावे लागेल असे सुचवले. “उद्या सकाळी नऊ वाजता ऑपरेशन करूया “असे ते म्हणाले आणि “रक्ताची जरुरी लागल्यास रक्ताची सोय करून ठेवा “असाही त्यांनी सल्ला दिला.
डॉक्टर येऊन जातच नर्सने औषधांची यादी आणून दिली. सोहमने जवळच्या औषधाच्या दुकानातून औषधे आणून दिली. मी उद्या सकाळी साडे आठ वाजता येतो व रक्ताची सोय करतोअसं सांगून सोहमने राधाबाई चा निरोप घेतला. जगातअजूनही माणुसकी शिल्लक आहे याची रमाबाईंना खात्री पटली आणि आज सोहम च्या रूपाने परमेश्वर धावून आला हा विचार त्यांच्या मनात तरळून गेला. रात्री सोहम राधाबाईंसाठी जेवणाचा डबा घेऊन आला.
शब्द दिल्याप्रमाणे सोहम आठ वाजता आला. , पुढाकार घेऊन सर्व परिस्थिती हाताळत होता. ठरलेल्या वेळी ९ वाजता शस्त्रक्रिया करून प्लॅस्टर घातले गेले. तो पूर्ण दिवस रमा ग्लानीतच होती. दुपारचे जेवण सोहम आणि राधिकाबाईंनी हॉस्पिटल मधील कॅन्टीनमध्येच घेतले. रात्री सोहमची पत्नी, सीमा राधाबाई साठी जेवणाचा डबा घेऊन आली. तिच्यासोबत तिची छोटी मुलगी, स्वरा पण आली होती. ती गोड मुलगी भिरभिरत्या नजरेने एकदा रमाकडेआणि एकदा राधाबाईकडे पहात होती. राधाबाई नी बोलावताच त्यांचया मांडीवर जाऊन बसली. आता रमाची तब्येत जरा बरी होती. सीमाने रमाला स्वतः ची ओळख करून दिली. ” मी सीमा कारखानीस, हे माझे पती सोहम आणि मी आमची छोटी परी, स्वरा. सोहम वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. “
स्वरा तिच्याकडे पाहून गोड हसली. तिने आणलेलं गुलाबाचे फूल रमानेस्वीकारताच तिने रमाला फलाइंगकिस दिला. त्यानंतर सीमाने सांगितले की सोहम मला रोज सांगायचा की आपल्या रमणीसारखी दिसणारी एक मुलगी विलिंग्डन महाविद्यालयात नोकरी करते. ती मला भेटली की मला माझी बहिण, रमणी भेटल्याचा आनंद मिळतो म्हणून मी तिच्या वेळेस बाहेर पडतो. ती साधारणपणे तिच्याच वयाची होती. तिच्यात आणि तुझ्यात खूप साम्य आहे हे मला काल तुला पाहताच लक्षात आले पण आमची रमणी सहा महिन्यापूर्वी किरकोळ तापाचे निमित्त होऊन आम्हाला सोडून गेली. हे ऐकताच रमाने सोहम कडे पाहिले. त्याचे अश्रूंनी भरलेले डोळे पाहून तिचा जीव कळवळला, तिला खूप वाईट वाटले. सोहम आपल्याला बहिणीच्या ठिकाणी पहात होता आणि आपण मात्र त्याला मवाली समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो याची रमाला लाज वाटली. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.
“दादा मला क्षमा कर “हात जोडून रमाने विनवणी केली.
“क्षमा मागण्याचे कारण नाही खऱ्या अर्थानेमला आज माझी बहीण रमणी मिळाली याचा मला आनंद होत आहे. ” मी खरोखर भाग्यवान आहे आज मला अजून एक हक्काचा मुलगा मिळाला, सीमा सारखी गोड सून आणि गोड, लाघवी नात स्वरा. मिळाली “राधाबाई आनंदाने उद्गारल्या. रमाला सर्व गोष्टींचा खुलासा झाला आणि तिच्या
मनावर बरेच दिवस असलेले संशयाचे सावट दूर झाले.
– समाप्त –
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈





