श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ मायग्रेन… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(पण त्याच्यात सासू दुष्ट दाखवली.. ती सुनेला ठार मारायचा कट करत होती.. शी.. शी. शी.. असल्या मालिका टीव्ही वर दाखवतात.. आपली सून मुलीसारखी.. त्यानी टीव्ही बंद केला आणि त्या नातवाची वाट पाहू लागल्या.) – इथून पुढे —
दुपारी कुणाल आला तेंव्हा त्या खूष झाल्या. आता हा आहे मग हरकत नाही.. तिने जेवण गरम केल आणि नातू आणि ती जेवली. कुणालने तिला मित्रांच्या गमती सांगितलंय.. त्यामुळे ती खूष झाली.. पण जेवण झाल्यावर कुणाल म्हणाला
‘आजी मी क्लासला जातो.. आता पाचला येईन..
कुणाल क्लासच्या वह्या घेऊन बाहेर पडला आणि पुन्हा त्या एकट्या पडल्या.
जेवणानंतर थोडी झोप काढावी म्हणून त्या गादीवर पडल्या.. चार वाजता नातू क्लासमधून येईल, त्याला भूक लागेल.. काहीतरी त्याच्या आवडीचे खाणे करून ठेवावे म्हणूंन त्या किचनमध्ये गेल्या.. डबे उघडता उघडता त्यान्च्या हातात कुरमुऱ्याचा डबा आला.. मग त्यानी शेंगदाणे शोधून काढले.. चिंच मिळाली.. शेव होता.. त्यानी चिंचेचे पाणी तयार केले.
कुणाल आला तेंव्हा त्यानी मस्त ओलीभेळ त्याला खायला दिली. नातू खूष झाला… आजीच्या गळयात पडला. पाच वाजले तसा नातू खेळायला गेला. पुन्हा त्या ग्यालरीत येऊन बसल्या.. त्यान्च्या डोळ्यासमोर संध्यकाळच्या ऑफिस सुटल्यावर घरी धावताना भाजी घेणाऱ्या बायका आल्या.. सोमनबाई, वर्देबाई, जोशीबाई.. मुमताज.. साबिरा.. या सर्वजणी माझी निश्चित आठवण काढत असणारं. त्याना वाटले आत्ता उठावे आणि दुकानात जावे, पण.. त्यान्च्या डोळ्यसमोर मुलाचा आणि सुनेचा चेहेरा आला आणि त्यानी आवंडा गिळला.
रात्री सून राधा लवकर घरी आली आणि तिने गरमगरम जेवण बनविले आणि मुलाला आणि त्याच्या आईला वाढले. मग नवरा आल्यावर ती दोघे जेवायला बसली.
कित्येक वर्षानंतर कृष्णाबाईंनी दिवस आळसात घालवला.. असा आराम करायची त्याना सवय नव्हती.. रात्री त्याना झोप येईना.. या कुशीवरून त्या कुशीवर होताना त्याना पुढील आयुष्याची काळजी वाटू लागली.. अस रिकामं बसायचे? एक दिवस जाता जाईना… पुढे किती आयुष्य आहे कोण जाणे? दुकान सोडून आपले आयुष्य नव्हते.. तेच आपल्यापासून तुटले.. मग?
खुप उशिरा त्याना थोडी झोप लागली.. झोपेत त्या हमालावर ओरडत होत्या.. सोमणबाईंना मेथीची भाजी घयायचा आग्रह करीत होता. व्यवस्थित झोप झाली नाहीच.. शिवाय रोजच्या सवइने पहाटे जाग आलीच.. त्याचं डोकं दुखायला लागलं.. अर्ध डोकं.
दिवसभर कृष्णाबाई बेचैन होत्या. मुलगा.. सून.. नातू बाहेर पडली. पुन्हा त्या एकट्या.
त्यात अर्धडोक दुखतं होत. त्यानी वेखंड उगळालं आणि डोकयाला लावल.. पण काहीच फरक नाही. सून ओरडेल म्हणून त्यानी नातवासोबत दोन घास खाल्ले आणि त्या पडून राहिल्या.
नातू दुपारी क्लासला गेला. परत तो यायच्या आधी त्यानी कालसारखी भेळ केली.. आज त्यानी त्यात शेव घातले.. दही घातलं..
दही घातलेली भेळ नातवाला खुप आवडली. तो आजीला म्हणाला
“तुझ्यासारखी भेळ कोणी सुद्धा करत नाही.. तू पाणी पुरी का करत नाहीस?
आपलं दुखणारे डोके दाबत आजी. म्हणाली.. ‘तुझ्यासाठी पाणीपुरी पण करेन.. पण पुऱ्या बाजारातून आणव्या लागतील न्हवं..
“, ते मी आणतो क्लासमधून येताना.. तू मला फक्त पैसे दे.
पुन्हा त्या रात्री कृष्णाबाईंना झोप येईना.. तळमळत त्यानी रात्र काढली. उशिरा थोडी झोप लागली पटकन त्याना जाग आली.. अर्ध डोकं दुखू लागलं.. त्याना सहन होईना. डोकं कशावर तरी आपटावं अस त्याना वाटू लागले. सूर्य उगवेपर्यत त्यानी वाट पाहिली आणि त्या सुनेला म्हणाल्या.. “राधे.. डोस्क लई दुखतंय ग.. काय करू मी? काल वेखंड काढलं.. पण कमी नाही.
“हो का.. यांना सांगते डॉक्टरकडे न्यायला..
अकरा वाजता अनिल रिक्षा घेऊन आला आणि त्यान्च्या फॅमिली डॉक्टर कडे आईला नेले. डॉक्टरनी कृष्णाबाईंना विचारले..
‘काय होते?
‘अर्धडोस्क दुखतंय.. दोन दिस झाले..
डॉक्टरनी त्त्यांचे ब्लड प्रेशर चेक केले.. गोली नियमित घेत असल्याने प्रेशर बरोबर होते.. डॉक्टरनी पल्स रेट पाहिला. तो ठीक होता.. पोट, पाठ सर्व पाहिली.. सर्व ठीक होते.
“झोप लागते का?
“न्हाई.. दोन दिस झोप ठीक नाही.. अर्धडोकं लई दुखतंय.. डोस्क कुठ तरी आपटावं अस वाटतय..
‘बर.. तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे..
‘मायग्रेन म्हणजे काय हो डॉक्टर? मध्येच अनिलने विचारले..
“मायग्रेन म्हणजे अर्धशिशी.. अर्ध डोकं दुखतं.. अर्धी मान दुखते.. असह्य वेदना होतात.
“व्हय डॉक्टर,.. माज डोस्क लई दुखतं.. कशामुळे होतो मायग्रेन?
“मायग्रेन हा चिवट आजार आहे.. जाता जाता जात नाही.. सर्दी सुकली असेल तर होतो मायग्रेन किंवा काळजी चिंता जास्त करणाऱ्यांना सुद्धा होतो.. किंवा मेंदू मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर होतो… आपण बघू.. आजींना मी गोळया देतो दुखणे थांबण्याचा आणि झोप लागावी म्हणून रात्रीची एक गोली देतो. दहा दिवसांनी परत या.
कृष्णाबाईच्या गोळया सुरु झाल्या. झोपेची गोली घेतल्याने थोडी झोप लागत होती.. पण झोप आनंदाची नव्हती, पण डोके दुखायचे थांबत नव्हते. पण त्या नातवासाठी पाणीपुरी किंवा भेळ करत होत्या. एकदा कुणालने आपल्या मित्रांना घरी आणले. बाईंनी सर्वाना पाणीपुरी दिली. त्याचे मित्र एवढे खूष झाले आणि म्हणाले.. आजी, उदया शेवपुरी बनवाल.. आजीने सर्वाना शेवपुरी खायला दिली.. पोरे जाम खूष.. मित्र कुणालला सांगू लागले.. तूझ्या आजीसारखी पाणीपुरी, शेवपुरी कोणी भैय्या सुद्धा करू शकणार नाही.. कुणाल खूष.
कृष्णबाईचे मायग्रेनचे दुखणे काही कमी होत नव्हते. गोली घेतली की दोन तास बरे वाटायचे.. पण परत सुरु. पुन्हा अनिल आईला डॉक्टरकडे घेऊन गेला.. डॉक्टरनी नुरोफिजिशियन शहा डॉक्टरना भेटायला सांगितले. अनिल आईला शहा डॉक्टरकडे घेऊन गेला.. शहा डॉक्टरनी तपासले औषधे दिली आणि या गोळ्यांनी कमी न वाटल्यास MRI काढून बघूया असा सल्ला दिला.
डॉ. शहा यांच्या गोळ्या कृष्णाबाईंनी सुरु केल्या.. झोपेची गोळी पण सुरु होतीच. बाईंना कळेना एवढी वर्षे कसली गोळी नव्हती पण आत्ताच पाचसहा दिवसात काय हे सुरु झाले?
डॉ. शहा यांच्या गोळया घेऊनही त्याना कमी नव्हते.. थोडा वेळ कमी वाटे. पुन्हा डोके दुखणे सुरु.
रोज संध्याकाळी कुणालची मित्रमंडळी घरी येत होती.. त्याना त्या भेळ, पाणी पुरी, शेव पुरी देत होत्या.. मुले खूष होत होती. एकदिवस कुणालचा मित्र अभय म्हणाला.. आजी, तुम्ही पाणीपुरी.. शेवपुरीचा स्टॉल का लावत नाही? तुमच्या हाताला चव आहे.. कुणालची आजी म्हणाली.. छे.. मी आपली तुमच्यासाठी बनवते.. माजा नातू तशी तुमी. मुले घरी गेली.. पण कुणाल विचार करू लागला.. खरेच.. आजीच्या हाताला चव आहे.. आणि घरी राहून राहून आजी कंटाळली आहे. तो आजीला म्हणाला
“आज्ये.. आपली जुनी भाजीची गाडी मागे पडून आहे.. मी ती दुरुस्त करून आणतो.. आपण भेळ, पाणीपुरीची गाडी सुरु करू.. फक्त संध्याकाळी.. मी क्लासमधून आल्या नंतर. मी खेळायला जाणार नाही.. आपण..
“अरे नको रे.. तुजा बाबा काय म्हंणलं?
‘आई बाबाला कळवायचंच नाही.. फक्त तुझ्यात आणि माझ्यात..
“अरे पण माझा हा मायग्रेन.. डोस्क दुखतं माझं.. शहा डॉक्टर काय ते म्हणत होता..
‘ते बघू नंतर.. मी मागच्या दारची गाडी दुरुस्त करून आणतो..
कुणाल त्त्यांची जुनी भाजीची गाडी घेऊन आला.. त्याने सायकलवाल्यकडे जाऊन हवा भरली… सुतारकडे जाऊन फळी ठेकून घेतली. आजीकडून पैसे घेऊन कुरमुरे, शेव, पुऱ्या, चिंच, शेंगदाणे आदी घेऊन आला.
आई बाबांना न कळवता एक दिवस तो गाडी रस्त्यावर घेऊन आला. पार्क समोर एका झाडाखाली त्याने गाडी लावली.. घाबरत घाबरत त्याची आजी बाकी सामान घेऊन आली.. आणि सुरु झाले.. कुणाल भेळपुरी सेंटर.
आजीला वाटतं होते, नातवाने हौस केली.. गाडी उभी केली. पण आपली डोकेदुखी आपल्याला काही करायला देईल काय?
पार्क मध्ये जाणाऱ्या बायकांचा ग्रुप गाडीकडे थांबला.. आजी आणि नातू भेळ बनवत आहेत हे पाहून त्यानी दहा भेळेची ऑर्डर दिली. आजीनी झटपट भेळ बनवली.. सर्व बायका खूष झाल्या. मग लहान मुले आली.. त्यानी शेवपुरी सांगितली.. आजीनी शेवपुरी करून दिली.. सात वाजेपर्यत आणलेला सर्व माल संपला. बाराशे रुपयाची विक्री झाली. खर्च वजा होता चारशे रुपये सुटले. दोघे घरी आली.
कृष्णाबाईच्या लक्षात आले.. मघापासून डोके दुखायचे थांबले. डोक्यकडे आपला लक्षच गेला नाही. दुसऱ्यादिवशी आजीने नातवाकडे पंधराशे रुपये दिले.. परत सायंकाळी आजी आणि नातू हजर. काल भेळ खालेल्या बायकांनी जाहिरात केली असावी.. कारण आज कालच्या बायका आल्याचं पण त्यान्च्या ओळखीच्या इतर बायका पण आल्या.. त्यानी भेळ खाल्ली.. पाणीपुरी घेतली.. सतत लोक येत राहिली. रात्री आठ वाजेपर्यत आजी नातवाने सर्व माल संपवीला. आज तीन हजाराचा धंदा झाला. आजी खूष.. नातू खूष.
आजीचे मायग्रेन गेले.. झोप गाढ येऊ लागली.
अनिलला वाटतं होते.. अजून आई गोळया घेत असेल म्हणून डोकेदुखी थांबली.. म्हणून त्याने आईला म्हंटले
“आये.. अजून मायग्रेन आहेच का?आणि झोप कशी लागते?
आजीने नातवाच्या हातावर टाळी दिली आणि म्हंटले… अन्या.. झोप मस्त आनी मायग्रेन गेलं भुर्रर्र..
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





