सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ भेटला विठ्ठल ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“हो या तुम्ही नक्की,.. मला निरोप मिळालाय जोशींकडून, वारीला जाणाऱ्या चार महिलांची सोय करायची आहे म्हणून,.. तुमच्या ओळखीच इथं कोणी नाही म्हणून संकोच करू नका,.. या आपलंच घर समजून,.. दोन तासांचा तर प्रश्न आहे हो,.. मी एकटीच राहते,.. या तुम्ही पत्ता पाठवलाय तुम्हाला व्हाट्सएप वर एवढं बोलत त्या आजींनी फोन ठेवला….”

“आजीच असाव्यात” असं मनात निशा म्हणाली,… पण अजूनही हॉस्पिटलमध्ये काम करतात म्हणजे असेल मावशी किंवा काकूच्या वयाची असंही डोक्यात आलं,.. आवाज जरा थकलेला होता पण वपुच्या स्वर कथेची आठवण झाली लगेच आताच नको फोनवरून ठरवायला आजी का मावशी ते असं म्हणत मनातला विचार झटकत ती तयारीला लागली,..

नेहमी प्रवासाला भरतो तशी बॅग भरायची नाही हे आजीने सांगून झालंच होतं,.. “अग निशा वारी काय पसारे घेऊन यायला नाही शिकवत,.. वारी त्या विठ्ठलाच्या नामाचा पसारा मनात भरायला शिकवते,.. वारी सगळं सुख म्हणजे त्याच नाम मुखात घेऊन चालायला शिकवते,.. वारी माणसातला माणूस ओळखायला शिकवते,.. आपलं हे भौतिक विश्व नाही भरायचं हं गाठोड्यात,.. लागतात म्हणून दोन वस्त्र बस,.. बाकी तुमचे चोचले तिथे नको. ” असं गेल्या पंचवीस वर्षे वारी करणाऱ्या आपल्या सखू आजीने ठणकावले होतेच ते सगळं आठवून तिने कमीत कमी सामान घेतलं,.. आता फोन केलेल्या बाईकडे उद्या एक दिवस उतरून फ्रेश होऊन,.. पुढं वारीत मिसळून जायचं होतं,.. फक्त हा एक दिवस कोणी ओळखीच आहे का पाहावं म्हंटल तर, आपली आत्या, त्या मंत्रिणींचे नातेवाईक नाहीच म्हंटल पण शाळेतल्या जोशींनी ह्या बाईचा नंबर दिला,.. तेंव्हा सखू आजीच वाक्य आठवलं, “वारी म्हणजे माणसांमाणसातून भेटणारा विठ्ठल,.. “तश्याच ह्या बाई असाव्या,.. हे सगळं मनात सुरू असताना तिला वाटलं आपण त्यांच्याकडे जाणार आपली ओळखपाळख नसताना तर काहीतरी न्यायला हवं त्यांना पण काय न्यावं हा विचार करत ती देवाजवळ दिवा लावण्यास वाकली आणि तिला एकदम सुचलं दिवा,.. दिवाच न्यावा का,..? तिने पटकन मागच्यावर्षी वास्तुशांतीत आलेल्या गिफ्टचं पोत उघडलं,.. नवऱ्याने सगळे गिफ्ट बांधून ठेवले होते,.. आहे तो पसारा पुरे म्हणत,.. मग असं कोणाला काही द्यायचं असलं की पोत उघडलं जायचं,.. आताही पोत्यातला तिला तो लाईटचा दिवा सापडला,.. सुंदर नक्षीकाम केलेला,.. जुन्या पितळीदिव्यांसारखा पण एक गोष्ट नवी होती त्यात,.. वात दिसत होती पण ती न लावताही पेटवलेली,.. त्याची बारीक लाईट सिस्टीमच खुप छान होती,.. त्या दिव्याला मस्त जाड साखळी होती कारण तो जुन्या घडणीसारखा आधुनिक लामणं दिवा होता देवघरात लावला तर बरोबर मूर्तीचा चेहरा उजळून निघायचा,.. आपल्या माहेरी होता असा आपल्याला खुप आवडायचा म्हणून आत्याने मुद्दाम हा गिफ्ट दिला पण थोडा मॉडर्न आहे ग बाई लाईटच्या वातीचा,.. तुझ्या बंगल्याला शोभेल असा तेलवातीची गडबड नको म्हणून तिने हा दिवा दिला होता,.. एक क्षण वाटलं तिला हा नको द्यायला म्हणूज बाकी गिफ्ट थोडे चाळले,.. कुठे बरण्याचे सेट, कुठे डायनिंग कव्हर, फ्लॉवर पॉट, नाईट लॅम्प असे गिफ्ट होते पण शेवटी हाच म्हणत तिने तो बॅगेकडे आणला,..

सगळी तयारी झाली, चार मैत्रिणी घेऊन ती निघाली,.. सगळ्या कुजबुजत होत्या, ” अनोळख्या घरी जायचं कसं,..? “पण जसं जस गाव जवळ आलं तसं त्या बाईचे फोनवर फोन या चुकू नका,.. रिकश्यात बसल्या की मला बोलायला द्या,.. रिक्षावाल्याला त्या स्वतः बोलल्या आणि रिक्षाने त्यांच्या दाराशीच नेऊन सोडलं,.. तसं दरवाज्यातून अगदी हसरा चेहरा असलेल्या बाई म्हणाल्या,.. “या या वाटच बघत होते,..

आले वारकरी दारी, होईल दिवाळी साजरी,.. “

सगळ्याजणी उतरून आत गेल्या,.. मावशींनी पाणी आणलं आणि तिथेच बसल्या,.. हो मावशीच्या वयाच्या होत्या त्या,…. काही गप्पा झाल्या आणि मावशी उठल्या तेवढ्यात निशाची बॅग पायाला लागून त्या जरा पडायला आल्या,.. चटकन म्हणाल्या, “माफ करा हं चहा करायला उठले पण रोजच्या जीवनात ह्या बॅगाची सवय नाही ना,.. ह्याला जरा पलीकडे ठेवता का,..? “आणि त्या वाकून बॅग चाचपडू लागल्या,.. सगळ्यांना धक्काच बसला मावशी अंध होत्या,.. तरीपण ती छोटी खोली अगदी टापटीप होती,.. त्या अजूनही हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या,.. आपल्या सारखी चार अनोळखी माणसं त्या प्रेमाने बोलवत होत्या,.. निशाला आश्चर्य वाटलं,.. ती पटकन म्हणाली देखील, ” माफ करा हं,.. आम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला दिसत नाही,.. आमच्यामुळे उगीच तुम्हाला त्रास,.. “त्यावर मावशी हसून म्हणाल्या, “अग त्रास कसला,.. गेली कित्येक वर्षे एकटी राहाते, ह्या डॉक्टरने विठ्ठल बनून आश्रय दिलाय,.. मी आणि नवरा वारी चुकवत नव्हतो,.. एका वारीत अपघात झाला,.. ते गेले आणि माझी दृष्टी गेली,.. तिथल्या कॅम्पमध्ये हा डॉक्टर सेवा द्यायला आला होता,.. मला मुलबाळ नाही म्हंटल्यावर मला त्याने आश्रय दिला,.. सगळा दवाखाना मी सांभाळते म्हणजे माझा विठोबा बघतो इथे राहून,… डॉक्टर इथून दहा मिनटाच्या अंतरावर राहतात,.. गेटवर एक वॉचमन आहे,.. आणि इथे माझा हा पाठीराखा म्हणत त्यांनी कोनाड्याकडे हात केला,.. काळ्याभोर दगडातील सुंदर विठ्ठल मूर्ती तिथे उभी होती मंद हास्य करत,.. तिला तुळशीची माळ घातलेली होती,.. सगळ्याजणी मूर्ती पाहात असताना मावशी म्हणाल्या, “तुम्ही आवरा तुमचं मी चहा करते म्हणत कपाटाच्या मागे त्या गेल्या,.. निशाने तिथे डोकावलं तर टेबलावर गॅस होता चहाची सगळी तयारी केलेली होती,..

मावशी एकदम म्हणाल्या, “निशा, एवढा गॅस पेटवून दे, आज माझी फरशीवाली मुलगी आली नाही ए, रोज ती असली की गॅसजवळची काम आटपून घेते,.. डॉक्टरने तसं तिला सांगून ठेवलं आहे,.. ती आली नाही की मी डबा मागवून जेवते पण ती नसली की एक मोठं काम अडून जातं माझं माझ्या विठुला अंधारात बसावं लागतं ग,.. “त्यांच्या ह्या वाक्यावर निशाने एकदम विठू कडे बघितलं आणि तिला विठू मघापेक्षा आता वेगळाच हसताना दिसला,.. तेवढ्यात एक मैत्रीण मावशीला धरून बसवत म्हणाली,.. “आज आराम करा तुम्ही, आम्ही लेकीच तुमच्या तुमच्याकडे हक्काने आलो,.. आम्ही उद्या गेलो की परत तुम्ही तुमची काम करा,.. “मावशीने विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत हात जोडले,.. बरा भेटलास रे ह्या पोरींमधून तू आज,..

चहा, अंघोळी, जेवण आटोपली,.. त्या छोट्याश्या खोलीत कोनाड्यात तो उभा आणि खाली ह्या पाचजणी पहुडलेल्या,.. पलंगावर मावशी बसून वारीच्या आठवणी सांगण्यात रमली होती,.. निशाला वाटलं किती अनोळखी आहे ही मावशी आपल्या सगळ्यांना,.. पण तरीही किती आपलेपणाने तिने आपल्याला ह्या छोट्या खोलीत मोठं मन करून जागा दिली आहे,.. खरंतर ह्या चौघींपैकी दोघींच्या ओळखिच्यांनी आम्हीच बाहेरगावी जाणार आहोत हे सांगून हात झटकले,.. आपल्याही त्या दूरच्या आत्याला आपण विचारलं तर म्हणाली, “एकटी असती तर जमलं असतं ग,.. एवढ्याना नाही जमणार,.. खोल्या चारच आहेत ना,.. किती वेगवेगळी कारणं,.. पण ह्या मावशीशी कुठले हे ऋणानुबंध ह्या विचाराने निशाचे डोळे भरून आले,.. ती उठून मावशीजवळ गेली,.. त्यांचा हात हाती घेत म्हणाली, “मावशी तुम्ही एवढी वर्ष वारी केली,.. पण विठुने तुम्हाला अंध केलं, जोडीदार हरवला,.. मग तरी त्याची मूर्ती ठेवून परत सगळं श्रेय त्याला का,..? “

मावशी म्हणाली, “निशा वारी म्हणजे फक्त चालणं नसतं,.. चालताना माणसाचं माणसाशी जगणं असतं,.. एकमेकांना धरून पुढे नेणं आणि जाणं असतं,.. आयुष्यात घटना घडल्या म्हणजे त्याला दोष देऊन त्याच्याशी नातं तोडून कसं चालेल,.. अग तोच तर माणसातला देव दाखवायला बसलाय,.. डॉक्टरांनी येऊन क्षणात जगणं सोपं केलं माझं,.. त्या वारीत नवरा गेला पण काहीही सम्बन्ध नसताना सांभाळणारा लेक दिला ना,.. त्या वारीत तर मला विठ्ठल भेटला,.. मग त्याला कसं विसरू ग म्हणत मावशीने परत विठ्ठलाला हात जोडले,.. डॉक्टर इथं रोज येतो, माझी आस्थेने चौकशी करतो,.. इथल्या सगळ्यांना माझी काळजी घ्यायला सांगतो,.. दृष्टी नाही म्हणून मला तो दिसत नाही काळा की गोरा ग,.. पण मला तो भेटतो कारण त्यानी माणूसपण जपून मला आनंदान जगवलंय,.. मला म्हणाला, ” तुला घरी नेऊ शकतो पण तुझा स्वाभिमान पण टिकायला हवा मावशे,.. त्याची ही हॉस्पिटलची पंढरी मी सांभाळते,.. तो माझ्या विठू सारखा कमरेवर हात देऊन नाही माणसांचे प्रश्न सोडवत पण त्याच्या हातात माझ्या विठुची जादू आहे,.. वारकऱ्यासारखे त्याचे पेशंट इथं जेंव्हा त्याची वाट पहात बसतात आणि तो येऊन त्यांना वेदना मुक्त करून दिल्यावर ते पेशंट जे बोलतात ते ऐकून वाटतं,.. खरंच आता आपल्याकडून वारी होणार नाही म्हणून ह्या डॉकटर रूपातच आता आपल्याला विठू भेटला आणि ही पंढरी दिली आपल्याला,.. एवढं बोलून मावशीने डोळे टिपले,.. “

सकाळी सगळ्या लवकर तयार झाल्या,.. आज वाटेवर येणाऱ्या माऊलीच्या दिंडीत सगळ्यांना सामील व्हायचं होतं,.. सगळ्यांनी मावशीला नमस्कार केला,.. निशाने तो दिवा मावशीच्या हातात दिला,.. तेंव्हा मावशी म्हणाली, “तुमच्या कडून काही घ्यावं म्हणून तुम्हाला नाही ठेवलं इथे, तुम्ही माझ्या लेकी असल्यासारख्या आहात,.. काही देऊ नका. “निशा म्हणाली, “मावशी फरशीवाली आली नाही तर विठुराया अंधारात राहतो ना,.. मग हे विठूसाठी समज,.. मावशी हसून म्हणाली, “थट्टा करतेस का माझी, अग मला दिवा लावताच येत नाही ना,.. निशाने तोपर्यंत मावशीच बोट त्या वातीकडे नेलं आणि म्हणाली, “ही वात पेटवायला काडी लागत नाही,.. ही बटणाने पेटते,.. आता विठू कधीच अंधारात नसेल तुमचा,.. म्हणत मावशीचा हात दिव्यावर फिरवला,.. साखळी हाताला लागताच मावशी म्हणाली, “हा लामणदिवा आहे का,..? “चेहऱ्यावर उजेड धरेल तो आता,..

निशा म्हणाली, ” हो अगदी चेहऱ्यावर,.. तिने कोनाड्यात दिवा लटकवला,.. चेहऱ्यावर सुंदर तांबूस पिवळा प्रकाश पडला,.. त्याक्षणी चेहऱ्यावरचे भाव झरकन बदलले,.. हे सगळं किती छान घडलं ह्याच निशाला मनात आश्चर्य वाटत होतं,.. हा दिवा किती योग्य व्यक्तीसाठी आणल्या गेला,.. आणि ह्या मावशीच्या भेटीमुळे तर वारीला निघण्याआधीच आपल्याला जणू विठ्ठल भेटला,.. असा भाव मनात येऊन निशाचे डोळे पाणावले,.. तिने पटकन मावशीचा निरोप घेतला,.. सगळ्याजणी त्या दिंडीत पावली खेळत सामील झाल्या,.. त्या ठेक्यात सगळं भौतिक सुख हरवलं होतं,.. आणि – – 

आणि – – उरले होते दोनच शब्द.. भेटला विठ्ठल माझा…. भेटला विठ्ठल…..

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments