श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

सकाळची वेळ, नेहमीप्रमाणे सायली देवपूजा करत होती. मोबाईलवर यू ट्यूबवर काही भजन लावलेले होते, आणि अचानक सायलीने संतोषला – तिच्या नवऱ्याला हाक मारली, “संतोष, बाबा रे, हा फोन बघ रे. भजन चालू असता अचानक बंद पडला आहे, आणि स्क्रीन बघ कसा झालाय. . . “.

संतोषने तिचा फोन हातात घेतला. जुन्या काळी अँटिनावाले टीव्ही असताना, सेटिंग बिघडलं की टीव्हीवर कसं रंगीबेरंगी वाकडंतिकडं चित्र येऊन ते चित्र तसंच फ्रीज व्हायचं, तसं काहीतरी स्क्रीनवर दिसत होतं.

“मिशन मंगळ” चित्रपट पाहून आणि आजवरच्या अनेक प्रत्यक्ष अनुभवांनी, विशेषतः फोनबाबतीत असं काही बिघडलं की फोन “रिस्टार्ट” करायचा, ९९% वेळा चूक दुरुस्त होते आणि काम पुन्हा सुरळीत सुरू होते, हा त्याचा अनुभव.

त्यानुसार त्याने रिस्टार्टसाठी फोनचे बटण दाबले. पण फोन रिस्टार्ट झालाच नाही.

तो पूर्णच बंद झाला.

“बॅटरी किती टक्के चार्ज होती ग? ” त्याने पृच्छा केली.

“होती, ६०-७०% तरी होती. ” ती.

याने तरी फोन परत चार्जिंगला लावला. तो थोड्या थोड्या वेळाने फोन तपासत होता, पण काहीच धुगधुगी नव्हती.

याने तिच्या भाच्याला फोन केला. तो नव्या जमान्याचा प्रतिनिधी या नात्यानेही आणि तो तिच्या माहेरचा होता या नात्यानेही, अशा दोन्ही कारणांनी, सर्वच गोष्टींमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं.

आणि कदाचित खाजगीत त्याने कबूलही केलं असतं, की या भाच्याला अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये चांगली गती होती.

तर त्या एवंगुणविशिष्ट भाच्याला फोन लावला गेला. पेशंटची लक्षणं आणि सद्य परिस्थिती सांगितली गेली.

“काका, फोन पाण्यात पडला होता का? ” भाचा विचारता झाला. त्याचं हे संबोधन संतोषला मुळीच आवडायचं नाही. सायली त्याची आत्या, पण भाचा तिला “ताई” म्हणायचा, आणि याला “काका”! झाले असतील थोडे केस कमी, पण म्हणून काय लगेच “काका” म्हणायचं?

पण नेहमीप्रमाणे त्याने आलेला राग गिळला.

“नाही रे, ती म्हणाली नाही तसं काही”. तो विनम्रतेने म्हणाला.

“मग, usually, तुम्ही म्हणता तसा स्क्रीन झाला, तर motherboard चा प्रॉब्लेम असतो. Motherboard बदलायचा म्हणजे पाच दहा हजार रुपयांचा तरीचा खर्च असतो. पण काका, त्यापेक्षा तुम्ही ताईला नवीन फोनच घेऊन द्या ना. दोन वर्षं झाली ती हाच फोन वापरती आहे, ” तिच्या माहेरच्या भाच्याला – नेहमीप्रमाणे – तिचा पुळका आला होता.

“हो का? आणि मग मी पाच वर्षं झाली तोच फोन वापरतोय, ते दिसत नाही का तुला लेका! ” असं जहाल उत्तर त्याच्या तोंडी आलं, पण नेहमीप्रमाणे अत्यंत समजूतदारपणे त्याने ते गिळून टाकलं.

पण पाचेक हजाराची फोडणी बसू शकते, हे ज्ञान त्याला झालं.

त्यापेक्षा फोन सर्व्हिस सेंटरला तपासणीला न्यावा हा एक पर्याय त्याच्या हे लक्षात आला.

पूर्वी परीकथांमध्ये जसा राक्षसाचा जीव कुठल्यातरी डोंगरावरच्या पिंजऱ्यातल्या पोपटात असायचा, तसा हल्ली प्रत्येकाचा प्राण त्याच्या मोबाईलमध्ये अडकलेला असतो. बायकोच्या मोबाईलचे लॉक अगदी नवऱ्यालासुद्धा ओपन करता येत नसते आणि त्याच्या फोनला तिनं हात लावला, तर त्याचा जीव एकाच वेळी घाबराघुबरा आणि कासावीस दोन्ही होतो, अशी परिस्थिती.

तर, तो मृतप्राय झालेला फोन घेऊन या दोघांची वरात सर्व्हिस सेंटरला निघाली. फोनचा वॉरंटी काळ संपला असल्यामुळे आलेला खर्च आपल्यालाच भोगायचा आहे, हे त्याला दिसत होतं. आणि “तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, ” असं स्वतःला बजावत तो सर्व्हिस सेंटरला पोचला.

सायलीचा, संतोषच्या बायकोचा फोन बिघडला होता. म्हणून फोन दुरुस्तीला टाकण्यासाठी ते दोघं सर्व्हिस सेंटरला पोचले. आधी तिच्या भाच्याला याने फोन कसा बंद पडला ते सांगितलं होतं. आता त्याने पुन्हा सगळी रामकथा त्या सर्व्हिस सेंटरला काऊंटरवर जो पोरसवदा इंजिनियर बसला होता, त्याला सांगितली.

“अंकल, फोन भिजला होता का पाण्यात? ” 

या नव्या पिढीचं आपण काय घोडं मारलंय, कोण जाणे. एक जण “दादा” म्हणेल तर शप्पथ. त्याच्या मनात विचार येऊन गेला.

मग पुन्हा कथानकाचा फ्लॅशबॅक देण्यात आला.

जणू हा त्या तिच्या भाच्याचा “मेले मे बिछडा हुवा भाई” असावा तसं त्यानेही motherboard बद्दल शंका व्यक्त केली.

“पण हा चार्ज का होत नाहीये, ते बघायला पाहिजे. कदाचित याचं चार्जिंग सॉकेट बिघडलं असेल, म्हणून हा प्रॉब्लेम आला असेल. “

“बरं, मग आता काय करावं लागेल? ” संतोष विचारता झाला.

“तुम्ही असं करा, हा फोन इथं ठेवून द्या. फोनचा imei नंबर ठाऊक असेल ना तुम्हाला? ” 

प्रत्येक फोनला एक स्वतंत्र imei क्रमांक असतो आणि त्या क्रमांकावरून त्या फोनची इत्थंभूत माहिती मिळते, हे त्याला माहीत होतं, पण बायकोच्या फोनची एवढी कुंडली त्याला पाठ नव्हती.

“बघतो, घरी फोनचा box आहे ठेवलेला, त्यावरून सांगतो, ” संतोष.

“आमच्याकडे या मॉडेलचे चार्जिंग सॉकेट आहे का ते बघतो. नसेल तर मागवून घेतो. आज शनिवार आहे, मंगळवारपर्यंत येईल. मग ते सॉकेट लावतो, फोन चालू करतो, आणि मग काय प्रॉब्लेम आहे ते बघतो. ” वत्सा, तुजप्रत कल्याण असो या थाटात तो टेक्निशियन वदता झाला.

“आणि अंकल, कदाचित काही serious problem नसेलही, ” त्याच्या या आशावादी वाक्याने संतोषचा जीव थोडा भांड्यात पडला, “तुम्ही माझा हा नंबर घ्या, मला संध्याकाळपर्यंत फोन करा, मी तुम्हाला स्टेटस सांगतो. ” असं म्हणत त्याने मोबाईलवर संतोषच्या नाव नंबरची चिठ्ठी लावली आणि यांना निरोप दिला.

मंगळवारी संतोष ऑफिसमधून येताना दारातच सायली त्याची वाट पहात उभी असलेली दिसली. तो मोहरला, त्याला लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस आठवले, तेव्हाही सायली अशीच त्याची वाट पहात दारात तिष्ठत असायची हे त्याला आठवलं. आणि त्या धुंदीत तो तिला जवळ घेणार इतक्यात ती त्याला म्हणाली, “चला, पटकन सर्व्हिस सेंटरला जाऊन येऊ या, नाहीतर बंद होईल ते. “

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments