सौ अंजली दिलीप गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ मिशन अक्षय… भाग-२ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

(ऑपरेशनने पूर्ण स्पायनल कॉर्ड तर जुळवला. आता व्हर्टिब्रल कॉलमचे व्हर्टिब्रे जुळवणे कठीणात कठीण होते. अर्थात ही तात्पुरती डागडूजी ठरणार होती. सांधलेल्या हाडांमध्ये ओसिफिकेशन होऊन व्हर्टिब्रल कॉलम पूर्ण तयार व्हायला काही दिवसांच्याच काय, आठवड्याचा, महिन्याचाही अवधी लागणार होता.) इथून पुढे —- 

X आणि Y बाहेरून जोडताना खरी कसरत होती. कंबरेच्या भोवती टाक्यांची मार्च तयार झाली होती. एवढे सगळे टाके घालून पूर्ण होईपर्यंत किरण पूर्ण दमून गेला होता. सिजर आणि नीडल खाली ठेवल्यावर त्याला एकदम ग्लानी आल्यासारखे झाले.

ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरही दोन ट्रेंड नर्सेस, अनेस्थेटिस्ट, आणि दोन असिस्टंट डॉक्टर्स पेशंट जवळ उभेच होते. त्या उरलेल्या दोन बॉडीज आता निकामी होत्या. पण याही काही काळ बर्फामध्ये प्रिझर्व करणे गरजेचे होते.

किरणने तर फार मोठे काम केले होते. पण सीनियर डॉक्टर नवलकरांपुढे आता खूप प्रश्नचिन्हे आ वासून उभी होती. पोलिसांना, तरुणांच्या पालकांना, पत्रकारांना काहीतरी सांगणे जरुरीचे होते. शांतपणे विचार करून दोन दिवस काहीही न सांगता, त्या नवीन बॉडीचा रिस्पॉन्स बघूनच काय ते सांगावे असे त्यांनी ठरवले.

किरणने आपल्या तिकडच्या गाईड्स ना, कॉलेजच्या डिनना, आणि मित्रांना आपण केलेल्या या ऑपरेशनची इथंभूत बातमी ईमेल करून कळवली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनलाही आपल्या या धाडसी प्रयोगाचा रिपोर्ट दिला होता.

कोणालाही ऑपरेशन थेटर मध्ये यायला परवानगी द्यायची नाही, अगदी नुसते डोकावायलाही द्यायचे नाही असे सांगण्यात आले.

त्या दोघांचे आई-वडील, मित्र सगळ्यांनी बाहेर गर्दी केली. थेटर मधून बाहेर येताच सगळ्यांनी त्यांना घेरले. ” डॉक्टर डॉक्टर, ” ” हे बघा अपघात अतिशय जोरदार झालेला आहे. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत. केवळ परमेश्वराच्या हातात सगळे काही आहे. नक्कीच सगळे प्रार्थना करूया. दोन-तीन दिवस तरी आम्ही काहीच सांगू शकत नाही. प्रार्थनाकरणे, धीर धरणे, पॉझिटिव्ह थिंकिंग एवढेच आपण आता करू शकतो. कृपा करून हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नका. आम्हाला आमचे काम करू द्या. दोन्ही मुलांच्या दोन व्यक्ती इथे फक्त बाहेर थांबू शकता.

पुढचे दोन दिवस त्या ऑपरेशन थेटर मध्ये फक्त ठराविक डॉक्टर्स, नर्सेस ये-जा करत होत्या. संध्याकाळपासून स्वतः किरण पेशंट जवळ बसूनच होता.

त्याचा XY पेशंट अजून पूर्ण बेशुद्धच होता. सलाईन, ब्लड सुरू होते. सगळ्यात चांगली गोष्ट एकच होती, ती म्हणजे दोन्ही मित्रांचे ब्लड ग्रुप्स एकच होते. त्यामुळे ब्लड ऍडजेस्ट व्हायला काही प्रॉब्लेम आला नाही.

किरण आपल्या पेशंटकडे पाहत होता. त्याच्या पायाची बोटे हलल्याचे त्याला जाणवले. एकदम ” सिस्टर, सिस्टर! लूक! ” म्हणून त्याने आवाज दिला. डॉक्टर्स सिस्टर्स यांच्या डोळ्यात एकदम आनंद चमकून गेला. अरे वा! म्हणजे मेंदूतून आलेली संवेदना पायाच्या बोटापर्यंत पोहोचली. व्हेरी गुड! एक क्षण त्याच्या बॉडीने चांगलाच रिस्पॉन्स दिला होता. त्याने आपल्या बाबांना लगेचच फोनवरून ही माहिती दिली, तेही ताबडतोब हॉस्पिटल कडे धावले. आपल्या प्रयत्नांना यश येणार याचा आनंद सगळ्या टीमच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

किरण ने आपल्या तिकडच्या डीन आणि इथल्या आय. एम. ए. च्या मेंबर्सना एसएमएस केला. सगळीकडून त्याला अभिनंदनचे मेसेजेस यायला लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर नवलकरांनी त्या दोघांच्या फक्त अगदी जवळच्या लोकांना बोलावून घेतले. प्रथमच त्यांनी त्या दोघांची नावे विचारली. एक अतुल रामचंद्र घाडगे आणि दुसरा अभिजीत श्रीकृष्ण पाटील होता.

डॉक्टरांनी या दोन्ही मुलांच्या पालकांना अतिशय शांतपणे पण आत्मविश्वासाने सांगायला सुरुवात केली. ” हे पहा मी आत्ता जे सांगणार आहे ते तुम्ही अतिशय शांत चित्ताने आणि मनावर दगड ठेवूनच ऐकायला पाहिजे. अपघात इतका जबरदस्त होता हे दोघेही वाचणे केवळ अशक्यच होते. पण.. पण.. रिलॅक्स.. मी, माझा मुलगा डॉक्टर किरण परदेशातून आला म्हणूनच आम्ही ही अतिशय रिस्की शस्त्रक्रिया करू शकलो. तुम्ही कुटुंबांनी आपले दुःख थोडे आवरून, मन मोठे करून, दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन या नवीन मुलाला स्वीकारायचे आहे. दोन्ही मुलांचा जिवंत राहण्याचा विचारच सोडून द्यावा लागला असता. पण या प्रयत्नांमुळे आपल्याला एकाच व्यक्तीत दोघांना भेटायचं आहे. तो पूर्ण बरा व्हायला काही महिने लागतील. त्याला इथेच आमच्या ऑब्झर्वेशन खालीच रहावे लागेल. नंतर काय करायचे आपण नंतर ठरवू. “

डॉक्टरांचे सांगणे संपले. सगळेजण सुन्न होऊन गेले होते. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी त्यांची अवस्था झाली होती. अतुल आणि अभिजीत दोघेही जिगरी दोस्त होते त्यामुळे दोन्ही घरची पण चांगली मैत्री होती.

दोघांकडच्या घरच्यांनी डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा लवकर, आलेले आव्हान स्वीकारले. दोन्ही घरच्यांनी एक होऊन त्याला सांभाळायचे ठरवले. पण आता मोठा प्रश्न निर्माण झाला “तो “कोण? म्हणजे किरण चा XY. तो नक्की कोण? अतुल की अभिजीत? तोही निर्णय सगळ्यांनी किरण वरती सोपवला.

हळूहळू चांगल्या पद्धतीने त्याच्यात सुधारणा होत होती. सगळ्यांच्या मनावरचा ताण, चिंता कमी व्हायला लागली होती. तोच एक दिवस डॉक्टरांच्या टेबलवर एका वकिलांची नोटीस आली “तुमच्या हॉस्पिटलमध्ये दोन खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचसाठी डॉक्टरांनी अनुकूल तारखेला कोर्टामध्ये हजर राहावे “. हे वाचून डॉक्टर नवलकर सुन्न होऊन गेले.

डॉक्टर किरणनी मात्र त्यांना समजावले. ” बाबा, काही काळजी करू नका. आपण कोणाचे काही वाईट हेतूने केले नाही. मेडिकल असोसिएशन ची या ऑपरेशनला मान्यता आहे. मी सगळे सिद्ध करतो. तुम्ही अगदी रिलॅक्स रहा. “

एव्हाना परदेशामध्ये किरणच्या प्रयोगावर, त्याच्या निष्कर्षावर, त्याला मिळालेल्या रिझल्टवर कितीतरी डिस्कशन झाले आणि त्याला ऑनर व अवॉर्ड घोषित केले गेले. त्यामुळे त्याच्या प्रयत्नांना आणखीनच वजन आले.

आत्तापर्यंत “तो ” डोळे उघडून सर्वांशी बोलायला लागला होता. सरबत, दूध, वरून पातळ भात खायला लागला. किरणनी त्याचे नाव घोषित केले.

अक्षय रामकृष्ण घाडगे पाटील!

ऑपरेशन करतानाच XY असे किरणने मनोमन नाव दिले होते. दोघांच्या आधीच्या नावातले “अ ” अक्षय तयार झाला.

या अक्षयच्या केस चा निकाल ऐकायला आज कोर्टाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. मुद्दाम पत्रकार परिषद न घेताच, या प्रयोगाला मोठी प्रसिद्धी मिळणार होती. देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध मिळणार होती. देशाची मान ही या क्षेत्रातील कामगिरीमुळे उंचावणार होती.

मरायला आलेले दोन जीव वाचवून एक तरी आयुष्य मार्गी लावले गेले होते. बोलायला हे सोपे वाटले तरी प्रत्यक्षात ऑपरेशन करणे, त्या क्षणी तो निर्णय योग्य वेळेवर घेणे हे धाडसाचे होते जे डॉक्टर नवलकर आणि डॉक्टर किरण ने दाखवले होते. नुसता निर्णय घेतला नव्हता, तर तो प्रत्यक्ष कृतीतही उतरवला होता. नुकताच परदेशातून आल्या आल्या, आपल्या घरी ही न जाता, आईलाही न भेटता तडक हॉस्पिटलमध्ये तो आला होता. यावरून तो किती कर्तव्यदक्ष आहे हे कळून आले होते. ऑपरेशन नंतर पेशंटची दखल घेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या पालकांची मनस्थिती सांभाळणे, सोपे नव्हते. ते सगळे सीनियर डॉक्टर नवलकरांनी मोठ्या जबाबदारीने पार पाडले होते. त्यामुळे कोणा एका समाजकंटकाच्या मागणीवरून ‘तो’ खून मानून चालणार नव्हते. न्यायदान करताना अक्षयचे आयुष्य, डॉक्टर नवलकरांचे करिअर आणि अक्षयच्या आई-वडिलांची मानसिकता जपली जायला हवी होती.

या केस बद्दल देशमुख साहेब खूप विचार करत होते. देशमुख साहेबांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. वरवर पाहिले तर निश्चितच दोन जीव, दोन शरीरे जिवंत असताना कापली गेली होती. एका दृष्टीने निघृण खूनच होते ते! पण कशासाठी मारले होते? मारण्याचा उद्देश काय होता? अशा प्रकारच्या प्रयोगाला मान्यता द्यावी का? आत्ता दोन मुलांचीच शरीरे जुळवली होती. समजा असा प्रसंग आला की एका पुरुषाच्या शरीराचा एक भाग आणि दुसरा भाग स्त्रीच्या शरीराचा! काय होईल मग पुढे? अशा व्यक्तीला तो म्हणायचे कि ती? पण अशी दोन शरीरे ऍडजेस्ट तरी होतील का? हार्मोनल इम्बॅलन्सचा किती प्रॉब्लेम येईल. त्या दृष्टीने हे विचार करणे जरुरीचे होते.

देशमुख साहेब विचारात गढून गेले होते. या केसच्या बाबतीत मात्र सगळा सॉफ्ट कॉर्नर अक्षय आणि डॉक्टर नवलकर यांच्याच बाजूने होता. आजच्या घडीला तरी जगामधला हा यशस्वी प्रयोग असल्याकारणाने त्यावर काही शंका घेण्याचे कारणच नव्हते. आय. एम. ए. आणि परदेशातील मेडिकल कौन्सिलनेही या ऑपरेशनचा गौरव केल्यामुळे निश्चितच कौतुकास्पद होते. त्यामुळे देशमुख साहेबही निकाल देण्यासाठी सज्ज होते.

– – – आपल्या देशातल्या एका ऑपरेशनचे विश्लेषण करण्याचे, त्या डॉक्टरांचे कौतुक करण्याचे, हॉस्पिटलच्या स्टाफ चा गौरव करण्याचे, ते खून नाहीत हे सिद्ध करण्याचे आणि आपल्या देशाची मान उत्तुंग करण्याचा मोठा अभिमानाचा निकाल ते आज देणार होते. हे मोठे महत भाग्य त्यांच्या वाट्याला आले होते.

– – – किरणचे “मिशन अक्षय“ कमालीचे यशस्वी झाले होते.

– समाप्त – 

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments