डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(वीणा सुधीरकडून नवं बळ घेऊन घरी आली. घरी मंजिरीने पिझा मागवला होता. ”आई त्या डिलिव्हरी चे आठशे रुपये देऊन टाक ग”बसल्याबसल्या मंजिरीने फर्मावले. वीणा सरळ आत निघून गेली. वाट बघून फणफण करत मंजिरीने पैसे दिले.) – इथून पुढे —-
दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी म्हणाली, “ आई, आम्ही मैत्रिणी चार दिवस गोव्याला जातोय. मला पन्नास हजार रुपये लागतील. उद्या भर माझ्या अकाउंटला न विसरता. ”
” मंजिरी, परवडत नसेल तर गोव्याला जाऊ नकोस. माझ्याकडे पैसे नाहीत. , असले तरी मी यापुढे तुला पैसे देणार नाही. अति झालं आता तुझं हे मला ओरबाडणं. तू आता जॉब बघ आणि मिळवायला लाग. मी तुला पोसणार नाही यापुढे. ” वीणा म्हणाली.
मंजिरी रागाने लाल झाली. “ हो का? का देणार नाहीस ग? मीच वारस आहे ना तुमची? मला नाही तर कोणाला देणारेस ही इस्टेट? “ कुत्सितपणे ती म्हणाली.
“ मी तुला आत्ता तर काहीही देणार नाही हे नक्की. नंतरचे नंतर बघू. दोन महिन्यात नोकरी बघायची आणि जागा सुद्धा. परवडत नसेल तर आपल्या जुन्या वाड्यात दोन खोल्या रिकाम्या आहेत तिथे रहायला लाग. पण आता तुझी अरेरावी आम्ही सहन करणार नाही. कान उघडे ठेवून ऐक. “
मंजिरी रागाने लाल झाली. पाय आपटत बाहेर निघून गेली. वीणा शांत होती. यातून काय निष्पन्न होते तेच तिला बघायचं होतं.
संध्याकाळी वीणाच्या दोघी बहिणी भेटायला आल्या.. “ आक्का, अग हे काय? मंजिरी आली होती आमच्याकडे. तू म्हणे तिला घराबाहेर काढणार आहेस? नोकरी कर म्हणालीस म्हणे? एकुलती एक मुलगी ना तुझी? लोक काय म्हणतील? असं नको करू बाई. ” दोघीजणी म्हणाल्या. “ आधीच बिचारी घटस्फोट झाल्याने दुःखी आहे. ” वीणा काहीच बोलली नाही.
“ तिला तुम्ही दिलेत का पैसे? फार नाही पण पन्नासच हजार हवे होते. ” दोघीनी चमकून एकमेकींकडे बघितलं. माई चाचरत म्हणाली, “ हो. मागत होती खरी आमच्याकडे पण आम्ही कुठून देणार ग? ”
“ हो ना? मग आता तिच्या भानगडीत पडू नका. लाडक्या भाचीचं प्रेम उतू जात असेल तर घ्या ठेवून स्वतःच्या घरी. ” वीणा आत निघून गेली.
बहिणी निघून गेल्या. वीणा शांत होती. पुढे काय होते ते बघायचं होत तिला. वीणाला वाईट वाटलं की आपला नवरा या कशातच आपली साथ देत नाहीये. पण तिने आता त्याच्याकडून अपेक्षा करणंच सोडून दिलं. तो महिना तसाच गेला. एक दिवस मंजिरी वादळासारखी घरात आली आणि सगळं सामान पॅक करायला लागली.
“ मंजिरी, कुठे जाते आहेस? काय करणार आहेस तू? ”
“ तुम्हाला मी नकोय ना तुमच्या घरात? मग मी कुठेही जाईन. ”
“ मंजिरी, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. तुला तुझ्या जबाबदाऱ्या समजायला हव्यात. मी आई आहे तुझी. वैरीण नाहीये. तू नीट मार्गी लागावंस हीच माफक अपेक्षा आहे माझी “ वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. ” हे बघ. तुझं नवऱ्याशी पटलं नाही, ठीक आहे. पण आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही. तू नीट मार्गी लागावीस, पुन्हा संसार थाटून पायावर उभं रहावंस ही अपेक्षा चुकीची नाहीये. नीट विचार कर आणि मग पाऊल उचल. ”
” मला माझं हित कळतं. तुम्हाला बट्टा लागेल असं काही करणार नाही मी. गोव्याला जातेय. माझा गणेश म्हणून मित्र आहे त्याच्याबरोबर मी रहाणार आहे. बघते काय जमतं ते. काळजी नको करू. बघेन मी काय करायचं ते. ” मंजिरीने स्पष्ट सांगून टाकलं.
वीणा आत गेली. पाच लाख रुपयांचा चेक लिहून तिच्या हातात ठेवला. “ मंजिरी, नीट विचार केला आहेस ना सगळा? ”
मंजिरी चेक घेऊन न बोलता घराबाहेर पडली. वीणाला चैन पडेना. ती तडक रूपा- सुधीरकडे गेली. सुधीरला हे सगळं तिनं सांगितलं. सुधीर विचारात पडला. त्या दोघांनाही वाटलं, आता पुढे काय होणार? आपणच वीणाला चुकीचा सल्ला तर दिला नाही ना? उगाच पडलो का यांच्या भानगडीत?
वीणाने जणू त्यांच्या मनातले विचार ओळखले. “ हे बघ रूपा सुधीर, तुम्ही मला योग्यच सल्ला दिलात. तिशी ओलांडलेली मुलगी लहान नाहीये. नाही जमलं तर ती परत येईल हे नक्की. मी माझ्या मुलीला चांगलीच ओळखते. यातून तिचं भलं झालं तर देवच पावला. मी तुम्हाला कधीही दोष देणार नाही. आता वाट बघण्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. ”
या गोष्टीला पाच वर्षे झाली. या काळात मंजिरीचा आईवडिलांना कधीही फोन आला नाही, की ती कुठे आहे काय करते हेही कोणाला समजलं नाही. वीणा शांत होती. रूपा सुधीर तिला नेहमी भेटत. वीणा म्हणाली, “आपण जन्म देतो पण कर्म नाही देऊ शकत ग मुलांना. माझेच योग चांगले नाहीत तिच्याशी. ”
एक दिवस अचानक बेल वाजली. वीणाने हळूहळू जाऊन दार उघडलं. हल्ली फार गुडघे दुखत तिचे. दारात मंजिरी उभी होती. मागे बघितलं तर तिच्या मागे एक पुरुष उभा होता.
वीणाने त्यांना आत या म्हटलं. मंजिरीच्या अंगावर छान ड्रेस होता. हातात भारी पर्स, कानात चमकणारे हिरे दिसत होते.
मंजिरी म्हणाली, “ आई, हा गणेश. मी याच्याच बरोबर गोव्याला गेले. हा साऊथ इंडियन आहे. आम्ही तिकडे एक अगदी लहान स्नॅक्स सेन्टर चालवायला घेतले. आई, तू दिलेले पाच लाख मला फार उपयोगी पडले. ”
गणेश म्हणाला “ आई, ते सेन्टर छान चालायला लागले. मी स्वतः चांगला कुक आहे पण पैसे नाहीत म्हणून हॉटेलात नोकरी करत होतो. मंजिरी मला भेटली आणि आम्ही गोव्याला जायचं ठरवलं.
आमचे हे स्नॅक्स सेन्टर फार छान चालायला लागलं. मग आम्ही नवीन साऊथ इंडियन हॉटेल चालवायला घेतलं. आहे छोटंसं पण तेही चांगलं चालतंय. गोवा खूप महाग आहे आणि सीझन नसला की कोणी टुरिस्ट येत नाहीत. पण आमचं हे हॉटेल स्वस्तआहे. ठराविकच पदार्थ आम्ही करतो. मस्त चाललंय आमचं. आमच्याकडे मात्र कायम गर्दी असते. ”
मंजिरी आईजवळ बसली.
“ आई, मला माफ करशील ना? मी खूप वाईट वागले ग तुमच्याशी. सगळ्या जगाचा राग मी तुझ्यावर काढला. खूप मनस्ताप दिला तुम्हाला. मुळात मी वाईट नाहीये ग. अपयश माणसाला फार कडवट बनवते ग. पण मी खूप चुकले आई. आता समजतं मला, किती वाईट वाटलं असेल तुला, मी अशी त्रास देत होते तुला तेव्हा. बाबा आई, मी चुकले. मला क्षमा कराल ना? ”
वीणाने मंजिरीला जवळ घेतलं. ” मंजिरी, तू गेल्यापासून एक क्षण मी नीट झोपले नाहीये की अन्न गोड लागलं नाही मला. पोटचा गोळा आहेस तू. पण आता तुम्हाला असं छान सेटल झालेलं बघून किती आनंद झाला म्हणून सांगू? गणेश, तुमचेही खूप आभार मानते मी. माझ्या मुलीला आधार दिलात तिला नीट मार्गावर आणलेत. ”
गणेश म्हणाला, “ मंजिरी चांगलीच आहे हो. आमची कॉलेजपासून मैत्री आहे. मला तिने विश्वासाने तुम्ही दिलेले पाच लाख रुपये दिले. खूप कष्ट केले आम्ही या पाच वर्षात. बँकेचे कर्ज काढले, ते फेडतो आहोत. पण आमचं हॉटेल खूप छान चाललं आहे. आम्ही तुम्हा दोघांना गोव्याला न्यायला आलो आहोत. ”
वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. पूर्ण बदललेली आत्मविश्वासाने उभी असलेली ही नवीनच मंजिरी तिच्या समोर उभी होती.
वीणा हसत म्हणाली “ येणार तर. पण मंजिरी गणेश, असेच रहाणार कायम का लग्नही करणार? आम्हाला आवडेल हा जावई. ”
मंजिरी लाजली. “ आई, लग्न करणार आहोत आम्ही, म्हणूनच तू आणि बाबा उद्या गोव्याला या. गणेशला आईवडील नाहीत. म्हणून तुम्ही आमचं लग्न लावून द्या. “ गणेश वीणाच्या आणि बाबांच्या पाया पडला.
वीणाने दोघांना जवळ घेतलं.
“ हा दिवस आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं रे बाबांनो. त्या मंगेशाचीच कृपा म्हणायची. मंजिरी, किती आनंद झाला म्हणून सांगू ग? आपलं वाट चुकलेलं वासरू नीट मार्गाला लागलेलं बघून कोणत्या आईला धन्य वाटणार नाही बाळा? माझं चुकलं असलं तर मला माफ कर मंजिरी. पण तुझं भलं व्हावं हीच इच्छा होती बरं आमची. या आता घरात. तुम्ही म्हणता तसंच होईल. छान लग्न करू तुमचं मंगेशीच्या देवळात. ”
…… डोळे पुसत वीणा देवाला साखर ठेवायला आत वळली.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




