श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “सोनं…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळची वेळ म्हणजे घरात प्रचंड गडबड. घड्याळावर नजर ठेवत सगळी कामं चाललेली. ‘अहो’ऑफिस तर मुलगा, मुलगी कॉलेजला जाण्याच्या तयारीत आणि मी स्वयंपाकात. कधी नव्हे ते उमा वेळेवर आली. जीवात जीव आला. एक टेंशन कमी झालं. धुण्या-भांड्याची काळजी मिटली. इतरवेळी गप्पा मारत काम करणारी उमा आज शांत होती. कामं उरकण्याची घाई चाललेली… चेहऱ्यावरून काहीतरी बिनसल्याचं लक्षात येत होतं. सगळे आपापल्या कामाला गेल्यावर निवांत मोबाइल पाहत बसले. तितक्यात पदराला हात पुसत उमा समोर येऊन उभी राहिली.

 

“ताई, एक काम होतं”

“पैशे सोडून काहीही माग”

“मग राहीलं काय? हजार रुपये पायजे व्हते. पोरींची फी भरायचीये. ”

“एवढे पैसे माझ्याकडं नाहीत. ”

“सगळे परत करीन पण नाई म्हणू नगा. हात जोडते. लय नड होती. ” उमा काकुळतीनं म्हणाली तेव्हा कसंतरीच वाटलं, तरीही यावेळेला पैसे द्यायचे नाहीत. अशी खूणगाठ मनाशी बांधली होती कारण आधीही उमानं काही ना काही कारणासाठी उसने पैसे घेतलेले. थोडे थोडे करून आकडा तीन हजारापर्यंत पोचलेला आणि परतफेड काहीच नाही. घरातल्यांना माहिती नव्हतं म्हणून बरं नाहीतर… माझं काही खरं नव्हतं.

 

तिचं “घेणं” थांबणार नाही म्हणून आपणच “देणं” थांबवायचं असं ठरवलं. पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर उमाचा चेहरा केविलवाणा झाला. डोळे भरले. ती खोटं बोलत नव्हती. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. मजुरी करणारा दारुडा नवरा आणि शाळेत जाणाऱ्या तीन मुली असा संसार. उमाच्या कमाईवर घर चाललेलं. पण उसने देण्याला सुद्धा मर्यादा असते. असो..

 

“ताई, बघा ना काहीतरी.. ” हात जोडत उमाच्या पुन्हा विणवण्या सुरू झाल्या. तेव्हा माझा निश्चय डळमळला.

“नवरात्र चालूयं म्हणून नाराज करत नाही. हे तीनशे घे. ”

“बरं द्या” नाराज उमा पाय आपटत निघून गेली आणि अपेक्षेप्रमाणे पुढचे दोन दिवस कामाला दांडी. खूप चिडचिड झाली पण काही करू शकत नव्हते.

 

दसऱ्याचा दिवस उजाडला. सकाळपासूनच गडबड होती. संध्याकाळी ओवाळून झाल्यावर ‘सोनं’ देऊन मुलं मित्रांना भेटायला गेली अन आम्ही दोघं टीव्ही पाहत बसलो. अचानक उमा कामासाठी आली. आश्चर्याचा धक्का बसला अन रागही आला. पण सणावारी कटकट नको म्हणून गप्प बसले. पटापट कामं संपवून उमा निघाली.

“ताई येते. ”

“थांब जरा”

“अजून दोन घरची कामं राहिलीत”

“माहितीये. फार कामाचीयेस. पोरींसाठी श्रीखंड घेऊन जा “ 

डबा पुढे केला पण उमा काही बोलली नाही. तिला दसऱ्याच्या शुभेच्छा अन सोनं दिलं. ‘सोनं घे अन सोन्यासारखी रहा’ म्हटल्यावर उमा मनापासून हसली.

 

रात्री जेवणं झाल्यावर शतपावली करताना अचानक लक्षात आलं की आपल्या हातात अंगठी नाहीये. काळजात धस्स झालं. आजूबाजूला शोधलं पण अंगठी सापडली नाही. शोधाशोध सुरू झाली. एक तोळ्याची अंगठी हरवल्यानं प्रचंड टेंशन आलं. घरातलं वातावरण तंग. सगळे अंगठी शोधण्याच्या कामाला लागले पण उपयोग झाला नाही. मुलं वैतागली. डोकं भणभणायला लागलं. अहो तर प्रचंड चिडलेले.

“आई, नक्की आठव तूच कुठं तरी ठेवली असशील”मुलगा.

“आईची स्पेशालिटी म्हणजे वस्तू इतक्या सांभाळून ठेवते की वेळेवर सापडत नाहीत. ”

“अंगठी नीट ठेवता येत नाही का? एवढा हलगर्जीपणा!! ”अहो.

“कायम बोटातच असते. संध्याकाळी ओवाळताना काढली होती. ”.. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. लगेच धावत जाऊन ताम्हण पाहिलं पण…..

“ताम्हणात सुद्धा नाही.. मग कुठे गेली. ”.. अहो.

“माहिती असतं तर शोधलं असतं का? ”

“इतका वेंधळेपणा. ”

“त्याविषयी नंतर बोला. आधी अंगठी शोधा. ” 

“तुझं नेहमीचच आहे. स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांवर डाफरायचं. ”

…. अंगठीचा विषय बाजूला राहून ‘तू तू मै मै’ सुरू झाली. दोघंही तोंड फिरवून बसलो तरी अहोंची बडबड सुरूच. माझी चूक असल्यानं गप्प राहिले. मुलांना मध्यस्थी करावी लागली. पुन्हा शोधकार्य सुरू. घरातला कोपरा अन कोपरा पाहिला अगदी कचऱ्याचा डबासुद्धा.. पण अंगठी सापडली नाही तेव्हा धीर सुटला. खूप रडायला आलं. स्वतःच्या बावळटपणाचा राग आला. या सगळ्या गडबडीत रात्रीचे बारा वाजून गेले. नाईलाजानं सगळे झोपायला गेले पण माझी झोप मात्र उडाली. अंगठीच्या विचारानं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळीसुद्धा घरात तणावपूर्ण वातावरण होतं. परत शोधलं पण पुन्हा निराशा. इतक्यात दारावरची बेल वाजली. अहोंनी दार उघडलं तर समोर उमा.

 

“ताई!! ” 

“आत आहेत” अहो 

“उमा, तू इतक्या सकाळीच आलीस. आत्ताशी सातच वाजतायेत”

“तुमच्यासाठीच आले”

“म्हणजे.. ”

“ताई, काल दसऱ्याला तुम्ही.. ”

“आता अजून काय झालं. ” मी वैतागले.

“सोनं दिलंत.. ”

“बरं मग, उमा जरा टेंशनमध्ये आहे. डोकं ठिकाणावर नाही. नंतर बोलू. ”.. हे म्हणाले.

“तुमचं काही हरवलयं का? ” 

“तुला कसं माहीत? ”.

“माजा अंदाज बराबर निगाला”

“कसला अंदाज, काय बोलतीयेस. काही कळत नाहीये. ”

“तुमची पण कमाल आहे. पैशे मागितले तर दिले नाहीत आणि.. ”

“आणि काय??? ”

“अहो ताई, काल दसऱ्याच्या सोन्याबरोबर ही खरी सोन्याची अंगठीपण दिलीत. ”

“काय?? ” मी किंचाळले.

“कामं करून घरी गेले. पिशवी रिकामी केली तवा दसऱ्याच्या सोन्याबरबर अंगठी व्हती. काल तुमच्या शिवाय कुणीच सोनं दिल नाय तवा ही अंगठी तुमचीच असणार असं वाटलं. बॅलन्स नव्हता म्हणून फोन केला नाय. तुमी टेन्शनमध्ये असाल म्हणून सकाळच्यालाच आले. ही घ्या. ”

.. उमानं अंगठी पुढे केली. मी एकदम सुन्न झाले. तिला घट्ट मिठी मारली अन जोरजोरात रडायला लागले. पुन्हा पुन्हा आभार मानले.

“उमा, काय बोलू शब्दच नाहीत. ”म्हणत पाचशेच्या दोन नोटा पुढे केल्या पण उमानं घ्यायला नकार दिला.

“ह्याच्यासाठी नाय केलं. तुमची वस्तू परत केली ह्यातच लई मोठा आनंद हाय. ” 

…. हलाखीची परिस्थिती, पैशाची चणचण आणि अत्यंतिक गरज असूनही प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या उमासाठी खूप आदर आणि कौतुक वाटलं. आजच्या व्यवहारी, स्वार्थी जमान्यात प्रामाणिक असणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आज खऱ्या सोन्यापेक्षा हे प्रामाणिकपणाचं सोनं मला जास्त मौल्यवान वाटलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments