प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
जीवनरंग
☆ सुधारस… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
“आई, कोण आलंय बघ गं” समीरचं बोलणं ऐकून शैलानं बाहेरच्या खोलीत येऊन दरवाज्याकडं पाहिलं.तिचा मोठा भाऊ दारात महेश उभा होता.जवळपास दहा बारा वर्षांनी ती त्याला पहात होती.
“आत या म्हण पाहुण्यांना” असं समीरला म्हणून ती आत गेली.
“हे पाणी दे पाहुण्यांना.
आणि पाया पड त्यांच्या.तुझे ते मोठे मामा आहेत”.
समीरनं पाण्याचा ग्लास आणून महेशच्या हातात दिला आणि त्याच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी तो वाकला.त्याला आपल्या हातांनी उठवून महेश म्हणाला,
“बाळा,आईला म्हणावं लवकर ओवाळून घे.आणि लगेच जेवायला वाढ.मामाला भूक लागलीय”.
समीर आत येताच शैलानं त्याला दुकानातून नारळ आणि करगोटा आणायला पाठवलं आणि ती ओवाळण्याचं ताट भरभर करू लागली.ते करताना तिच्या डोळ्यापुढून सारा इतिहास सरकून गेला.
शैला आईवडिलांची धाकटा लेक.महेश थोरला मुलगा. काॅलेजात जाणारी
शैला अभ्यासाबरोबरच अनेक अॅक्टिव्हीजमध्ये सतत सक्रीय होती. एन्.एस्. एस्., वादविवाद स्पर्धा,खेळ, महिलांवर होणारे अन्याय, कुठे होणारे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन असो, ती सतत आघाडीवर असे.
काॅलेजातल्या अन्वर नावाच्या मुलाशी तिची ओळख झाली.तोही तिच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात भाग घेत होता.ओळखीचं पर्यावसान प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.पण शैलाचा हा निर्णय तिच्या आईवडलांना आवडला नाही.’लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचे मिलन नसते तर दोन कुटुंबांचेही संबंध त्यातून जोडले जातात आणि लग्न करताना, दोघांनी केवळ भावनिक न होता, आपला कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम आहे ना? हे पाहूनच निर्णय घ्यावा’ असं त्यांना वाटत होतं.
‘वो लडकी आपनी बिरादारीकी नही ‘ या मुद्द्यावर अन्वरच्या घरच्यांनीही या लग्नाला विरोध केला होता.अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघांनी लग्न करायचं ठरवलं.रजिस्टर पध्दतीनं त्यांनी लग्न केलं.मात्र यामुळे दोघांनाही आपापल्या घरांतून बाहेर पडावं लागलं होतं. उदरनिर्वाहासाठी अन्वरनं, ओळखीनं
जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जाऊन एका सहकारी पतपेढीत नोकरी मिळवली. अनेक अडचणींतून त्यांचा संसार सुरू झाला.त्यांना एक मुलगा झाला – समीर .
समीर चार वर्षाचा झाला आणि एक दिवस घरी येताना,अन्वर रेल्वेचा रूळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडला गेला.
शैलाचं आभाळच फाटलं.मात्र लवकरच ती त्या धक्क्यातून सावरली. एका एन्. जी.ओ.त तिनं नोकरी पत्करली आणि समीरला मोठं करणं हेच आयुष्याचं ध्येय ठेवून ती जगत राहिली;
परिस्थितीतीशी झगडत राहिली.जवळच्याच शाळेत तिनं समीरला टाकलं.मात्र कितीही अडचणी आल्या तरी माहेर किंवा अन्वरच्या घरच्यांकडून तिनं काहीच अपेक्षा ठेवली नाही.असेच दिवस लोटले गेले आणि एका दिवाळीत तिचा भाऊ महेश तिच्या घरी आला होता.
दरवाजा उघडला. दुकानातून समीर आला .
“हे घे बाळा खाऊ” असं म्हणून महेशनं समीरच्या समोर एक बाॅक्स धरला.”मम्मी…” आईकडं समीरनं प्रश्नार्थक दृष्टीनं पाहिलं.
“आईसारखाच मानी दिसतोय”. महेश.
” घे समीर ,मामानं तुझ्यासाठी काय आणलंय बघ”
“मला खाऊ नको”.
“मग काय पाहिजे?”
“पुस्तक”.
“ठीक आहे बाबा…
आधी हे तर घे. मी ऑनलाईन काॅमिक आत्ताच मागवतो…” असं म्हणून महेशनं नेटवरून एक काॅमिक शोधून, त्याची एका
वर्षाची वर्गणी मोबाईलवरून पाठवली.
तोवर शैलानं ओवाळणीची तयारी केली.
लग्नानंतर ती पहिल्यांदाच महेशला ओवाळत होती.तिला आठवलं,लग्नाआधी भाऊबीजेला महेशला ओवाळून झाल्यावर ती हक्कानं तिला हवं ते गिफ्ट मागवून घेत असे.यावेळी मात्र तिनं तसं केलं नाही.महेशनं तिच्या ओवाळणीच्या ताटात एक बंद पाकीट टाकलं. हळूच ते घेऊन शैलानं ते किचनवर ठेवून दिलं.
” गिफ्ट काय आहे हे उघडून पण पहाणार नाही का शैला?”
हसत शैलानं ते उघडलं.पाकीटात
एक जुनी किल्ली होती.
“हे काय?”
“आपल्या कापडाच्या दुकानाची किल्ली आहे”
“म्हणजे ?”
“अगं,म्हणजे सगळं सोडून तू आपल्या घरी यायचं.कापडाचं दुकान आता तू चालवायचं?”
“आणि तू काय करणार?”
“गावातच दुसरं दुकान मी विकत घेतलंय.ते मी पाहीन”.
“कशासाठी हे दादा? आणि इतक्या दुरून मी हे कसं पहाणार? आणि आता समीरची शाळाही सुरू आहे.”
“तुम्ही दोघांनीही तिकडंच रहायला यायचं.आपल्या बंगल्यातल्या तीन खोल्यात तुम्ही रहायचं.
तो बंगला तुझ्याच आईवडलांचा आहे ना.”
“अरे, तुझं आणि आईपप्पांचं ठीक आहे.पण वहिनीचं म्हणणं जाणून घेतलं का?”
” अगं बाई, तिनंच मला इकडं पाठवलं.सकाळी काही नाष्टापण करून दिला नाही तिनं. बहिणीकडं जा जेवायला म्हणाली ती.थांब. तिच्याशीच बोल”.असं म्हणून त्यानं मोबाईल काढला.शैलानं तो परत त्याच्याकडं देत म्हणाली, “आधी मामा भाचे जेवून घ्या. मग बोलू”.
जेवण झाल्यावर महेशच्या बायकोबरोबर ती व्हिडिओवरून बोलली,
“काय वन्सं,आज काय जेवण केलं तुमच्या भावासाठी?”
” फराळाचं होतंच.आणि
दादाच्या आवडीचा सुधारस केला होता वहिनी.”.
” वन्सं, येता कधी मग इकडं दुकान संभाळायला?”
” समीरच्या शाळेचा दाखला मिळाला की येऊ “.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- sks.satish@gmail.com
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





