सौ. अर्चना गादीकर निकारंगे
🌸 जीवनरंग 🌸
☆ तिरीप… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
आज शर्वाणी लग्नानंतर दोन – तीन वर्षांनी दिवाळीतून तिच्या माहेरी म्हणजे बेळगावला जायला निघाली होती. लग्न झाल्यावर ती शशांकबरोबर म्हणजे तिच्या नवर्याबरोबर कामाच्या निमित्ताने पूण्याला राहत होती शशांक एका आय. टी. कंपनीत कामाला होता. लग्नानंतर तिचे बेळगावला जाणे क्वचितच व्हायचे. म्हणून हा बेत तिने खूप दिवस अगोदरच ठरवला होता. व्यवस्थित सर्व ठरवून ती प्रायव्हेट बसने बेळगावला जाणार होती. तीन ते चार दिवसांपूर्वी तिने सीटचे आरक्षण करून ठेवले होते. तिने तिच्याबरोबर एक आटोपशीर बॅग घेतली होती. सगळ व्यवस्थित सांभाळत ती बसमध्ये जागेवर येऊन बसली. अजून बाजूच्या सीटवर कोणी आलेले दिसत नव्हते. “आले बाबा एकदाची आता काही काळजी नाही. ” ती स्वतःला म्हणाली. तिला आठवले काल रात्री बाबांशी बोलताना ते म्हणाले होते, ” शरू, काही काळजी करू नकोस. तुझी बस बेळगावला स्टाॅपवर यायच्या अगोदरच हा तुझा बाबा तुला उतरवून घ्यायला हजर असलेला तुला दिसेल.” शर्वाणीचे बाबा म्हणजे अच्युत गोळे. बँकेतील नोकरीतून निवृत्त झालेल एक व्यक्तिमत्व. हुशार, गप्पिष्ट व थोडं मिश्किल. बस सुसाट धावत होती. पण शर्वाणी तर आठवणींच्या गाडीवर स्वार होऊन वेगाने निघाली होती.
बसच्या खिडकीला असलेल्या पडद्यातून उन्हाची किरणे आत प्रवेश करत होती. बसच्या आतल्या त्या अकृत्रिम अंधाराला छेदू पाहत होती. तेवढ्यात नकळत शर्वाणीसुदधा वर्तमानकाळातून भूतकाळाच्या त्या अंधार्या विश्वात प्रवेशली. तिला डोळ्यांसमोर लहानपणीची दिवाळी दिसू लागली. नविन कपड्यांची खरेदी, फटाके खरेदी. ते आठवून ती हळूच हसली. पुरूष मंडळींची खरेदीची लगबग, घरातल्या बायकांची फराळाची धावपळ असे कितीतरी प्रसंग तिला खिडकीतून आत येणार्या प्रकाशाच्या तिरीपेप्रमाणे लख्ख आठवू लागले. तिच्या मनातील आठवणींचा कोपरा प्रकाशित होऊ लागला. आजोबांचे ते दिवाळीसाठी किल्ला बनविणे.. पण आजोबा वारल्यानंतर ते थांबले होते. पुढच्याच क्षणी तिने विचार केला, ” अरे, मी जर ह्यावर्षी किल्ला बनविला तर? अनायसे मी तिथे असणारच आहे. तर काय हरकत आहे? आई बाबांना पण बर वाटेल. आणि तिचे डोळे आनंदाने चमकले.
पुढच्या दोन तीन तासांत शर्वाणी बेळगावला पोहचली. तिला म्हटल्याप्रमाणे तिचे वडील तिची बस यायच्या अगोदरच बस स्टाॅपवर हजर होते. त्यांना पहाताच शर्वाणी सुखावली. वडिलांनी आणलेल्या गाडीत बसून ते घरी जाण्यास निघाले. पुढल्या दहा मिनिटांत गाडी बंगल्याच्या दारात येऊन थांबली. आजोबांच्या वेळेसचा तो बंगला अजून चांगला होता.
गाडीच्या हाॅर्नचा आवाज ऐकून आई बाहेर आली. ” कशी आहेस शरा. चल आत. कधीची वाट बघते आहे. शशांक कसे आहेत? ” आईचे प्रश्न ऐकून बाबा म्हणाले ” अग किती प्रश्न विचारशील. घरात येऊ दे तिला. राहणार आहे आहे आता दहा पंधरा दिवस. मग हव्या तेवढ्या गप्पा मारा मायलेकीने. ” सगळे हसत घरात गेले. हात पाय धुवून, ड्रेस बदलून शर्वाणी डायनिंग टेबलजवळ आली. आई व बाबा तिची वाट पाहत होते. आईच्या हातचे गरमागरम जेवण जेऊन ती तृप्त झाली. आई वडीलांबरोबर गप्पा मारत ती त्यांचे जेवण होईपर्यंत डायनिंग टेबलवर थांबली.
हळूहळू दिवस कलू लागला. बंगल्याच्या गच्चीवर उभी राहून ती समोर पहात होती. वर्षानुवर्षे आहे तसेच सर्व होते. सूर्य अस्ताला जाताना दिसत होता दृश्य फारच विलोभनीय होते. तिच्यामागे आई कधी येऊन उभी राहिली ते तिच्या लक्षात पण आले नाही. शर्वाणीच्या आईचे नाव शैलजा. शैलजाताई तिच्याजवळ येत तिल्रा म्हणाल्या. ” अग इथे आहेस होय? आणि मी आपली तुला सगळीकडे शोधते आहे. ” “हो ग. किती छान वाटत होते सूर्य मावळत असताना पाहीला. आमच्या इथे पूण्याला तर उंचच उंच इमारती त्यातून हे असे सुंदर दृश्य कुठून पहायला मिळणार? “शर्वाणी म्हणाली. ” हो ग बाई. छान एन्जाॅय कर आता आली आहेस तेव्हा. ” आई प्रेमाने म्हणाली.
दुसर्या सकाळी लवकर आवरून शर्वाणी आजोबांबरोबर ज्या दुकानात किल्ला बनविण्यासाठी लागणारे सामान आणायला जायची त्या दुकानात गेली आणि सामान घेऊन आली. दुकानात जायच्या अगोदर तिने कामाला येणार्या राधा ताईंकडून गेस्ट हाऊसच्या भिंतीची जागा साफ करून घेतली होती. लवकरच तिने पन्हाळा किल्ल्याची छान प्रतिकृती त्याजागी बनविली. जवळ उभे राहून मुलीची कला अवलोकीणार्या आईवडीलांनी एकदमच तिला म्हटले, ” तू खरच आज आजोबांची नात शोभतेस खरी. ” शर्वाणी हे ऐकून खूप खूश झाली.. मावळतीला निघालेल्या सूर्याची किरणे झाडांच्या पाठीमागून तिरीपेच्या रुपात त्या प्रतिकृतीवर पडली होती आणि ती किल्ल्याची प्रतिकृती सुंदर भासत होती.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





