सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.) 

इथून पुढे – – 

‘‘आणि तो क्षण आला बरं का मंडळी… त्या नववधूने रंगमंचावर पाऊल टाकले… नुकतीच ब्युटी पार्लर मधून मेकअप करून आलेली… (गण्याच्या मित्रांनी कपाळावर हात मारला. पण गण्याच्या डोळ्यासमोर फक्त ती सुंदर वधू होती आणि वाचेवर शब्दांचे उधाण)… आणि दागदागिन्यांनी नशखिशांत मढलेली ती वधू… तुम्हाला सांगतो… अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती… सगळे उपस्थित डोळे विस्फारून तिच्याकडेच बघत राहिले होते. राजपुत्र राजेसाहेबांच्या शेजारीच उभे होते… जागेवरच खिळल्यासारखे. राजांची मात्र थोडी पंचाईत झाल्यासारखी वाटत होती… मनमोकळं बघूही शकत नव्हते ना ते…”

‘‘अहो गणोजी… हे किर्तन चालू आहे.. विसरताय का तुम्ही? ”… बुवांनी गणूला कोपराने ढोसलं… पण आता गण्याला भानावर आणणं कुणाच्या बापालाही जमणार नव्हतं.

– – अखेर बुवांनी जयघोष सुरू केला… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आणि गणूने त्यांच्याकडे रागाने पाहिलं खरं…. पण स्वत:च्या उफाळणाऱ्या मनाला कसंतरी आवरलं आणि त्या मुलीचं वर्णन आवरतं घेऊन एकदाचं ते लग्न लावून टाकलं, आणि आपणहूनच म्हणायला लागला… ‘जय जय राम कृष्ण हरी’… 

… आणि मग त्याने बुवांना खूण केली… ‘‘आता बोला तुम्ही. ”… पण आता ही कथा पुढे कशी न्यायची ते बुवांना कळत नव्हतं. गण्या सलग बोलत होता… मध्ये ना अभंग… ना श्लोक… 

हे असे “अत्याधुनिक“ कीर्तन सुरू होऊन जेमतेम पाऊण तास झाला होता… त्यांना दीड तासाच्या कीर्तनाचे पैसे मिळाले होते… आता काय करायचं? .. गण्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचा प्रॉब्लेम हुशार गण्याच्या लगेच लक्षात आला. ‘‘तुम्ही थांबा… मीच सांगतो…” त्याने बुवांना खूण केली… आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’… स्वत:च्या भसाड्या आवाजात म्हणायला सुरुवात केली.. श्रोत्यांची चुळबूळ चांगलीच वाढलेली त्याच्या लक्षात आली…

‘‘तर मंडळी, आता त्या लग्न सोहळ्यातून बाहेर या आणि पुढची कथा ऐका… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आता फक्त पेटीवर वाजलं…

‘‘तर अशा रीतीने राज्याला पुन्हा सुस्वरुप तरुण अशी राणी मिळाली… राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसली. आता राजपुत्रानेही कारभारात लक्ष घालावे… निर्णय घ्यायला शिकावेत असा राजेसाहेब त्यांना आग्रह करायला लागले होते. खुशालचेंडू असला तरी राजपुत्र चांगलाच हुशार होता… त्याहीपेक्षा धूर्त होता. ‘राजेसाहेबांची नवी तरुण राणी ही माझ्या दृष्टीने फक्त राज्याची राणी आहे… ती माझी आई होऊच शकत नाही…मुळात मी तसं कधीच समजणार नाही’.. ही खूणगाठ तिला पहिल्यांदा पाहताक्षणीच त्याच्या मनात आपोआपच बांधली गेली होती. आणि नव्या राणीसाहेबांची मनोभूमिकाही याहून फार काही वेगळी नव्हती… ‘‘ 

.. गण्यामधला सुप्तावस्थेतला कथाकार जसजसा जागा होत होता तसतशी राजेंद्रबुवांची अस्वस्थता वाढत चालली होती. खरंतर गण्याच्या गोष्टीत पुढे काय होणार याची त्यांनाही खूप उत्सुकता होती, पण ते ती दाखवू शकत नव्हते… आणि श्रोते? ते तर विसरूनच गेले होते की ते कीर्तनाला आले होते. आता सगळा माहोल केवळ कथाकथनाचा होता… ‘तर मंडळी’ हा शब्दही अनावश्यक वाटायला लागला होता..

‘‘ तर आता राज्याची घडी पुन्हा व्यवस्थित बसली होती. नव्या राणीसरकारही मान-सन्मानाला चांगल्याच चटावल्या.. म्हणजे सरावल्या होत्या हो… भरजरी पैठण्या…शालू-शेले, पेलवणार नाहीत इतके दाग-दागिने या गोष्टींना तर फार झटकन् आपलंसं केलं होतं त्यांनी… मात्र राजपुत्र समोर आले की त्या का इतक्या गडबडून जातात, स्वत:ला विसरल्यासारख्या भांबावून का जातात हे काही त्यांना कळत नव्हतं, आणि बहुतेक राजपुत्रालाही…” गण्या क्षणभर थांबला.. स्वत:च भारावल्यासारखा… पण लगेच सावरला… आणि सांगायला लागला… 

‘‘काळ स्थितप्रज्ञासारखा त्याच्या गतीने पुढे चालला होता…” (पण हा आपला पूर्वीचाच गण्या आहे का या विचाराने त्याची मित्रमंडळी मात्र वेगाने अस्वस्थ होत होती)… क्षणभर थांबून गण्या पुन्हा बोलायला लागला… “ सगळं काही पूर्ववत् सुरू झालं होतं. राणीसाहेब गेल्याचं दु:खही मावळलं होतं. राजांच्या बरोबरीने राजपुत्र कारभारात लक्ष घालत होते… नव्हे आता तरबेज व्हायला लागले होते… आणि… आणि…” गण्या बोलायचा थांबला… ‘‘काय सांगू श्रोतेहो…(इथे गण्याने चेहेऱ्यावर त्याला अतीव दु:ख झाल्याचा मस्त अभिनय केला).. आणि अचानक एक दिवस राज्य पुन्हा एकदा दु:खाच्या गर्तेत कोसळलं … फक्त कोसळलं नाही…जोरात आपटलं…अचानक राजेसाहेबांचं निधन झालं… संपूर्ण राज्य हादरून गेलं… राज्याला सुतकी कळा आली… (आणि एकीकडे गण्याचं शब्दभांडार मात्र बहरत होतं… राज्यावर कोसळलेला दु:खाचा पहाड त्याने आपल्या ओघवत्या वाणीने उत्तमपणे जणू चित्रित केला.) राजेसाहेबांचा असा अचानक मृत्यू कसा झाला हा प्रश्न काही सुटत नव्हता… अनेक प्रकारे तपासून पहाणं कितीतरी दिवस चालू होतं. जनतेच्या विचारातून मात्र हा प्रश्न एव्हाना हळूहळू पुसला गेला होता. जनजीवन पुन्हा बरंच सुरळीत सुरू झालं. जगरहाटीनुसार राजपुत्राचा राज्याभिषेक केला गेला गेला, आणि जनतेला नवा राजा मिळाला….

… तर मंडळी, असेच काही महिने गेले आणि नव्या राजाच्या विवाहाची चर्चा सुरू झाली… वाढली… आणि अनपेक्षितपणे एक दिवस त्यांच्या विवाहाचा मुहूर्त घोषित केला गेला… सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं… संपूर्ण राज्यच सजवलं गेलं होतं…. युवराज्ञी कोण हे जरी तोपर्यंत गुलदस्त्यातच होतं तरी तिच्या स्वागताची तयारी मात्र जोरदार सुरू होती… दरम्यान राजांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे निदान जाहीर केले गेले होते, पण ते अगदी अनपेक्षित म्हणावं इतक्या झटकन् पडद्याआडही गेले होते…” गणू नकळत क्षणभर थांबला… आणि पुन्हा बोलायला लागला… ‘‘आणि अखेर ती विवाह घटिका समीप येऊन ठेपली. ”… गण्याची भाषा एव्हाना फारच ओघवती झाली होती… 

.. ‘‘आणि काय सांगू श्रोते हो… युवराज्ञी मंचावर दाखल झाल्या… कमालीच्या सुंदर… राजघराण्याच्या एका वेगळ्याच तेजाचं वलय त्यांच्याभोवती स्पष्ट जाणवत होतं… एक एक पाऊल हळुवारपणे टाकत त्या पुढे आल्या… राजपुत्रासमोर उभ्या राहिल्या… राजपुत्र भान हरपून त्यांच्याकडे बघत राहिले होते…” (आणि इकडे स्वतःच्या लग्नासाठी कमालीचा आतुर झालेला गण्या मात्र फारच भावविवश झाल्याचं त्याच्या मित्रांनी अचूक हेरलं होतं).. “ आणि.. आणि… बाकी सगळे उपस्थित…काय सांगू तुम्हाला.. अहो कधी चक्कर येतेय याची वाट पहात असल्यासारखे… प्रचंड संभ्रमित… स्वत:लाच चिमटा काढून बघत होते… आ वासून एकमेकांकडे बघत होते… ‘या आहेत युवराज्ञी…? या?? … काहीच महिन्यांपूर्वी महाराणी म्हणून स्वागत केलं होतं ना आपण यांचं? … आणि आता…” आता मात्र गण्या अतिशय भांबावून गेल्याचं बुवांच्या नेमकंच लक्षात आलं होतं…

‘.. जय जय राम कृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…’.. बुवांनी कसंबसं स्वत:ला सावरून जयघोष सुरू केला होता… तोल जाऊन पडता पडता गण्यानेही स्वत:ला सावरलं होतं… ‘ही गोष्ट मला माहिती होती? खरंच की…’ तो भंजाळून गेला होता. ‘ 

‘आता गण्याच्या या स्वप्नरंजनात पुढे आणखी सांगण्यासारखं काय असणार आहे? ’ या सूज्ञ विचाराने सगळे जाणते श्रोतेही एकएक करत जायला निघाले होते… 

… आणि बुवांसमोर दक्षिणेसाठी ठेवलेल्या तबकावर मात्र आज नाणी टाकल्याचा ‘खण खण’ आवाज येत नव्हता.. बुवा डोळे फाडून बघायला लागले तर काय.. चक्क नोटा फडफडत होत्या त्या तबकात… अजिबात आवाज न करता..

बुवा गजर थांबवत मागे वळले. खूश होऊन मुरलीधरापुढे हात जोडायला… पण त्याच्या गाभाऱ्याचे दार मात्र घट्ट बंद झाले होते… बहुतेक आतून… 

समाप्त

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments