श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ अस्वस्थ अंधार – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(*पूर्वसूत्र-* “प्रियाs, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावणार बरं? ” संदीप म्हणाला. प्रियाला कांही धरताही येईना न् सोडताही..
“गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमधे फोन करा लगेच. आणि तब्येतीला जपून रहा. ” ती म्हणाली.
संदीपने तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांध घालायचं भान ती त्याच्याच मिठीत कुठंतरी हरवून बसली होती…! )
इथून पुढे – –
अतिशय खडतर आणि कंटाळवाणा प्रवास संपवून संदीप बसमधून उतरला तेव्हा त्याचं सगळं अंग थांबून गेलं होतं. उभं रहायची शक्तीही त्याच्याजवळ नव्हती. या गलितगात्र अवस्थेत इथं या खेड्यांत एखादी रिक्षा त्याची वाट पहात असेल अशी त्याची अपेक्षा नव्हती, पण इथे धड एखादा टांगाही नव्हता किंवा हमालसुद्धा. आता यापुढं आपली सगळी ओझी आपल्यालाच उचलत रहावं लागणाराय या वास्तवाची जाणीव परिस्थितीने अशा क्रूर पद्धतीने त्याला करून दिलेली होती! ओझं हातात घेऊन तो पाय ओढत चालत राहिला. त्याला त्या अवतारात ब्रँचच्या दारात पाहून ब्रॅंचमॅनेजर जोशींच्या कपाळावर आठ्याच पडल्या.
“येस् प्लीज.. ” त्यांनी त्राग्यानेच विचारलं.
” मी कर्णिक.. संदीप कर्णिक. “
ऐकलं आणि देव भेटावा तसं जोशी आनंदाने उठले. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या केव्हाच विरून गेल्या होत्या.
“ओs देशपांडेs.. , अहो उठाs.. त्या पिंजऱ्यातून बाहेर या,.. बघा तरी कोण आलंय. एs शंकर अरे बघत काय उभा राहिलायस? हो पुढं. बॅगा घे साहेबांच्या हातातल्या… ” जोशींना प्रयत्न करूनही आपला आनंद लपवता येईना.
“देशपांडे, या. हे नवीन साहेब तुमचे आणि कर्णिक साहेब, हे देशपांडे. इथले हेड कॅशिअर. “
संदीपने देशपांडेंकडे पाहून हसत शेकहॅंडसाठी आपला हात पुढे केला. देशपांडे बावचळून थोडावेळ तसेच उभे राहिले. मग कसेबसे हात जोडून त्यांनी नमस्कार केला. या अशा बावळट माणसाच्या सहवासात दिवस काढायचे या कल्पनेनेच संदीप अस्वस्थ झाला.
“चला कर्णिक, दमून आलायत, थोडं फ्रेश होऊन चहा घेऊ. “
ब्रॅंचपासून जवळच एका दगडी जिन्याच्या टोकावर एक छोटी रूम होती.
” हा पहा, हा माझा
राजमहाल. म्हणजे.. आजपासून तुमचा! ” स्वत:वरच खूश झाल्यासारखे जोशी मनापासून हसले. “बघा बरं, कशी वाटतेय रूम? “
संदीपला रूमपेक्षा
ब्रॅंचबद्दलच जास्त उत्सुकता होती.
” ही ब्रँच कशी आहे? “
“हां.. आहे.. तशी बरीच म्हणायची. म्हणजे.. नॉट बॅड. इथं काम म्हणाल तर पूर्ण आराम आहे बघा. ब्रॅचमधे फोन नाही त्यामुळे डिव्हिजनल
ऑफिसकडून कसले तगादे नाहीत. तालुक्याच्या गावातून दिवसातून एकच एस्. टी येते आणि तीच परत जाते. बाकी शुकशुकाट. पावसाळ्यात मधल्या ओढ्याला एकदा पाणी आलं की ती एस्. टी. सुद्धा चार चार महिने इकडे फिरकत नाही बघा. “
“आणि कस्टमर्स कसे आहेत? “
“कस्टमर्स? अहो इथं असल्या खेड्यात कस्टमर्स कुठून असायला? ते फक्त तिकडं आपल्या शहरात असतात. इथं सगळेच आंगठेबहाद्दर आणि तरीही एकापेक्षा एक बेरकी. त्यातले कुणी बँकेकडे फिरकतही नाहीत आणि आपण त्यांच्याकडे जाऊन काही उपयोग होत नाही. निगेटिव्ह ग्रोथ आणि लॉस मेकिंग ब्रॅंच म्हणून डिव्हिजनल मॅनेजर दर मीटिंगमधे आपली खरडपट्टी काढत असतात. ते खाली मान घालून ऐकून घ्यायचं. तेवढं केलं की बाकी कश्शाचा कांही त्रास नाही बघा. “
संदीप उदास हसला. जोशीना जे सहज वाटत होतं ते खाली मान घालणंच त्याला अवघड होतं आणि एरवी सुद्धा असं पाण्याबाहेर बसून रहाणं त्याला मानवणारही नव्हतं. या ब्रँचचं संपूर्ण चित्र बदलून टाकायचं हे एक आव्हानच होतं. अर्थात संदीपचे प्रयत्न त्या दिशेनेच सुरू रहाणार होते. ‘पण…? पण हे सगळं आपल्या एकट्याला जमेल? ‘ तो विचारात पडला. ‘एकटा कां म्हणून? देशपांडे आहेतच की बरोबर.. ‘ त्याला अचानक मनात कुठेतरी आधार मिळाल्यासारखा वाटला.
” जोशीसाहेब, ते देशपांडे कसे आहेत हो कामाला? ” संदीपने विचारलं.
जोशींचं तोंड पुन्हा वाकडं झालं. “हां म्हणजे आहे तसा बरा, पण फार किरकिरा आहे बघा. अहो, हेडकॅशिअरशीप मिळत होती म्हणून स्वत: अर्ज करून इथं आला होता. तेव्हा नवीनच लग्न झालं होतं. लहान बाळही होतं. इथला एकंदर रागरंग बघून कातावला होता बघा. पुढे मुलाला कसल्यातरी किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि मग इथं दवाखान्याची सोय नाही म्हणून बायको मुलांचं पार्सल दिलंन्
तिकडं पाठवून. त्यालाही सहा वर्षं होत आलीत. तेव्हापासून आता एकटाच बसलाय इथं बोंबलत. “
कानावर ओरखडे ओढणारे जोशींचे हे शब्द त्याला कसेसेच वाटले. इथं येतानाचा त्याचा उत्साह हळूहळू विरून जाऊ लागला. एव्हाना जोशींनी चहा स्टोव्हवर चढवून ठेवला होता. त्यालि मनाच्या त्या अस्वस्थतेत अचानक प्रियाची आठवण झाली… ‘अरे प्रियाला फोन करायचाय.. ‘
“जोशीसाहेब, चहा घेऊन लगेच जरा पोस्टात जाऊन येऊया. मिसेसला फोन करायचाय हो. ती वाट पहात असेल. “
जोशींनी तोंड वाकडं केलं.
” कर्णिक, इथं तुम्ही उगीच त्या फोनबीनच्या फंदात पडू नका बघा. ” जोशी कशाचाच निर्भेळ आनंद याला मिळूच नये म्हणून धडपडत असल्यासारखे म्हणाले.
“कां बरं? फोन करायचा तर पोस्टात जायला हवंच ना? “
“अहो, वन मॅन पोस्ट इथलं. तो पोस्टमास्तरसुद्धा कधीच जागेवर नसतो. त्यातून नंबर मिळायचा म्हणजे रात्रभर तिथं बसून रहावं लागेल बघा वाट बघत. “
संदीपच्या हातातल्या त्या वाफाळलेल्या चहाची चवच बेचव होऊन गेली.
“मग… काय कर्णिकसाहेब, आज रिलीव्ह होऊ कां मी? ” जोशी आशाळभूतपणे मुद्द्यावर आले. तिकडे फोनची वाट पहात बसलेल्या प्रियाला नजरेआड करीत या वास्तवाचा समाधानाने स्वीकार केल्यासारखं संदीप म्हणाला, ” येस्स.. बाय ऑल मीन्स! “
—–
तीन दिवस सलग धडपड करून सुद्धा फोन लागला नाहीच. अखेर कंटाळून मनातल्या नेमक्या भावना व्यक्त करणारं एक भलं मोठं पत्र त्याने प्रियाला लिहिलं आणि तिच्या उत्तराची वाट पहात राहिला. आजच्या इनवर्ड मेलमध्ये एक इनलॅंड लेटर आलेलं पाहून त्याने झडप घालून आधी तेच हातात घेतलं. पण ते पत्र त्याचं नव्हतंच. ते देशपांडेंच्या नावाचं होतं. देशपांडेंच्या या छोट्याशा आनंदात सहभागी होण्याइतकं संदीपचं मन मोठं होतं आणि त्यामुळे त्याने उत्सुकतेने देशपांडेना हाक मारली.
” देशपांडे, हे पत्र आलंय बघा तुमचं. ” संदीपला वाटलं आता देशपांडे धावत येतील. पण ते नेहमीप्रमाणे पाय ओढत चालतच आले होते. ‘या माणसाला कधी कशाचा आनंद कसा होत नाही? ‘ त्याला प्रश्न पडला. देशपांडेंच्या दाढीचे वाढलेले खूंट कधी नव्हे ते संदीपच्या नजरेला खुपू लागले. देशपांडेंनी निर्विकारपणे ते पत्र घेतलं, थंडपणे त्याकडे पहात राहिले क्षणभर. मग वळले आणि पाय ओढत परत गेले.
एव्हाना शंकरने बाकीचं इनवर्ड मेल व्यवस्थित जुळवून संदीपच्या टेबलवर आणून ठेवलं होतं. ते समोर घेऊन संदीप बघायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याच ओढलेल्या चेहऱ्याने देशपांडे पुन्हा संदीपच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांना पाहिलं आणि आपल्या कपाळावर आठ्या पडणार नाहीत याची जाणीवपूर्वक खात्री करून घेत संदीप अतिशय प्रयत्नपूर्वक प्रसन्न हसला.
” काय म्हणताय देशपांडे? “
देशपांडे उदास हसले.
“देशपांडे, अहो सांगा ना, काय झालंय? “
” साहेब, चार दिवस रजा हवी होती. “
” एवढंच ना? त्यात काय? अरे मग घ्या ना.. ” संदीप मनापासून म्हणाला. ऐकलं आणि देशपांडे स्वतःच्या कानांवर विश्वासच नसल्यासारखे बघतच राहिले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे ते दाढीचे खुंट वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसे खुदकन् हसले.
“थँक्यू सर.. थँक्यू व्हेरी मच”
” अरे थँक्स कशाबद्दल? ” देशपांडे पुन्हा कोमेजले.
” पूर्वी अशी मागितल्याबरोबर कधी रजा मिळालीच नव्हती साहेब. रजा मागितली की आधी जोशीसाहेबांचे चाबकाच्या
फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे. ” देशपांडेंचा आवाज भरून येत होता.
” देशपांडे, जस्ट रिलॅक्स. अहो अशा साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल? “
या थोड्याशा आपुलकीचा धक्काही सहन न होऊन देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहू लागले. संदीप मनातून थोडासा हलला.
” काय झालंय देशपांडे? घरी कांही प्रॉब्लेम? “
” मुलाला बरं नाहीय”
संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावू लागली.
“किती वर्षांचा आहे मुलगा? “
“सहावं सुरू आहे. “
” रहातो तुमच्याशिवाय? तुमची आठवण नाही काढत? “
देशपांडे आपलं हरवलेलं सुख शोधत राहिले…!!
– क्रमश: भाग दुसरा
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





