☆ पालवी…! ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆
(पुरस्कृत कथा)
कुंभारी नावाचे एक छोटेसे, संथ गतीचे गाव. या गावात भिमाई नावाची एक वृद्ध आजी राहत होती. भिमाईचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले होते, तरीही गावात तिचा मान मोठा होता. हातात जुने पंचांग धरून ती कट्ट्यावर बसलेली असायची. गावात नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव काय ठेवावे, नावरस नाव कोणत्या अक्षरावरून येते, नक्षत्र कोणते, जन्मतिथी आणि शुभमुहूर्त कोणता, हे विचारण्यासाठी लोक तिच्याकडे गर्दी करायचे. लोक पंचांगावर एक-दीड रुपया ठेवून तिच्याकडून मुहूर्त काढून घ्यायचे. भिमाईकडे मोडी लिपी वाचण्याचे आणि लिहिण्याचे कौशल्य होते, शिवाय तिचे पावकी-दिडकीचे पाढे अगदी तोंडपाठ होते.
भिमाईचे वैयक्तिक जीवन मात्र गूढ आणि वेगळे होते. आई-वडिलांच्या निधनानंतर ती आणि तिची बहीण वेगळ्या झाल्या होत्या. त्या तिघी बहिणींपैकी दोघी जोगतीणी होत्या, तर एकीचे लग्न झाले होते. आजीला विठ्ठल नावाचा एकच मुलगा होता. विठ्ठलचे वडील कोण, हे संपूर्ण गावात कोणालाच माहीत नव्हते; अगदी विठ्ठलला स्वतःलाही ते कधी समजले नाही. ते विचारण्याचे धाडस कोणी कधी केलेच नाही. आजीने आई-वडिलांकडून वाटणीत आलेल्या शेतीच्या जोरावर स्वतःचे आणि मुलाचे जगणे अत्यंत स्वाभिमानाने आणि धाडसाने उभे केले होते.
विठ्ठल मॅट्रिकपर्यंत शिकले आणि पुढे त्यांना तलाठी म्हणून शासकीय नोकरी मिळाली. तलाठी असल्यामुळे तालुक्याच्या विविध गावांमध्ये त्यांच्या बदल्या होत असत. विठ्ठल यांची पत्नी सरू ऊर्फ सरिता. सरिताचे माहेर कर्नाटकातील होते. ती पूर्णपणे निरक्षर असली, तरी संसाराच्या अन् जगण्याच्या बाबतीत अत्यंत चिवट आणि खंबीर होती. विठ्ठल-रुक्मिणीची परमभक्त असलेल्या सरिताला भजनांमुळे अनेक अभंग मुखोद्गत होते. घरकामात आणि संसारात तिची धावपळ पाहून विठ्ठल तिला जमेल तशी मदत करायचे.
विठ्ठल आणि सरिता यांना एकूण सात मुले झाली. सहा मुली आणि एक मुलगा. या सात भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मुलगी म्हणजे ‘रोहिणी’. पंचांगाप्रमाणे रोहिणी नक्षत्रावर तिचा जन्म झाला म्हणून आजीने तिचे नाव रोहिणी ठेवले होते.
रोहिणीच्या कुटुंबाची विचारसरणी अत्यंत पारंपरिक आणि पुरुषसत्ताक होती. मुली म्हणजे ‘परक्याचे धन’, एकदा लग्न करून दिले की आपली जबाबदारी संपली; दिल्या घरी तिचे काहीही होवो, मुलींच्या शिक्षणावर जास्त खर्च करून काही उपयोग नाही, असा दृढ समज कुटुंबात रुजलेला होता. मुलगी वयात आली किंवा तिला पहिली मासिक पाळी आली की ती लग्नायोग्य झाली असे मानले जाई. त्यानंतर तिची पसंती-नापसंती न पाहता, जो कोणता मुलगा समोर येईल त्याच्याशी तिचे हात पिवळे करून तिला सासरी पाठवले जायचे.
परंतु, लहानपणापासूनच रोहिणीची विचारसरणी या सगळ्याच्या पूर्णपणे विरोधात होती. गल्लीतील पुरुषांचे वर्चस्व, दारू पिऊन दंगा करणारे लोक आणि रोज चालणारी भांडणे बघत ती मोठी होत होती. आपण कोणाच्या पोटी किंवा कोठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसते याची जाणीव तिला होती, तरीही अंधारातून प्रकाशाचा एक किरण नक्कीच उजळून येईल, अशी एक अनामिक आशा तिच्या मनात सतत तेवत असायची
वयाच्या सहाव्या वर्षी आजीने रोहिणीचे नाव गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेत घातले. रोहिणीचा आजीवर खूप जीव होता. त्यामुळे आजीला सोडून शाळेत जायला ती तयार नसे. सुरुवातीचे काही महिने ती शाळेतून वारंवार पळून घरी यायची. स्वतःला सावरत नियमित शाळेत जाण्यासाठी तिला तब्बल सहा महिने लागले.
घरची मातृभाषा कन्नड होती. आई, घरातील इतर सर्व मंडळी आणि गल्लीतील लोक कन्नड भाषेतच बोलायचे. रोहिणीला कन्नड लिहिता-वाचता येत नसले तरी ती भाषा पूर्ण समजायची आणि बोलताही यायची. तिची शाळा मात्र मराठी माध्यमात होती.
रोहिणी तिसऱ्या इयत्तेत असताना एक विचित्र गोष्ट घडायला लागली. गल्लीतील काही बायका तिच्या आईकडे यायच्या आणि कन्नड भाषेत काहीतरी सांगून जायच्या. “तुझी पहिली मुलगी लग्न देऊन गेलीस, दुसरी मुलगी खूप भोळी आहे. ही तिसरी रोहिणी थोडी हुशार आणि देखणी आहे, हिला तरी सोड, ” असे शब्द रोहिणीच्या कानावर पडायचे. रोहिणीला समजायचे नाही की या बायका आईला नेमके काय सांगत आहेत.
एक दिवस न राहवून रोहिणीने आईला विचारले, “ह्या बायका तुला काय सांगतात? “
आईने बराच वेळ शांत राहून, एक मोठा आवंढा गिळला आणि म्हणाली, “तू लहान आहेस, तुला किती कळते हे मला माहीत नाही; पण विचारतेस तर सांगते… आजीसारखं तुला देवाला सोड म्हणतात. “
हे ऐकून रोहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात आजी जोगतीण असल्यामुळे ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी एका तरी मुलीला यल्लम्मा देवीला अर्पण केले पाहिजे, नाहीतर देवीचा कोप होऊन कुटुंबाचे अतोनात नुकसान होईल, अशी घरातील अंधश्रद्धा होती. हे ऐकून रोहिणी अतिशय चिंतेत पडली.
त्याच काळात तिच्या वडिलांची तलाठी म्हणून असलेली नोकरी एका कारणास्तव अचानक गेली; त्यांना निलंबित करण्यात आले होते. घरात खाणारी तोंडे जास्त आणि उत्पन्नाचे साधन नाही, यामुळे कुटुंबावर भीषण उपासमारीची वेळ आली. रोहिणी शाळेत जायच्या ऐवजी आईसोबत शेतात मजुरीला जाऊ लागली. मोठी बहीण घर, स्वयंपाक आणि भांडी-कुंडी सांभाळून शाळेत जायची. रोहिणीला शाळेची प्रचंड आवड होती, परंतु आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच तिला शाळेत जायला मिळायचे.
शेतात असताना रोहिणी लहान बहिणीला, दगडी भिंतीला फळा आणि कोळशाला खडू मानून मुळाक्षरे (अ, आ, इ) व अंक शिकवायची. या एक शिक्षक आणि एक विद्यार्थी असलेल्या खेळात तिला मोठा आनंद मिळायचा. शेतात तिने एक शेळी पाळली होती. शेळीला आवरताना ती स्वतः कितीही खाली पडली तरी तिच्या हातातली दोरी सुटत नसे.
अशा भयंकर परिस्थितीत रोहिणीच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले आणि ती सासरी निघून गेली. आईसारख्या मोठ्या बहिणीच्या विरहाने रोहिणी महिनाभर रोज आठवणीने रडत असे. महिन्यानंतर जेव्हा ती वडिलांसोबत बहिणीच्या सासरी गेली, तेव्हा तिथले दृश्य पाहून ती सुन्न झाली. दोन छोट्या खोल्यांमध्ये सासू-सासरे, दीर-जाऊ, नणंद असा सगळा भरगच्च संसार. हातात भरपूर बांगड्या, पायात जड पैजण आणि जोडवी, कपाळावर भलेमोठे कुंकू आणि अंगावर साडी गुंडाळून सतत कामात जुंपलेली तिची बहीण! रोहिणीला तिच्याशी मनमोकळे बोलताही आले नाही.
स्त्रीचे हे परस्वाधीन आणि अजागळ जगणे पाहून रोहिणीचे मन विषण्ण झाले. तिने मनात पक्का निर्धार केला, आपण खूप शिक्षण घ्यायचे, जेणेकरून आपल्या वाट्याला असले पारतंत्र्याचे जगणे येणार नाही. पण त्यासाठी आपल्याला लवकर मासिक पाळी येऊ नये, कारण पाळी आली की घरचे आपले लग्न लावून देतील, ही एकच भीती तिच्या मनात घर करून बसली होती.
रोहिणीच्या इतर दोन बहिणींचे शिक्षण आठवीतच थांबवून त्यांची लग्ने करून देण्यात आली होती. केवळ घरी आलेले पत्र किंवा तार वाचता यावी एवढेच मुलींचे शिक्षण असावे, असा घरातील विचार होता. त्या बहिणींनीही कधी शिक्षणासाठी बंड केले नाही; मन मारून जगणे त्यांनी स्वीकारले होते.
परंतु रोहिणीला ही अन्यायी रीत मोडून काढायची होती. कोणाशीही वाद न घालता, शांत राहून कठोर अभ्यास करायचा, वेळेवर शाळेत जायचे आणि सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, असे तिने ठरवले.
गल्लीत दररोज इकडेतिकडे वावरणाऱ्या जोगतीणी आणि मुरळ्यांना पाहून रोहिणीच्या मनात भीतीचा काटा उभारायचा. आपले जीवन तसे तर होणार नाही ना, या भीतीने ती वारंवार आईला विचारायची. आई तिला धीर देत म्हणाली, “मी माझ्या मुलींना असे देवाला सोडणार नाही, त्यांचे व्यवस्थित लग्न करून देईन. ” आईच्या या शब्दांमुळे रोहिणीला थोडा धीर मिळायचा.
जशी ती मोठी होऊ लागली, तसे तिला समाजातील स्त्री-पुरुष विषमतेची जाणीव होऊ लागली. घरातील सर्व कामे स्वयंपाक, भांडी, कपडे, सासू-सासऱ्यांची सेवा केवळ स्त्रियांनीच का करायची? अमावस्या किंवा पौर्णिमेला नारळ फक्त पुरुषांनीच का फोडायचा? सत्यनारायण पूजेला नेहमी भाऊच का बसतो, बहीण का नाही? सीतामाईनेच अग्निपरीक्षा का दिली, रामाने का नाही? लग्नाच्या वेळी ‘सावधान’ ऐकताच रामदास स्वामी पळून गेले, मग त्या नवरीचे पुढे काय झाले असेल? देव सर्वांचा एकच असेल तर मुलगी आणि तिच्या नैसर्गिक शारीरिक बदलांवर अन्याय का? असे शेकडो प्रश्न तिच्या मनात थैमान घालायचे. उत्तर मिळाले नाही की ती शांत होऊन शाळेतील कवितांमध्ये आणि अभंगांमध्ये मन रमवायची.
“देवा तुझे किती सुंदर आकाश…
सुंदर प्रकाश सूर्य देतो… “
चौथीत असताना रोहिणी उड्या मारत खेळायला जात असताना आईने तिला अडवले आणि म्हणाली, “आता तू मोठी झालीस, बाहेर खेळायला जायचे नाही! घराची कामे करायची. ” रोहिणी काहीच बोलली नाही; तिने शांतपणे घरात जाऊन पुस्तकात तोंड खुपसले.
तिची दुसरी बहीण रश्मी खूप भोळी होती. रोहिणी आठवीत असताना रश्मीचे लग्न झाले. खरं तर रोहिणी चौथीत असतानाच तिचेही लग्न ठरवण्याचा प्रयत्न झाला होता, पण काही कारणाने ते मोडले होते. “मुलींचे हात पिवळे केले की आपली जबाबदारी संपली, ” असे आजीला वाटे. आईलाही कायम काळजी असायची की, आपली सासू जोगतीण असल्याने आपल्या मुलींची लग्ने व्यवस्थित होतील का? रोहिणी दिसायला बरी असल्याने ती कोणाच्या प्रेमात पडली किंवा तिला कोणी पळवून नेले तर? जास्त शिकलेल्या मुली संसार करत नाहीत, मग हिच्याशी कोण लग्न करणार? असे प्रश्न आई रोहिणीसमोर बोलून दाखवायची.
पण रोहिणी हळूहळू आतून बंडखोर बनत होती. एकदा घरामध्ये अमावस्येचा नारळ फोडण्यावरून वाद झाला. “नारळ मीच फोडणार! ” असा हट्ट रोहिणीने धरला.
आजी ओरडली,
“मुलींनी नारळ फोडायचा नसतो, नाहीतर पुढे मुलेबाळे होत नाहीत! “
यावर रोहिणी तडकाफडकी म्हणाली, “मला मूलंबाळं नकोत! नाही झाली तरी मला काही फरक पडत नाही. “
आजीने घरभर आरडाओरडा केला की रोहिणी बिघडली आहे. पण रोहिणीने तो दांडगावा करून नारळ फोडलाच, आणि पुढे अनेक अमावस्या-पौर्णिमेला तिने स्वतःच नारळ वाढवला.
रोहिणीचा भाऊ तिच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठा होता. स्वतः आठवी नापास, कोणताही धंदा-रोजगार नसलेला तो रिकामटेकडा भाऊ अत्यंत हुकूमशाही प्रवृत्तीचा होता. मुलींनी शाळेत गेलेले त्याला अजिबात आवडत नसे. रोहिणीला शाळेतून यायला थोडा उशीर झाला की, “उद्यापासून हिची शाळा बंद! ” असा फर्मान सोडायचा. रोहिणी सहावीत असताना भावाचे तिसरे लग्न झाले. पहिल्या दोन बायकांना त्याने घटस्फोट दिला होता. त्यात त्या निष्पाप स्त्रियांची काहीच चूक नव्हती हे रोहिणीला समजत होते. पुरुषप्रधानता केवळ पुरुषांच्याच नव्हे, तर स्त्रियांच्याही डोक्यात घट्ट बसली आहे, याचे तिला आश्चर्य वाटायचे. भावाची तिसरी बायको थोडी शिकलेली असल्याने तिचे आणि रोहिणीचे थोडे सुसंवाद जमायचे.
रोहिणी आता १३-१४ वर्षांची झाली होती आणि आठवीत शिकत होती. शाळेतील वक्तृत्व, नाटक, नृत्य या सर्व स्पर्धांत ती भाग घ्यायची आणि बक्षीसे मिळवायची. पण याच काळात तिला वयोमानानुसार पहिल्यांदा मासिक पाळी आली. घरात ही गोष्ट समजली तर तिचे शिक्षण कायमचे बंद करून लग्न लावून दिले जाईल, हे तिला पक्के माहीत होते. त्यामुळे तिने हे रहस्य कोणालाही न सांगता गुप्त ठेवण्याचा भयंकर कठीण निर्णय घेतला.
दर महिन्याचे ते पाच दिवस तिच्यासाठी दिव्य असायचे. “पाळी बंद होण्याचे काही औषध नसते का? ” असा प्रश्न तिच्या मनात यायचा.
एकदा श्रावण महिन्यात घरी सत्यनारायणाची पूजा होती. दरवर्षी पूजेला तिचा भाऊच बसायचा. या वेळी रोहिणीने पूजेला बसण्याचा हट्ट धरला. घरातील सर्व विरोध करत असताना आई म्हणाली, “तिची पाळी अजून चालू झाली नाही, ती अजून वयात आली नाही, कदाचित ती बाई नसेलच! त्यामुळे ती पूजेला बसली तर काही अघटित होणार नाही. “
पूजेचा दिवस उगवला. पूजा दुपारी चार वाजता होती आणि योगायोगाने दुपारी दोन वाजता रोहिणीची पाळी सुरू झाली! घरात बाथरुम नव्हते, केवळ आंघोळीची न्हाणी होती. पण प्रचंड मानसिक खंबीरता दाखवून रोहिणीने ती गोष्ट लपवून ठेवली. हे सगळे नैसर्गिक आहे, मग का घाबरायचे? असा विचार करत तिने मासिक पाळी सुरु असतानाच सत्यनारायणाची पूजा यशस्वीपणे पार पाडली.
रोहिणी नववीत गेली तरी ती ‘वयात आली नाही’ म्हणून घरात काळजी व्यक्त होऊ लागली. तिला डॉक्टरांकडे नेण्याचे ठरले, पण तिने चाणाक्षपणे तो विषय टाळला.
नववीत असतानाच तिच्या घरातील लोकांनी तिचे लग्न एका ३० वर्षांच्या इंजिनीअर मुलाशी ठरवले. रोहिणीचा नाइलाज झाला होता; ती शाळेचा युनिफॉर्म उशाशी धरून रात्री मुसमुसून रडायची. नशिबाने, मुलाचे वय जास्त असल्याने किंवा तिच्या अंतरिक इच्छेच्या प्रभावामुळे ते लग्न ठरता ठरता मोडले. रोहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
शाळेत तिची प्रगती खूप चांगली होती. नववीत तिने बसवलेले “शांतता, कोर्ट चालू आहे” हे नाटक संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आले. नववीच्या परीक्षेत तिला तब्बल ९२% गुण मिळाले.
आता दहावीचे महत्त्वाचे वर्ष सुरू झाले. घरात लहान न्हाणीऐवजी एक छोटे बाथरूम बांधले गेले होते. घरात बहिणी आणि वहिनींच्या बाळंतपणाची गर्दी, लहान मुलांचे रडणे, आणि माणसांचा गलका असायचा. या सर्व गोंधळात रोहिणीने बोर्डात प्रथम येण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास चालू ठेवला.
परंतु, त्या पाच दिवसांत तिची प्रचंड कुचंबणा व्हायची. कधी कपड्यांवर डाग पडायचे, तर कधी अतिरक्तस्त्रावामुळे शाळेतून चालताना पायावरून रक्ताची ओघळ खाली यायची. ती स्वतःचे कपडे स्वतः धुवायची. बहिणींना तिच्यावर शंका यायची, पण रोहिणी “रंग लागलाय” किंवा “लाल शाई सांडली आहे” अशी कारणे देऊन वेळ मारून नेई. घरातील सर्व लोक तिच्यात अजून ‘स्त्रीत्व’ आले नाही यावरच चर्चा करत राहिले.
एकदा शनिवारी अर्ध्या दिवसानंतर शाळा सुटल्यावर रोहिणी घरी चालली होती. तिच्या मागे तिच्याच गल्लीतील इंदू नावाची मुलगी चालत होती. इंदूने जवळ येऊन विचारले,
“तुला एक सांगू का? तुझ्या पायावरून रक्त ओघळत आहे, तुझी पाळी सुरू झाली आहे वाटतं? “
रोहिणीने तात्काळ स्वतःला सावरत उत्तर दिले,
“नाही ग इंदू! मला मागे ढुंगणावर एक करट उठले आहे, ते फुटल्यामुळे रक्त येत आहे. मला अजून पाळी आलीच नाही! “
अशा अगणित अडचणी, शारीरिक त्रास आणि मानसिक ताण सहन करत रोहिणीने दहावीची बोर्डाची परीक्षा दिली. सुट्ट्यांमध्ये तिने रामायण, महाभारतासह शेकडो पुस्तके वाचून काढली.
जून महिन्यात दहावीचा निकाल लागला. रोहिणी संपूर्ण परीक्षा केंद्रात पहिली आली होती! तिच्या शाळेच्या १३ वर्षांच्या इतिहासात केंद्रात नेहमी मुलेच पहिले येत असत. तब्बल १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच एका मुलीने केंद्रामध्ये प्रथम येण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला होता.
तालुक्यात आणि गावात तिचा जंगी सत्कार झाला. आई-वडील आणि आजी आनंदाने फुलून गेले. रोहिणीला खरे तर शिक्षिका व्हायचे होते, परंतु एका पत्रकाराने आणि नात्यातील एका काकांनी तिला डॉक्टर होण्याचा मार्ग दाखवला. तिने डॉक्टर व्हायचे निश्चित केले आणि ११ वी विज्ञान शाखेत (Science) प्रवेश घेतला. आता तिच्या शिक्षणाला घरातील कोणाचाच विरोध राहिला नाही.
११ वीत असताना घरात पुन्हा तिच्या पाळीची आणि डॉक्टरांकडे नेण्याची चर्चा सुरू झाली. आता धोका टळला होता; त्यामुळे रोहिणीने संधी साधून “मला याच वर्षी पाळी सुरू झाली आहे” असे घरात सांगून टाकले. आजीने पंचांग काढून मुहूर्त शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहिणीने श्रावणातील एक दिवस सांगून त्या विषयाला कायमचा पूर्णविराम दिला.
कोणताही खाजगी क्लास नाही, की कोणाचे विशेष मार्गदर्शन नाही. कॉलेजमधील शिक्षकांचे लेक्चर मन लावून ऐकायचे आणि रात्रंदिवस अभ्यास करायचा. १२ वीच्या परीक्षेत रोहिणीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB Group) मध्ये ८५% गुण मिळाले. तिच्या गुणवत्तेच्या जोरावर तिला एका नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) प्रवेश मिळाला.
गावातून, गल्लीतून आणि संपूर्ण स्तरातून वैद्यकीय शिक्षणासाठी शहर गाठणारी, डॉक्टर होणारी रोहिणी ही पहिलीच मुलगी ठरली. सुरुवातीला शहरात गेल्यावर ती थोडी बावरली खरी, पण शिक्षणाची तीव्र ओढ तिला बळ देत गेली. जिद्दीच्या जोरावर ती अत्यंत यशस्वीपणे डॉक्टर झाली!
“मुलींना शिकवून काय करायचे? शेवटी त्यांना चुलीसमोर भाकऱ्याच बडवायच्या आहेत! ” असे म्हणणाऱ्या समाजाच्या तोंडावर रोहिणीने आपल्या कर्तृत्वाने सणसणीत चपराक मारली होती. तिने सावित्रीबाई आणि महात्मा जोतीराव फुलेंचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.
डॉक्टर झाल्यानंतर तिने केवळ वैद्यकीय सेवा केली नाही, तर मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, मुलींनी मासिक पाळीला न घाबरता त्याचा सहजतेने स्वीकार करावा, आणि पालकांनी मुलांप्रमाणेच मुलींनाही मानाने शिकवावे, यासाठी समुपदेशन वर्ग सुरू केले.
लहानपणी ऐकलेले संतसाहित्य तिला नव्याने समजायला लागले होते. संत सोयराबाईंचा अभंग तिच्या ध्येयाचा श्वास बनला.
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुध्द बुध्द ॥
तसेच संत जनाबाईंचा पुरोगामी विचार तिच्या मनात कायम घुमत राहिला.
डोईचा पदर आला खांदवरी ।
भरल्या बाजारीं जाईन मी ॥
पुढे रोहिणीचा विवाह एका उत्तम विचारांच्या जोडीदाराशी झाला. आपल्या पतीच्या साथीने, दवाखाना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत रोहिणीने ‘पालवी’ नावाची सामाजिक संस्था सुरू केली.
प्रबोधन, प्रशिक्षण, समुपदेशन आणि मदत या तत्त्वांवर काम करत ‘पालवी’ ही संस्था मोठ्या वृक्षासारखी बहरत गेली. ज्या कोवळ्या वयात मुलींच्या आशा-आकांक्षा करपून जात होत्या, त्याच वयातल्या मुलींच्या स्वप्नांना डॉ. रोहिणीच्या मदतीने आता एक नवी, हिरवीगार ‘पालवी’ फुटू लागली होती…
© डॉ. सोनिया कस्तुरे
कस्तुरे आरोग्य केंद्र, विश्रामबाग, सांगली
9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





