श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “दिवाळी आहे म्हणून.!!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की.
बऱ्याच वर्षांपासून शालिनीचं छोटसं जनरल स्टोअर चौकात होतं. सीझनप्रमाणे वस्तु विकायची. जवळपास दुसरं दुकान नसल्यानं दुकान बऱ्यापैकी चालत होतं. त्या दुकानापासून काही अंतरावर शांतानं टेबलावर पूजेचं साहित्य विकायला ठेवलेलं शालिनीला आवडलं नाही. तिनं सुरवातीला दुर्लक्ष केलं पण दिवसेंदिवस राग वाढत होता. कळकट टेबलावरच्या दुकानात गिऱ्हाईक जाऊ लागली. हे शालिनीला सहन झालं नाही. त्यातच कळलं की शांता वस्तू एकदोन रुपायांनी स्वस्तात विकत होती. संतापलेली शालिनी तडक शांताकडे गेली.
“बोला. ताई”शांतानं विचारलं.
“ए. इथं बसायचं नाही. आवर चल. ”शालिनी खेकासली.
“दिवाळी हाय. दोन पैसे कमवू दया की. ”शांता हात जोडत म्हणाली.
“एकदा सांगितलेलं कळत नाही का? . लवकर उचल नाही तर फेकून देईन”
“दिवाळी झाली की बंद करते तोपर्यंत राहू दया. ”शांता बोलत असतानाच शालिनीनं टेबल्यावरच्या वस्तू खाली ढकलल्या. शांताच्या डोळ्यात पाणी आलं. काहीही न बोलता शांतानं वस्तू उचलून टेबलावर ठेवायला सुरवात केली तेव्हा शालिनीनं टेबल उलटं केलं आणि बडबड करायला लागली.
“परत इथं दिसलीस तर बघ. महागात पडेल”शालिनीच्या धमकीनं इतका वेळ समजुतीनं घेणारी शांता भडकली.
“असं असलं तर मी इथंच बसणार. प्रेमानं बोलले तर दादागिरी करतीयेस. जा काय करायचे ते कर”
“नीटच सांगतेय. जास्तीचा शहाणपणा केलास तर माझ्याशी गाठ आहे. रस्ता तुझ्या बापाचा नाही. ”शालिनी.
“तेच सांगतेय. रस्ता पब्लिकचायं. मी कुठंही बसलं. अडवणारी तू कोण? एक ध्यानात ठेव माजं नुसकान केलं तर तुज्या दुकानालाबी सोडणार नाई”पदर खोचत शांता म्हणाली. तिचा आवेश पाहून शालिनी बिथरली. बोलाचाली इतक्या वाढल्या की पार एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. जोरदार भांडण. आजूबाजूचे लोक मधे पडले नसते तर हाणामारीच झाली असती. हा प्रकार पाहून आलेली गिर्हाइकं निघून गेली. दिवसभर चौकात या भांडणाचीच चर्चा. शांतानं दुकान तिथच थाटलं आणि शालिनीनं टोमणे मारणं थांबवलं नाही. दोघींमधली धुसफूस वाढतच होती. नजरा नजर झालीच तर चेहऱ्यावर खाऊ की गिळू असेच भाव. कोण जास्त स्वस्तात माल विकतयं याची शर्यत सुरू झाली. नुकसान होत असूनही कोणीच मागं हटायला तयार नव्हतं. हळूहळू दोघींचं वागणं चेष्टेचा विषय झालं.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी शालिनीनं सकाळी दुकान उघडल्यावर काही वेळातच शांता आली.
“तू इथं!! काय पाहिजे”शालिनी खेकसली.
“काई नाही. द्यायला आलीये”
“काय? ”
“दिवाळीच्या शु बे च्छा”शांताच्या बोलण्याचं शालिनीला हसू आलं.
“हसायला काय झालं”
“तू येडपट येस. इतके दिवस भाडंत होतीस आणि आज… ”
“अवो. ताई!! आता दिवाळी सुरू झाली. आनंदाचा सण. समदं जग दिवाळी जोरात करतं मग आपणच कश्याला भांडायचं. जे झालं ते सोडून द्या. आपण काय दुश्मन नाय. रोज येकमेकांची तोंड दिसणार उगीच कशाला डोक्यात राख घालायची. म्हणून आले. हॅप्पी दिवाली!! ”हात पुढं करत शांता म्हणाली. तेव्हा शालिनी तिच्याकडं एकटक पाहत राहिली. “खरंय तुझं!! विनाकारण खुन्नस ठेवल्याचा त्रास स्वतःलाच होतो. मलाही वाटत होतं. दिवाळी आहे भाडण मिटवावं पण ईगो आडवा आला पण… तू ग्रेट!! तुझ्या सारखं वागणं प्रत्येकाला जमतं नाही. मोठया मनाची आहेस. तुला दिवाळीच्या खूप खूप खूपच शुभेच्छा!! ”फराळाचं पाकीट शांताच्या हातात ठेवत शालिनी घट्ट बिलगली. तेव्हा दुकानातल्या रेडिओवर लता मंगेशकर गात होत्या “आनंदी आनंद गडे. जिकडे तिकडे चोहीकडे… ”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




