श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “मुक्कामाची गाडी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
आज मुक्कामाची एस. टी. अंमळ उशिराच आली गावात. पोटासाठी गाव सोडून शहरात मजुरी करायला गेलेली गडीमाणसं या गाडीने गावी आली होती दिवाळीला. काहींच्या हातात पिशव्या होत्या भरलेल्या.. नवीन कापडं आणली असतील आणि असंच काहीबाही घरच्यांसाठी. ड्रायवर-कंडक्टरची जोडी आज नेहमीची नव्हती. कंडक्टर तर अगदीच पोरसवदा दिसत होता. असेल एकोणीस-वीस वर्षांचा.
कुंदाबाईच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एस. टी. उभी रहायची. आणि सकाळी गाडी निघण्याआधी ड्रायवर-कंडक्टरची चहाला कुंदाबाईंच्याच घरी असायचे. त्याचे तिला चार-दोन रुपये मिळायचे रोजचे. पण त्या पैशांचं काही अप्रूप नव्हतं कुंदाबाईला. एकतर ती एकटी रहायची गावात आणि तिचा एकुलता एक लेक असाच कुठं दूरवरच्या शहरात रोजगाराला गेलेला होता. तो सहसा गावी फिरकायचा नाही. त्याचं काही लग्नबिग्न नव्हतं झालं अजून. कुणी म्हणायचं महादू ट्रकवर किन्नर अर्थात क्लीनरकी करतो. त्याला ड्रायवरच व्हायचं होतं बापासारखं. कुंदाबाईचा नवरा एस. टी. तच ड्रायवर होता. दारूच्या वाढत्या व्यसनापाई एकेदिवशी त्याने राम म्हटला होता. तेंव्हापासून या महादूकडे बघत कुंदाबाई दिवस ढकलीत होत्या.
रात्र सरली आणि पहाट फुटू लागली. आज लेक घरी असता तर त्याला तेल-ऊटणं लावून, गरम पाण्याने आंघोळ घातली असती कुंदाबाईने. पण लेकाची वाट बघत बघत थकलेल्या कुंदाबाई आजही अशाच झोपून गेल्या होत्या… तो काही आलाच नव्हता याही वेळी.
सवयीप्रमाणे कुंदाबाई पहाटे लवकरच उठल्या. अंगणातला बंब पेटवला. चुलीवर दुधाचं पातेलं तापवायला ठेवलं. गोठ्यात जाऊन गाई-वासरासमोर गवत टाकलं. थोड्यावेळाने त्या धारा काढणार होत्या.
त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्या थेट एस. टी. कडे गेल्या. गाडीतल्या मागच्या लांब सीटवर ड्रायवर-कंडक्टरची जोडी कुडकुडत झोपलेली होती अजूनही. कुंदाबाईंनी गाडीचा दरवाजा वाजवला. ड्रायवरला वाटलं… आज उशीर झाला वाटतं उठायला. गाडी लेट झाली तर फुकट पुढच्या गावातल्या लोकांच्या शिव्या खाव्या लागतील म्हणून ड्रायवर लगबगीने अंग झाडून उठला. “ये, पोरा! आरं… उठ. निघायला पाहिजे. ”
त्यावर कुंदाबाई म्हणाल्या, ”मास्तर, घाई करू नका. काही उशीर बिशीर झालेला नाही. मीच लवकर आले तुम्हांला जागं करायला. तुम्ही दोघं बी आज लवकरच घरी या चहाला. आणि त्या नव्या पोराला बी सांगा पटकन उरकून यायला. ” ड्रायवरच्या काही लक्षात आलं नाही. त्याने अंथरुणाची घडी घातली, मुकाट चूळ भरली आणि गणवेश अंगावर चढवीत त्या पोराला उठवलं. पोरगं अजून कामाला सारवलेलं नव्हतं. वडिलांच्या जागी नुकतंच रुजू झालं होतं सर्विसमध्ये. तीन वर्षांपूर्वी अशीच एक एस. टी. घाटातून खाली कोसळली होती, सात-आठ माणसं खलास झाली होती… त्यांच्यात याचा बाप सुद्धा होता. अनुकंपा का काय म्हणतात त्या तत्वावर याला खात्याने कामाला घेतलं होतं. ट्रेनिंग संपवून गाडीवर येण्याचा त्याचा हा पहिलाच महिना होता.
अजून पहाट अंधाराच्याच सावलीखाली हळूहळू पावलं टाकीत निघाली होती. गावात काही अंगणांमध्ये चुली, बंब पेटलेले दिसले. गावातल्या देवळातला काकड आरतीचा स्पीकरसुद्धा सुरु झाला आणि उठी उठी गोपाला सुरु झालं होतं. आज दिवाळीची पहिली आंघोळ!
कुंदाबाई अंगणातच उभ्या होत्या. त्यांनी दोघांनाही आत बोलावलं आणि त्या पोराकडे पाहून म्हणाल्या, ”चल, कापडं काढ. दिवाळीची पहिली आंघुळ आज. असा पारोसा कसा जाशील गाडीवर. घरी असला असतास तर तुझ्या आईनं तुला असा ठेवला असता होय? ” आणि ड्रायवरकडे वळत कुंदाबाई म्हणाल्या, ”साळुंके दादा, तुम्ही बी आज करून जा इथंच आंघुळ. कव्हा घरी पोहोचणार आन कधी करणार आंघुळ” यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. गाडी निघायला अजून तसा फार वेळ नव्हता राहिला. पण त्यांचा इलाज नव्हता. “आरं, ए पोरा! लाजू नकोस. काढ कापडं आन बस त्या पाटावर! ”
पुढे काही मिनिटं त्या ओसरीवर यशोदा कृष्णाला न्हाऊ-माखू घालत असताना कसं दृश्य असेल गोकुळात तसं दृश्य सगुण साकार रुपात दिसत होतं. पहाटेची थंड हवा, त्यात गरम तेलाचा स्पर्श. कुंदाबाईचा खडबडीत हात… आणि तिच्या डोळ्यात तिच्या लेकाची आठवण.
“घरी आई अशीच ना रे आंघुळ घालीत आसंल ना? आणि आज सणासुदीच्या दिवशी तू असा पोटामागं घरापासून दूर. म्हटलं… आज तुझी दिवाळी इथूनच सुरु करावी. ” यावर त्या पोराच्या डोळ्यांतून घळघळा आसवं वाहू लागली. तो म्हणाला, ”बाप गेल्यापासून आई अंथरुणावरच असते. धाकटी बहीण आहे घरी… ती करते सारं तिचं… सगळं! ”
“आरं, माझ्या कर्मा! ” कुंदाबाई म्हणाल्या आणि त्यांनी गरम पाणी त्याच्या डोईवर घातलं… हळुवार. पाण्याच्या आधी त्याच्या डोक्यावर त्यांनी त्यांचा हात ठेवला होता… त्या हातावरून ती गंगा खाली वाहू लागली होती… स्नेहगंगा.
“आता जवाकवा या गाडीवर मुक्कामाला येशील तवा इथंच यायचं आंघुळीला.. माझ्या लेकावानी आहेस तू. ” कुंदाबाई ओवाळणीचं ताट तयार करीत बोलल्या. तोवर ड्रायवर साहेबांचीही आंघोळ उरकली होती. कुंदाबाईने त्या दोघांनाही साग्रसंगीत ओवाळलं. ड्रायवरने त्यांच्या ताटात पन्नासची नोट ठेवली… कुंदाबाई नको नको म्हणत होत्या. या पोराने सुद्धा खिशात हात घातला, तेंव्हा त्या म्हणाल्या, ”पहिला पगार बी झाला नसंल आजून.. राहू दे… पुढच्या वर्षी घाल ओवाळणी”
तोवर चहा उकळत आला होता. कुंदाबाईने दोन कप भरून त्यांच्या समोर ठेवले आणि एका डब्यात फराळ. “आता उशीर झालाय… वाटेत कुठं जेवायला थांबला की करा फराळ निवांत! ”
त्या दिवशी कुंदाबाई गाडी निघेपर्यंत थांबून राहिल्या… जाताना त्यांनी कंडक्टरला हात हलवत निरोप दिला.. म्हणाल्या… ”. सावकाश जा रे, पोरा! ” दोन-तीन वळणे घेईपर्यंत गाडी दिसत होती.. तोवर कुंदाबाई तिथंच उभ्या होत्या… त्यांच्या चेह-यावर सकाळची पहिली किरणं चमकत होती… दिवाळी सुरु झाली होती!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






