☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-4 ☆ श्री आनंदहरी ☆

पावसाने मध्ये जरा ओढ दिली असली तरी पुन्हा पाऊस हवा तसा लागला होता. बारा आणे पीक तरी पदरात पडणार होते.. ती खुश होती.. गावंदरीचा भुईमूग काढायला आला होता. बिरोबाच्या शिवारातलं सोयाबीन काढायला आले होतं. सगळ्यांचीच सुगीची गडबड चाललेली त्यात कामाला माणूस तरी कुठून मिळणार. ती गावात फिरून आली.  दोन दिवसाने सोयाबीन काढायला यायला दोघीजणी तयार झाल्या.

घरी आल्यावर ते सारे नवऱ्याला सांगून म्हणाली,

“उद्या येरवाळचं जाऊन हुईल तेवडा भुईमूग उपटून टाकूया. उपटून हुतील ती समदं याल बांधून घरला घेऊन येऊ..”

“घरला ? ती कशापाय ?”

नवरा कावदरला… तरीही ती शांतपणे म्हणाली,

“अवो, द्वारकामावशी हाय , ती बसल शेंगा तोडत काय हुतील त्येवड्या.. तिला रानात जायाचं हुत न्हाय पर हितं ईल..”

तो काहीच बोलला नाही. ती पुढं म्हणाली,

“आन सोयाबीन काढायचं काम करून आल्याव मी बी तोडीन की पारभर.. अवो, सुगीच्या दिसात हुईल त्येवडं वडाय लागतंयच की काम.  ”

येरवाळी जाऊन दिवसभरात होईल तेवढा भुईमूग उपटला.., ,दोघांनी वेलांचं एकेक वजं सोप्यात आणून टाकलं..

जेवणं झाली.. थोडावेळ शेंगा तोडून ती आडवी झाली.. लगेच डोळा लागला.. तिला कसल्याशा आवाजाने जाग आली. उठून पाहतेय तर रप रप पाऊस सुरू झालेला..  तिने दार उघडून पाहिलं…सगळ्या पावसाळ्यात झाला नव्हता असला पाऊस पडत होता. तिचा जीव खालवर होऊ लागला.  तिने नवऱ्याला हाक मारली. आणि म्हणाली ,

“अवो, कसला पाऊस पडाय लागलाय बगा की वाईच.. भुईमूग उपटून टाकलाय त्येवडा तरी आणूया..”

नवरा या कुशीवरून त्या कुशीवर वळत म्हणाला,

“काय न्हाय हुइत त्येला.. बघू सकाळच्या पारी.. झोप आता..”

तो लगेच झोपुनही गेला पण तिला काही झोप लागली नाही.

पाऊस कोसळतच होता.झुंजूमंजू झाल्यावर  तसल्या पावसात ती भुईमुगाच्या वावराकडे निघाली,.. साऱ्या शिवारात गुडघाभर पाणी झाले होते सगळा भुईमूग पाण्याखाली गेला होता ..उपटून ढीग लावलेले भुमुगाचे वेल ..एखाद- दुसरा वेल पाण्यावर तरंगताना दिसत होता तेवढा सोडला तर बाकी सारे वाहून गेले होते.. मनात उदासीनतेचा, निराशेचा पाऊस सुरू झाला होता.. तिच्या मनात आले.. हितं पाऊस कोसळतोय तेवढा बिरोबाच्या शिवारात नसेल कदाचित.. मनातल्या विचारासारशी ती तडक बिरोबाच्या शिवाराकडे गेली.. पाऊस तिथेही कोसळत होताच.. वावराला घातलेल्या हातभर तालीवरून पाणी वाहत होतं. सारे रान भरून वाहणाऱ्या शेततळ्यासारखं दिसत होते.. जणू पावसाने सोयाबीन पिऊन टाकला होतं..

ती भान विसरून पावसात चिंब भिजत सोयाबीनच्या रानाकडे एकटक पहात होती.. निर्मितीचा नाश होत असल्याची वेदना तिच्या गालावरून आसवं होऊन ओघळत होती..  साऱ्या आसमंतात तिच्या त्या आसवांचाच पाऊस कोसळत राहिला.

◆◆◆

(समाप्त)

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments