सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

चहाचा गरमगरम घोट घशातून उतरला , तेव्हा कुठे अभिजितला वर्तमानपत्र उघडायचं धैर्य आलं.

’22फेब्रुवारी 2001′.त्याने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वर्तमानपत्रावरची तारीख वाचली. अर्थात  मनातल्या मनात. नेहमी तो मोठ्याने वाचायचा. सुरुवातीला अचला चिडवायची त्याला, नंतर चिडायची, मग निर्विकार असायची. आताआताशा तर…..

तिसऱ्या पानावरच्या वरच्या उजव्या कोपऱ्याकडे नजर गेली मात्र…..

त्याने कितीही कसोशीचा प्रयत्न केला, तरी त्याच्या चेहऱ्यावरचा बदल अचलापासून लपू  शकला नाही.

“बारावं? ”

“अं?…. हो…”अभिजितचा निसटता होकार.

भुवयांच्या मधला भाग दोन बोटांच्या चिमटीत धरून बसून राहिला तो. डोळे  मिटले असले, तरी अचलाची धगधगती नजर आपल्यावरच रोखल्याचं जाणवत होतं त्याला.

जराशाने तो सावरला. चहाचा आणखी एक घोट घेतल्यावर,  अंगात थोडं बळ आल्यासारखं वाटलं त्याला.

“पण…. पण माझा काय दोष आहे यात? त्या मुलांना स्वतःची अक्कल नव्हती? ”

अचलाला कळेना, हा आपल्याला पटवायचा प्रयत्न करतोय, की स्वतःचीच समजूत घालतोय.

“ते काहीही असो, अभिजित. बारा दुणे चोवीस जणांचे प्राण गेलेयत. यापुढेही असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती जणांच्या मृत्यूचं  पाप घेणार आहेस तू  तुझ्या डोक्यावर? ”

“बघतो दुसरा काही मार्ग निघतो का.”

“दुसरं सोल्युशन सुचेपर्यंत आणखी बळी पडलेले असतील. त्यापेक्षा  मी सांगितल्यासारखं कर. आजच्या आज कन्फेशन देऊन टाक.”

“हं. ”

“सॅन्डविच घे.”

“नको. इच्छा  नाही……. सुजय उठला नाही अजून? ”

“त्याच्या रूममध्ये नाहीय तो. रात्री आलाच नाहीसं वाटतं. बोर्डवर लिहून गेला होता -‘मित्राकडे जातोय. उशीर झाला तर तिथेच झोपेन. डायरेक्ट उद्या संध्याकाळीच येईन.’ ”

अभिजितची नजर मेसेज बोर्डकडे वळली. सुजयचा पैशाचा मेसेज तसाच होता.

“हे काय? तू त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले नाहीस अजून? ”

“नाही.”

“का? वेळ नाही मिळाला? आज कसंही करून वेळ काढ. त्याचं  क्रेडिट कार्डपण काढून घेतलंस तू.”

“आधीचे पैसे एवढ्यातच कसे संपले, ते कळल्याशिवाय मी त्याला आणखी पैसे देणार नाही. पैसे मागितले की लगेच मिळतात ना. त्यामुळे किंमतच वाटत नाही त्याला पैशाची. आपण लहान असताना….. ”

“अग, जाऊदे ग अचला. त्याच्या नशिबाने त्याला मिळतंय, तर घेऊ दे ना उपभोग त्याला. आपल्या वेळची परिस्थिती  वेगळी होती. तसा आपल्यालाही थोडासा का होईना, पॉकेटमनी मिळत होताच की. आणि आपण उडवतही होतो तो. दोनतीन दिवस कँटीनला चाट मारून छोटीशी गिफ्टही द्यायचो तुला. आठवतं?”

कोर्टींगच्या आठवणींनी दोघांचाही मूड थोडासा निवळला.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
1.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments