सुश्री त्रिशला शहा
पुस्तकावर बोलू काही
☆ असा हा राजहंस – लेखक : श्री व्यंकटेश श्रीपाद राजहंस ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : “ असा हा राजहंस “
लेखक : व्यंकटेश श्रीपाद राजहंस
प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, पुणे.
किंमत : रु. ३२५ / –
‘ रतीचे जया रुप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे ‘
— शब्दप्रभू गदिमा यांचे हे शब्द सार्थ ठरवणारा, संगीत नाटकाला आभाळाची उंची देणारा, आपल्या स्वर्गीय गाण्याने रसिकांना रिझवणारा एक अव्दितीय कलाकार म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस.
अशा या स्वर्गीय आवाजाची आणि अभिनयाची दैवी देणगी लाभलेल्या बालगंधर्व यांचे जीवनचरित्र मांडणारे असा हा राजहंस हे पुस्तक. आणि ते लिहीलयं कुणी तर बालगंधर्व यांचे धाकटे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांनी. बालगंधर्वांच्या नाटकांच्या दौऱ्यामधे त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे रहाणारे हे व्यंकटेश उर्फ बापू.
खरतरं आपल्या वडिलांच्यापासून ते नारायण राजहंस उर्फ नाना यांचा आणि इतर भावंडाबद्दल बापूंनी लिहीलेल्या या आठवणींचे बाड, बापूंची मुलगी निलांबरी बोरकर यांच्याकडे बापूंनी सुपूर्द केले आणि निलांबरी बोरकर यांनी ते सुमती दसनुरकर यांच्याकडे सुमतीताईंच्या मागणीवरुन दिले कारण बालगंधर्वांवर पुस्तक लिहीण्याचा त्यांचा मानस होता. अशा रितीने झालेल्या या लिखाणाच्या प्रवासातून आपल्यापुढे साक्षात राजहंस घराण्याचा इतिहास उलगडत जातो.
श्रीपाद राजहंसांना शंकर, नारायण आणि व्यंकटेश ही तीन मुले आणि वेणूताई ही मुलगी. अन्नपुर्णाबाईंच्या आणि त्यांच्या सासर माहेरच्या सुसंस्कारित वातावरणात वाढलेली ही मुले. श्रीपाद राजहंस यांची नोकरी मालेगांवी असल्याने आणि त्यांचे नातेवाईक म्हाळस दांपत्याला पुत्रसुख नसल्यामुळे लहानपणापासूनच शंकर व नारायण या दोन मुलांचे संगोपन आणि शिक्षण जळगाव येथे झाले. नारायण याची गाण्याची आवड लक्षात घेऊन श्री. म्हाळस यांनी त्याला पेटी व तानपुरा आणून देऊन एका गायन शिक्षकाची नेमणूक केली. गायनाचे उपजत जाण असलेल्या आणि गुरुवर्यांकडून मिळालेल्या तालमीतून नारायणाचे गाणे बहरतच होते. अनेक मान्यवर मंडळींसमोर गायन करण्याची संधी नारायणला मिळाली. अनेक दिग्गजांकडून शाबासकी मिळवणाऱ्या नारायणचे गाणे खुद्द लोकमान्य टिळकांनी ऐकले, 13 वर्षाच्या नारायणने टिळकांसमोरच्या बैठकीत खट, आसावरी रागातून अनेक चीजा सादर करुन श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध केले, हे पाहून ऐकूनच लो. टिळकांनी ‘ अरे हा तर बालगंधर्व अशी उपाधी नारायणला दिली तो दिवस होता ९ एप्रिल १९०२. याच दिवसापासून नारायण राजहंस हा बालगंधर्व म्हणून ओळखला जाऊ लागला.
यानंतरचा बालगंधर्वांचा सांगितिक प्रवास म्हणजे एक सुवर्णकाळच ठरला. किर्लोस्कर नाटक कंपनीमधे प्रवेश करुन त्यांनी संगीत नाटक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याकाळात नाटकातील स्त्री भूमिका पुरुषच करीत असत, या संधीचे बालगंधर्वांनी अक्षरशः सोने केले. सौभद्र, शारदा, शाकुंतल, मानापमान, स्वयंवर, संशयकल्लोळ, एकच प्याला, मत्स्यगंधा अशा अनेक नाटकातील सुभद्रा, भामीनी, शारदा, सिंधू, रेवती, द्रौपदी, रुक्मिणी अशा अनेक स्त्रीभुमिका आपल्या अभिनयाने आणि गायनाने अजरामर केल्या. संगीत रंगभूमीला बालगंधर्वांमुळे सोन्याचे दिवस आले.
बालगंधर्वांच्या या नाट्यप्रवासात व्यंकटेश उर्फ बापू या धाकट्या भावाने त्यांना खूप मोलाची साथ दिली, खरतर ते स्वतः ही गायन आणि अभिनय उत्तम करायचे पण आपल्या मोठ्या बंधूप्रेमाखातर त्यांनी फार थोड्या नाटकातून भुमिका केल्या. लहान असून मोठ्या भावाचे तेच लाड पुरवायचे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही बरे वाईट प्रसंग येतातच, तसे बालगंधर्वांच्या वाट्यालाही आलेच. गोहरबाईच्या रंगभूमी पदार्पणामुळे काही वेळा व्यथित होण्याचे प्रसंग दोघांच्याही वाट्याला आले, वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारीमुळे नाटक सोडून काही दिवस बालगंधर्व बापूंसमवेत त्यांच्या मुळ गावी नागठाण्यातही राहिले. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर असे अनेक नाटकांचे दौरे केले असले तरी बालगंधर्वांनी आपल्या नाटकाचा, अभिनयाचा पहिला नाट्यप्रयोग सौभद्र या नाटकाद्वारे मिरज मधे केला. हे खूप उल्लेखनीय आहे.
वयाच्या ८८ व्यावर्षी संपूर्ण राजहंस कुटूंबातील व्यक्ती, नाट्यक्षेत्र, गायनक्षेत्र, अनेक गावातील रहाण्याचे अनेक प्रसंग, बरे वाईट अनुभव, सांपत्तिक स्थिती, वडिलोपार्जित गावे, नातेसंबंध या साऱ्यांबद्दलच्या आठवणी लिहून काढणं म्हणजे मेंदूला ताण दिल्यासारखेच पण सुमती दसनुरकरकरांच्या प्रेमळ आग्रहाने बापूंनी हे आत्मचरित्रपर लेखन केलं. आणि बापूंच्या कन्या निलांबरीताईंनी ते लेखिका सुमतीबाई आणि संपादिका डॉ. माधवी वैद्य यांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविले.
बालगंधर्वांवर अनेक पुस्तकांतून बरेच वाचले, ऐकले असले तरी त्यांचा खरा इतिहास या आत्मचरित्रातून वाचकांपर्यंत पोहोचला यात शंकाच नाही, अतिशय सुरेख आणि वाचनीय असे हे पुस्तक आहे, वाचकांनी नक्कीच वाचावे.
परिचय : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







