श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “रंगतरंग अस्मितेचे” (काव्यसंग्रह) – कवयित्री : अस्मिता इनामदार ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : रंगतरंग अस्मितेचे 

कवयित्री : सौ. अस्मिता इनामदार 

 ९७६४७७३८४२

प्रकाशक : सुनिधी पब्लिशर्स, पुणे

 ०२०-२४४५७११८

मूल्य : रु. १००/-

☆  मनाचे अंतरंग खोलणारे ‘रंगतरंग अस्मितेचे‘ – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

दोन कविता संग्रह प्रकाशित केल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी प्रकाशित केलेला अस्मिता इनामदार यांचा ‘रंगतरंग अस्मितेचे ‘ हा काव्यसंग्रह नुकताच वाचून झाला. यातील सदतीस कवितांना त्यांच्या काही चारोळ्या आणि हायकू यांची किनार लाभली आहे. कविता, चारोळी आणि हायकू या तिन्ही काव्य प्रकारात त्यांनी कौशल्यपूर्ण लेखन केले आहे. कौशल्यपूर्ण एवढ्यासाठी की कविता अल्पाक्षरी असूनही नेमके भाव व्यक्त करणारी आहे. विषयांची विविधता तर आहेच. पण लयबद्ध सोपी रचना आणि भावनांचे प्रकटीकरण हेही या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या संग्रहात प्रेम, विरह, माणूस, निसर्ग, समाज अध्यात्म, प्रबोधन व चिंतन अशा सर्व विषयांना हात घालणा-या कविता आहेत. काही कवितांचा उल्लेख करुन त्यांचे सौंदर्य उलगडून दाखवणे इष्ट ठरेल.

सौ. अस्मिता इनामदार 

‘वैशाख वणवा’ या कवितेत उजाड आणि भकास अशा वैशाखातील निसर्गाचे वर्णन केले आहे. पण याच वैशाखातला फुललेला गुलमोहोर कवयित्रिला दिसतो. यातूनच त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिसून येते. पावसामुळे सृष्टीत होणारा बदल त्यांनी ‘ मेघ ‘ या कवितेत टिपला आहे. मखमली श्रावणाचे सात्विक वर्णन ‘आला श्रावण श्रावण’ या कवितेत वाचायला मिळते. निरनिराळ्या वृक्षांच्या पालवीचे निरीक्षण त्यांच्या ‘ कोवळी पालवी ‘ या कवितेतून दिसून येते. त्याच वेळेला हे चित्रित करताना त्यांच्या शब्दांनाही नकळतपणे पालवी फुटते. म्हणूनच त्यांची कविता कायम प्रसन्न, तरतरीत वाटत असावी.

‘निसर्ग’ या दुसऱ्या एका कवितेत त्यांनी निसर्ग अत्यंत मोजक्या शब्दात पण डोळ्यासमोर पूर्ण चित्र उभे राहिल अशा पद्धतीने रेखाटला आहे.

निसर्गाचे असे वर्णन करतानाच त्या जीवनाविषयीही बोलून जातात. ‘ पानगळ ‘ सारख्या कवितेत निसर्ग टिपता टिपता त्यांची जीवनाविषयीची सकारात्मकता आणि आशावाद दिसून येतो. या कवितेत त्या शेवटी म्हणतात,

“पानगळीचे दु:ख नको

नको गर्व पण सुखाचा

जुने गळून नवे येते

हाच अर्थ जीवनाचा “

जगण्यातील सर्व वाटा मिळाल्या पण स्वतःची नेमकी वाट सापडली नाही याची खंत त्या ‘ वाट ‘ या कवितेत बोलून दाखवतात. त्याच वेळेला, विश्वासाने जीवन

व्यथित केल्यावर काळोखाच्या प्रहरी आयुष्याचा दिवा प्रकाशेल असा विश्वास त्यांनी ‘ आयुष्याचा दिवा ‘ या कवितेत बोलून दाखवला आहे. ‘ असे व्हावे कधीतरी ‘ या कवितेत त्यांनी कवी मनातील सुप्त कामना व्यक्त केल्या आहेत.

स्त्री जीवनातील सुखदु:खे मांडून उंबरठा हे मर्यादांचे प्रतिक आहे असे त्या ‘ बाई -उंबरठा ‘ या कवितेत मांडतात. ‘ मन करा रे प्रसन्न ‘ मधून वैचारिक आणि उपदेशात्मक शब्दांची भेट होते. कदाचित त्यामुळेच मन उद्विग्न असूनही स्वच्छंदी जगण्याचा संकल्प ‘ मोजमाप आयुष्याचे ‘ या कवितेत त्या बोलून दाखवतात. ज्याच्यासाठी जगावं अशी खूप कारणं आहेत आणि आपल्याला जगायचं आहे, तू आत्ताच येऊ नको असं त्या ‘मृत्यूला ‘ बजावून सांगतात. त्यांची ‘पर्यावरणावरची लावणी ‘ हे एक खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

‘आपण दोघे, विरह, प्रीत फूल यांसारख्या प्रेम कवितांतून प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा उलगडल्या आहेत.

“पहाट ओली दवात न्हाली

गंधीत झाली धरा

कहर असा तो जणू तुझा की

कशी सावरु मला “

‘आपण दोघे’ मधील या काव्यपंक्ती लयबद्ध तर आहेतच पण ‘ तिच्या ‘ मनाची अवस्था स्पष्ट करणा-याही आहेत. निसर्गाच्या सहवासातील प्रणयाचे ते मोरपंखी दिवस आठवताना विरहाच्या

लागलेल्या शापामुळे ते सारे आठवणींचे पक्षी सोडून द्यावे लागतात. त्या म्हणतात

“त्या सुंदर दिवसांचे

 श्वास करुनिया वक्षी

 मी सोडून दिधले सारे

 ते आठवणींचे पक्षी “

याशिवाय ‘लेक, मराठीअस्मिता, नेत्रदान, श्रावणबाळ, सीमेवरील दिवाळी अशा सामाजिक आशयाच्या तसेच ‘ बाप, आज्जी यांसारख्या कौटुंबिक विषयांवरील कवितांचा उल्लेख करावा लागेल. सर्वच कवितांविषयी लिहीले नसले तरीही वरील विवेचनावरून कवितासंग्रहातील सर्व

कविता वाचनीय आहेत हे नक्कीच लक्षात येईल.

वर लिहिल्याप्रमाणे काही चारोळ्या व हायकूंनी कविता संग्रहाच्या विविधतेत भर घातली आहे. यातही प्रेम, विरह, व्यथा, आयुष्य, निसर्ग, आशा- निराशा अशा सर्व भावभावना व्यक्त झाल्या आहेत. ‘ हायकू ‘ या काव्यप्रकारासाठी आवश्यक असणारा शब्दांचा व भावनांचा हळुवारपणा व व्यक्त होण्यातील सहजता त्यांच्या हायकूत दिसून येते.

“मनी मानस.. फक्त एक विचार

मुक्तविहार… “

किंवा

” फूल सुकले

सुगंध हरवला

निर्माल्य झाले… “

असे अनेक हायकू आहेत ज्यांचा उल्लेख करता येईल.

आकाशातील इंद्रधनुष्याप्रमाणे विविध भावछटा असणारा हा कविता संग्रह सौ. अस्मिता इनामदार यांच्या मनातील तारुण्याचे प्रतिक आहे. याच उमेदीने त्यांचे लेखन चालू राहील असा विश्वास वाटतो.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted