सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अपरिचित रामायण… दाजी पणशीकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

ऐसे गुरू ऐसे शिष्य !

अर्थात ‘अपरिचित रामायण’

लेखक – दाजी पणशीकर

प्रकाशक – रविराज प्रकाशन

काही दिवसांपूर्वी ‘अपरिचित रामायण’ हे दाजी पणशीकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आलं. हे पुस्तक वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणावर आधारित आहे. यात फक्त रामायणातल्या बालकांडातल्या घटनांचाच समावेश आहे. नंतरच्या घटना प्रामुख्याने सीता हरण, रावण वध यांचा यात समावेश नाही. तर मग आहे काय या पुस्तकात वाचण्यासारखं… असं एखाद्याला वाटू शकतं.

पण पुस्तक वाचल्यावर जाणवतं की रामायणात केवळ सीता हरण आणि रावणाचा वध या दोनच मुख्य गोष्टी नसून इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा युगानुयुगे संपूर्ण विश्वाला विचार प्रवृत्त करणाऱ्या घटना घडतात तेव्हा त्या निव्वळ योगायोगाने घडलेल्या नसतात. त्या मागे निश्चितच काही कार्यकारण भाव, हेतू असतो. तो हेतू काय? आणि रावण वध महत्त्वाचा का? ‘रामराज्य’ म्हणजे काय? रामाचा जन्म दशरथाच्या कुळातच का झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक देतं.

या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे रामजन्मापूर्वीची परिस्थिती, ऐश्वर्याने संपन्न आणि वृत्तीनं रसिक, नीतिमान असलेल्या अयोध्येचं वर्णन वाचून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. स्त्रियांसाठी नृत्यशाळा आणि स्वतंत्र क्रीडाभवने होती यावरूनच स्त्रीचं त्या काळातलं सामाजिक स्थान लक्षात येतं. तसंच रघुकुळातला राज्यकारभार, राजा दशरथ आणि त्याचे अमात्य यांची गुणवत्ता, नितीमत्ता आणि प्रजेतील व्यवहार अशा सर्वच बाबी अचंबित करतात.         

या पुस्तकाचा मूळ गाभा म्हणजे राजपुत्र रामाची ‘प्रभू श्रीराम’ म्हणून होणारी जडणघडण… ही जडणघडण कशी आणि कुणामुळे घडली हे यात सविस्तर सागितलं आहे. ‘प्रभू राम’ घडण्यात सगळ्यांत जास्त महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो ‘विश्वामित्र ऋषींचा’ आहे. आजपर्यंतच्या रामायणात पुत्रवियोगाने तळमळणारा दशरथ, शोकमग्न कौशल्या, वनवासाला पतीसोबत जाणारी सीता, बंधू लक्ष्मण… यांचं रामावरील प्रेम, त्यांचं आपापसातलं नातं हे आपण वेगवेगळ्या माध्यमातल्या रामकथांमधून पाहिलं आहे. दुर्दैवाने या सगळ्यांत विश्वामित्र ऋषींचा मात्र ठराविक प्रसंग वगळले तर फारसा महत्त्वपूर्ण उल्लेख येत नाही. पण रामाचं ‘रामपण’ आहे ते विश्वामित्र ऋषींनी गुरु म्हणुन केलेल्या ज्ञानदानात, संस्कारात… कसं ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचावं. 

राजा दशरथाकडे जेव्हा विश्वामित्र ऋषींनी राक्षसांचा वध करण्यासाठी रामाची मागणी केली तेव्हा राजा दशरथ त्यांच्यासोबत रामाला पाठवण्यास अजिबात अनुकूल नव्हता. पण तरीही विश्वामित्र ऋषी रामाला नेण्याबाबत ठाम आणि आग्रही राहिले तेव्हा महर्षी वसिष्ठ यांनी, ईश्वरी योजना, संकेत जाणून पुत्र मोहात अडकलेल्या राजा दशरथाला कसं राजी केलं… आणि नंतर विश्वामित्रांनी रामाला अक्षरशः कसं घडवलं… अगदी संध्या कशी करावी ते, आपले नित्यकर्म कशी असावीत इथंपासूनचे प्रसंग, गुरू-शिष्य नातं यात सांगितलं आहे.

एका राजपुत्रापासून ते प्रभू श्रीराम होण्यासाठी जे जे काही रामाच्या आयुष्यात घडलं ते अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीनं यात सांगितलंय. केवळ वाचनप्रेमींनाच नव्हे तर रामायणाच्या अभ्यासूंनाही आवडेल असंच हे पुस्तक आहे. याच्यातलं ‘ताटका वध’ हे प्रकरण मला विशेष भावलं. देव आणि दैत्य यांच्यातलं वैर सांगणाऱ्या या प्रसंगातून प्रभू श्रीरामाच्या आगमाची नांदी आणि मानवजातीसाठी आश्वासक जीवनाची सुरुवातच जणू यातून होते. रामायणात या प्रसंगाचं महत्त्व विशेष आहे आणि ते मांडलं ही छान आहे. हे सारे प्रसंग वाचून गुरूचं आपल्या आयुष्यात नक्की स्थान काय असतं हे आपल्या मनात अधोरेखित होत जातं. असा उत्तम गुरु आणि असा उत्तम शिष्य लाभला तर रामराज्यासारखे चमत्कार खरंच घडू शकतात याची आपल्याला खात्री पटते.

हे पुस्तक वाचल्यावर भारावल्यावस्थेत मला या काही ओळी सुचल्या त्यानं मी या लेखाचा समारोप करते.

नाही राम कौसल्येचा।

नाही राम दशरथाचा।

राम असे विश्वामित्राचा।

जरी सोबत भार्या अन भ्राता।

सदैव तत्पर सेवक हनुमंता।

होई जयघोष जरी रघुकुलाचा।

राम असे विश्वामित्राचा।

षड्रिपूंवर मात करण्या।

दशाननाशी युद्ध लढण्या।

लाभे हस्त हा गुरुकृपेचा।

राम असे विश्वामित्राचा।

नित्यकर्म अन धैर्योपासना करवी।

शस्त्र, अस्त्र, धर्म, यांचे ज्ञान देई।

शुद्धाचरण, सत्याचा मार्ग जो दावी।

तो हा ‘परमगुरू’ ‘परमात्म्याचा’।

राम असे विश्वामित्राचा ।

राम असे विश्वामित्राचा।

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Umakant Barhale

Just read all details and impressed also. First time information