सौ. पुष्पा चिंतामण जोशी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ सरमिसळ… श्री प्रमोद वामन वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

पुस्तकाचे नाव—– सरमिसळ

लेखक—- प्रमोद वामन वर्तक

मुद्रक— सुविधा एंटरप्राइजेस ठाणे

मूल्य—- सप्रेम भेट

प्रकाशन – ग्रंथाली

श्री प्रमोद वर्तक यांच्या ‘सरमिसळ’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ठाणे येथे संपन्न झाले. रिझर्व बँकेचे हाऊस मॅगझिन ‘विदाऊट रिझर्व’ मधून त्यांचा साहित्य प्रवास सुरू झाला.  तेथील मराठी साहित्य मंडळाच्या भित्ती पत्रकात लिहिलेले त्यांचे ताज्या घडामोडींवरील  खुसखुशीत लेख वाचकांच्या पसंतीला उतरू लागले. तसेच त्यांनी बँकेच्या स्पोर्ट्स क्लबने आयोजिलेल्या एकांकिका स्पर्धेत दुसरे बक्षीसही पटकावले.

सातत्य हा प्रमोद वर्तक यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. सिंगापूर मुक्कामी त्यांच्या साहित्यकलेला बहर आला. कविता, चारोळ्या, ललित लेखन, विनोदी प्रहसने अशा वाङ्मयाच्या अनेक शाखांमधून त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. सिंगापूरच्या मराठी मंडळातही बाजी मारली. मंडळांने आयोजिलेल्या कविता स्पर्धेत मधुराणी प्रभुलकर यांनी प्रमोद यांच्या  कवितेची निवड केली आणि सिंगापूर मराठी मंडळाच्या वेब सिरीज मध्ये ती कविता सादर करून प्रमोद यांनी मानाचे पान पटकावले.

आपल्या समूहावरील लेखनामधून त्यांच्या सर्वस्पर्शी लिखाणाचा परिचय आपल्याला झाला आहे. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कथा, कविता, ललित लेख आपल्याला भेटतात आणि दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतात.

‘सरमिसळ’ पुस्तकाच्या तीन भागांपैकी पहिल्या भागात त्यांनी सर्वसाधारणपणे एक शब्द घेऊन त्याचा विस्तार केला आहे. हे वाचताना आपण आपलेच अनुभव वाचीत आहोत असे वाटते.  जेव्हा लेखकाच्या लेखणीतून आपल्यापर्यंत ते अनुभव पोहोचतात तेव्हा वेगळीच गंमत आणतात. या दृष्टीने यातील चिमटा, वजन ,पायरी, प्रश्न असे अनेक लेख वाचण्यासारखे आहेत.

श्री प्रमोद वामन वर्तक

सिंगापूरच्या वास्तव्यामध्ये त्यांच्या लेखणीला अधिक बहर आला. मोरू आणि पंत यांच्यातील चाळीच्या पार्श्वभूमीवरील खुसखुशीत संवाद, त्यांची मजेशीर प्रश्नोत्तरे  आपल्याला अगदी जवळची वाटतात. तसेच पती- पत्नीमधील कौटुंबिक रुसवे फुगवे, खटकेबाज संवाद आणि गोड शेवट  संवाद रूपाने आपल्या मनात रेंगाळत राहतात. पुस्तकाचा  तिसरा भाग कवितांचा आहे. कविता म्हणजे काय? ती कशी सुचते? कशी व्यक्त होते? मनातल्या आणि जगातल्या अनेक विषयांवर त्यांची कविता सहज शब्द रूपाने भेटते. या दृष्टीने पाठमोरी, राधेचा शेला, आभाळाची तीट, रंग महाल, मन पाखरू पाखरू अशा कविता आवर्जून वाचण्यासारख्या आहेत. विविध दिवाळी अंकातून त्यांचे लेख ,कविता आपल्याला भेटतात आणि दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतात.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. मुंबईला दादरच्या ‘अहमद सेलर’  बिल्डिंगमध्ये त्यांच्या आयुष्याचा बराच काळ गेला. त्या चाळीच्या  चित्राची झलक मुखपृष्ठावर आहे. ही चाळीची पार्श्वभूमी त्यांच्या लेखांमधूनही आपल्याला दिसते. एक चित्र अर्थातच रिझर्व बँकेचे! जिथे त्यांच्या आयुष्याला स्थैर्य मिळाले आणि लेखन प्रवास सुरू झाला ती आदरणीय रिझर्व बँक! तिसरे  लेकीकडील सिंगापूरचे वास्तव्य दर्शविणारे. तेथील  वेगळ्या वातावरणात निवांतपणे त्यांना अनेक अनुभवांना शब्दरूप  देता आले आणि मुखपृष्ठावरील चौथे गावाकडचं घर दिसते ते आवास-अलिबाग येतील बहिणीचे घर. या साऱ्यांनी त्यांचे जीवन व्यापलेले आहे. त्यामुळे कस्तुरी सप्रे यांनी कल्पकतेने काढलेले हे मुखपृष्ठ आपल्याला आवडते.  पुस्तकाची छपाई बरीचशी निर्दोष आहे. ‘सरमिसळ’  मधील सर म्हणजे उच्च  प्रतीचे तर मिसळ ही नेहमीच चविष्ट असते पण आपल्याला मिसळीची एक डिश अपुरीच वाटते आणि आपण दुसऱ्या डिशची प्रतीक्षा करतो. प्रमोद वर्तक यांच्या अशाच खमंग ,चविष्ट, रसदार मिसळीच्या दुसऱ्या डिशची आपण सर्वजण  वाट बघूया.

पुस्तक परिचय –  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments