सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज काळ इतका बदलला आहे की, समर्थांच्या काळानुरूप त्यांना अपेक्षित असणाऱ्या सत्वगुणांच्या कसोट्या आता तंतोतंत वापरता येणं शक्य नाही,  असंच म्हणावं लागेल.  समाजमनाची धारणा, माणसाची जीवन-पध्दती, जीवनमूल्ये, आयुष्याकडे बघण्याची आणि विचारांची दिशा — सगळंच खूप बदललं आहे. त्यामुळे समर्थांच्या काळानुरूप तेव्हा अपेक्षित असणाऱ्या  सत्वगुणांनुसार  प्रत्यक्ष आचरण करता येणे आता खरोखरच अवघड आहे असं  नाईलाजाने म्हणावे लागेल. पण तरीही “भक्ती निकट अंतरंगे”असा जो सत्वगुणाचा एक सर्वोत्तम निकष समर्थांनी सांगितला आहे, तो मात्र त्रिकालाबाधित असा आहे— काळ कितीही बदलला तरीही आचरणात आणण्यासारखा आहे. कारण ”अंतरंगाशी निकट असणारी भक्ती”ही परमेशाप्रती असावी, असा याचा शब्दशः अर्थ असला, तरी आजचा काळ लक्षात घेता,  याचा अभिप्रेत अर्थ मात्र आता नक्कीच अधिक व्यापक असायला हवा. पण म्हणजे कसा? तर तो असा असायला हवा असे मला वाटते. —-सत्वगुण अंगी बाळगण्याचा मुख्य हेतू मनात कमालीची भक्तिभावना निर्माण करणे — म्हणजे त्यासाठी ध्यास घेणे –मग तो स्वतःतच वसणाऱ्या परमेशाची ओळख पटवून देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा ध्यास असू शकतो—- उत्तम विचारांचा- उत्तम आचारांचा ध्यास — उत्तम ते शिकण्याचा ध्यास — इतरांशी वागतांना,  त्यांच्या जातीधर्मानुसार, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या शारीरिक,  बौद्धिक किंवा आर्थिक क्षमतेनुसार भेदभाव न करता, सगळ्यांशी सारख्याच सौहार्दाने, प्रेमाने, आपलेपणाने वागण्याचा ध्यास — इतरांना निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकी मदत करत रहाण्याचा ध्यास … इथे मी नुकतंच वाचलेलं एक छान वाक्य मला आठवतंय, जे आजच्या व्यावहारिक जगाशी नातं सांगणारं, त्याच भाषेतलं असलं, तरी समर्थांच्या उपदेशाच्याच थेट जवळ जाणारं आहे —–”वाणी,  वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे— आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.” वाहवा. —-. आज वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर,  माणसाला  क्षणोक्षणी अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या स्वैर झोक्यावर, हतबल होऊन बसायला भाग पाडणाऱ्या अनिर्बंध परिस्थितीत, कितीही विपरीत परिस्थिती ओढवली तरी श्रध्येय देवतेवरचा आणि मुख्यतः स्वतःवरचा विश्वास ढळू न देता, मन शांत व स्थिरच कसे राहील यासाठी आवर्जून आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याचाही ध्यासच घेणे गरजेचे झालेले आहे.

“देव आहे‘– आणि माझ्यातही नक्कीच ईश्वरी अंश आहे” अशी जाणीव मनापासून व्हावी, असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण प्रत्येकजण हे सत्य जाणवण्याइतका सजग नसतो. मग तसे सतत सजग रहाण्याचा ध्यास घेणे, हाही महत्वाचा सत्वगुणच — ज्याला काळाचे बंधन नाही. मग, “माझ्यात जसा ईश्वरी अंश आहे, तसाच तो इतर प्रत्येक सजीवातही नक्कीच असणार“ हे मान्य करता येणे अवघड मुळीच नाही आणि तसे एकदा खात्रीपूर्वक मान्य केले,  की मग समर्थांना अपेक्षित असणारा सत्वगुण उच्च कोटीवर पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

“देवा– सोडव रे बाबा आता लवकर” असं हताशपणे म्हणतांना आपण अनेकांना ऐकतो. पण “सोडव” म्हणजे “मरण दे”हा एकच अर्थ त्यात अभिप्रेत असतो का? तर अजिबातच नाही. “सोडव”म्हणजे ‘आयुष्यातल्या कटकटींपासून, समस्यांपासून, मनाचा गुंतवळ करून टाकणाऱ्या परिस्थितीपासून तू सोडव‘ अशी खरंतर ती भीक मागितलेली असते. पण देवाकडे अशी भीक मागण्याची माणसाला गरजच नाही, असेच समर्थांचे ठाम म्हणणे असावे, असे दासबोध वाचतांना प्रकर्षाने जाणवते. कारण आत्मरक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या सशक्त सत्वगुणांना आवर्जून, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, आणि मनापासून पाचारण केले, त्यांना मनापासून आपले मानले, तर देव स्वतः वेगवेगळ्या रूपात माणसाला भेटायला येईल– फक्त  ‘तो मला ओळखता यायलाच हवा” असा ध्यास मात्र मनात बाळगला पाहिजे. मग जगण्याचा कुठलाही मार्ग, अगदी नाईलाज म्हणून जरी निवडावा लागला तरीही, त्या मार्गावर परमशक्तीवरच्या विश्वासाच्या, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पायघड्या घालून, त्यावर फक्त सत्वगुणांचीच फुले उधळत जाण्याचा निश्चय केला, की मग कुठल्याही मार्गाने गेले तरी अंती तो जगन्नियंता, परमेशाचे आपल्यासाठी श्रध्येय असणारे स्वरूप घेऊन, आपल्या रक्षणासाठी, आणि त्याही पुढे जाऊन, मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट साध्य करून देण्यासाठी सज्ज असणारच.

——— सध्याच्या परिस्थितीला अनुरूप असा हाच बोध समर्थांनाही अपेक्षित असावा असे मनापासून म्हणावेसे वाटते.

{ समाप्त }

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
1.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments