सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ …बकुळ फुले… लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

* बकुळ फुले *

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात मुल्हेर म्हणून छोटेसे गाव आहे. तेथे उद्धव महाराजांची समाधी आहे. उद्धव महाराजांच्या निर्वाणीच्या वेळेस सुमारे तीन साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्यांनी तिथे बकुळीचे झाड लावले. अजूनही त्या झाडाला फुले येतात व त्यातून साखरे सारखा पदार्थ निघतो. जणू काही उद्धव महाराजांचा प्रसादच!

मी बागलाण तालुक्यातच राहत असल्यामुळे मुल्हेरला वारंवार जाणे येणे व्हायचे. तेव्हा तो समाधीपुढे उभा असलेला प्रचंड मोठा बकुळीचा वृक्ष माझ्या नेहमी पाहण्यात यायचा. बकुळीच्या फुलांचा मंद सुगंध त्याचे औषधी उपयोग आणि माझे झाडांवरचे प्रेम, त्यामुळे बकुळीचे झाड आपण लावायचे असे मी वारंवार ठरवत होते. कितीतरी वेळा मी त्याच्या बिया गोळा करून आणल्या. हम्पीला गेले होते तेथून देखील बकुळीच्या झाडाच्या बिया आणल्या होत्या. घरी रोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमले नाही.

नर्सरीतूनही बकुळीचे रोप काही आणले गेले नाही आणि बकुळीचे झाड लावायचा माझा मानस मनातच राहून गेला.

मी नव वसाहतीत रहायला आल्यावर रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत म्हणून एक बहाव्याचे झाड व एक गुलमोहाराचे झाड असे लावायचे ठरवले. त्याप्रमाणे रोपे आणून लावली देखील. रोपांची झाडे झाली. परंतु बहाव्याची म्हणून आणलेली रोपे बहाव्याची नव्हती. दुसऱ्या झाडाची निघाली. ती कोणती झाडे आहेत हे मला ओळखू आले नाही. त्यामुळे मन अगदी खट्टू झाले. परंतु आता झाडे वाढली आहेत तर राहू दे ना असं म्हणून ती तशीच वाढू दिली. गुलमोहाराची लावलेली झाडे व्यवस्थित वाढली होती. पण त्याचा पालापाचोळा खूप पडतो म्हणून कॉलनीतल्या लोकांनी ती काढून टाकली आणि वसंत ऋतूत लाल पिवळ्या रंगाची उधळण आकाशात व्हावी ही माझी इच्छा अर्धवटच राहून गेली.

दोन-तीन दिवसांपूर्वी अचानकच सकाळी सकाळी कॉलनीतून चालत बाहेर गेले. जाताना घाई होती, पण येताना रेंगाळत आले आणि थबकलेच…. माझ्याकडून बहावा म्हणून लावल्या गेलेल्या परंतु मला ओळखू न आलेल्या झाडाखाली बकुळीच्या फुलांचा सडा पडला होता.

बकुळीची फुलं पाहिली आणि मन अगदी पिसे पिसे झाले. अहो आश्चर्यम्, जे बकुळीचे झाड मला लावायचे होते ते मी लावले नव्हते. परंतु माझ्या मनातले झाड मात्र माझ्याही अपरोक्ष परमेश्वराने माझ्या हातूनच माझ्या घराजवळ लावून घेतले होते आणि त्या झाडाने मी कितीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी आज माझ्यापुढे त्याच्या फुलांचा नजराणा माझ्या ओंजळीत टाकला होता.

पटपट खाली वाकून बकुळीची फुले वेचली. घरी येऊन गजरा केला आणि केसात माळूनही घेतला. मला इतका आनंद झाला होता की ती बकुळीची फुले आणि गजरा मी वारंवार हातात घेऊन वास घेऊन त्याचा सुगंध तन मनात भरून घेत होते.

अजूनही बकुळीच्या फुलांचा हंगाम सुरू आहे. झाडाखाली बकुळीची फुले पडतातच आहेत. त्यामुळे लहान मुलासारखी मी त्या झाडाखाली जाते आणि मनाशी,

‘या बाई या 

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया ‘

असे म्हणत ती नाजूक सुंदर सुवासिक फुले वेचत राहते अन् मनाशीच म्हणत राहते,

‘गोड गोडूले,

मोतीयाचे दाणे कुणी खाली पाडले? ‘

 *** इति ***

लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted