सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ वारीतल्या गोष्टी… ☆ सुश्री शीला पतकी ☆
काल एकाच्या तोंडून वारीतील गोष्ट ऐकली.. खूप आवडली. गृहस्थ वारीला निघाले. चालण्याची सवय नाही. पण तो माहोलच असा असतो आणि अंतःकरणातली पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ…. हे काही जाणवत नाही. असे म्हणतात की पांडुरंग वारकऱ्यांच्या पायावरून रात्री हात फिरवतो आणि त्याचं दुखणं गायब… असेलही खरं किंवा ती त्यांची श्रद्धाही असेल…! तर हे वारकरी गृहस्थ रस्त्याने निघाले आणि अचानक चप्पल तुटली. लंगडत चालायला लागले. आपल्या दिंडीबरोबरचा स्पीड जमेना. खरडत खरडत तसेच निघाले. आसपास चप्पल दुरुस्त करणारा दिसेना. चप्पल हातात घेऊन मोकळ्या पायाने चालणं कधीच माहीत नव्हतं.. घरात सुद्धा चप्पल घालणारी मंडळी. पण पांडुरंग कृपेने एक माणूस त्यांना रस्त्यावर दिसला की जो चप्पल दुरुस्त करून देत होता. गृहस्थ तेथे थांबले आणि त्याच्याकडे जाऊ लागले इतक्यात तोच म्हणाला, ” काय माऊली चप्पल तुटली का? आत्ता दुरुस्त करून देतो आणा इकडे” आणि पाच मिनिटात त्याच्या कलाकुसरीने चप्पल दुरुस्त झाली आणि त्यांनी त्याच्यासमोर ठेवली. गृहस्थ म्हणाले,
” किती पैसे झाले? ” चप्पल शिवून येणारा तो चांभार म्हणाला, ” छे छे माऊली याचे कसले पैसे? पैसे मी घेत नसतो” त्यावर ते गृहस्थ म्हणाले, “ अरे तुझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, तू माझी चप्पल शिवून दिली त्या बदल्यात मी तुला पैसे देतोय. अगदी बरोबर आहे ना हे फुकट कोणाचा घेऊ नये बाबा.. “! त्यावर तो चप्पल शिवणारा म्हणाला, “छे! छे!! बाबा मी फुकट देतच नाही तुम्हाला. या बदल्यात मी तुम्हाला माझे एक काम सांगणार आहे तेवढं करा “…
“बोल बाबा काय तुझं काम आहे? “गृहस्थ म्हणाले.
तो म्हणाला, “ काही नाही आता चाललाय तुम्ही वारीला तर पांडुरंगापर्यंत माझी एक प्रार्थना पोचवा”..
ते म्हणाले, “ठीक आहे पोहोचवतो.. काय प्रार्थना करू त्याला सांगा”…
“म्हनाव रांजणगावच्या सोपानला वारीसंगं चालत यायचे आहे, पण ते या जन्मी शक्य नाही. त्याला म्हणावं पुढल्या जन्मी तरी पाय दे देवा म्हणजे पाई चालत तुझ्या वारीला येईन”…..
समोरचा माणूस अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागला… त्याच्या पायावर एक फडके होते त्यांनी ते किंचित सरकवले आणि त्याला दिसलं की या माणसाला दोन्ही पाय नाहीत……. गृहस्थांचे डोळे वाहू लागले. ते म्हणाले, “हो ही तुझी प्रार्थना मी पांडुरंगापर्यंत नक्की पोहोचवेन आणि मी सुद्धा तुझ्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करेन.. “
राम कृष्ण हरी म्हणून त्याला हात जोडीत तो माणूस पुढे निघाला… डोळे भरून वाहत होते… पांडुरंगाच्या वारीत पुढल्या जन्मी येण्याची ओढ असलेला तो पाय नसलेला तरुण पोरगा त्यांच्या नजरेसमोरून हालत नव्हता आणि मग त्यांनी आपल्या दोन्ही पायावरून हात फिरवला दोन्ही हात जोडले आणि ते म्हणाले, “भगवंता केवढी असीम कृपा आहे तुझी आमच्यावर की आम्हाला तू धड धाकट शरीर दिले आहे. यासाठी तुझे रोज रोज आभार मानायला हवेत. यापेक्षा खरोखर वेगळे काही मागणीच असता कामा नये.. आता या शरीरात दुसऱ्याच्या वेदना जाणणारे मन दे इतकेच मी मागेन”….
वाहणारे डोळे त्यांनी पुसले आणि तो पुढे चालू लागला…!
राम कृष्ण हरी!!!!!
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






