श्री मंगेश मधुकर
☆ पाऊस आख्यान… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
जुलै महिना म्हणजे पाऊस, पाऊस आणि पाऊस तरी यंदाचा पहिला आठवडा कोरडा गेला म्हणूनच रेनकोट न्यायचा कंटाळा केला. छत्रीसुद्धा घेतली नाही. नेमकं त्याच दिवशी वरुणराजा अचानक प्रकट झाला. ऑफिसमधून निघालो तेव्हा जोर नव्हता पण थोड्याच वेळात मुसळधार सुरू झाला. गाडी लावून आडोशाला उभा राहिलो. तिथं एक वयस्कर काका पावसाचे थेंब हातावर झेलत गुणगुणत होते. पावसाचा जोर वाढलेला. काका छान मूडमध्ये तर मी वैतागलेला. एकमेकांकडे पाहत औपचारिक हसलो. काहीक्षण असेच शांततेत गेले.
“मस्त पाऊस पडतोय ना” माझ्याकडं पाहत काका म्हणाले.
“हो ना. दुपारपर्यंत कोरडं होतं आणि आता बघा. ”
“पाऊससुद्धा माणसांसारखाच लहरी झालाय. ”
“खरंय! ! ”
“माणसांच्या संगतीनं पाऊस बिघडला की पावसाच्या नादानं माणसं हे समजत नाही”काका.
“निसर्ग अजूनही तसचं भरभरून देतोय. माणसं मात्र बदलली. ”
“मला पाऊस आवडतो. तुम्हांला? ”काकांनी विचारलं पण चांगलं मत नसल्यानं गप्प बसलो.
“उत्तर दिलं नाही म्हणजे पावसाशी वाकडं दिसतेय. आम्हां गावाकडच्यांना पावसाचं फार कौतुक. तिकडच्या पावसाची बातच न्यारी. तो पाऊसच वेगळा. ” काका उत्साहानं म्हणाले.
“ओ काहीही काय! ! माणसांची झालीय तेवढी बास. निसर्गाची वाटणी नको. गावाकडला, शहरी असं काही नसतं. पाऊस हा एकच. ”
काका गप्पांच्या मूडमध्ये तर मला कधी एकदा पाऊस थांबतोय आणि घरी पोचतो असं झालेलं.
“पाऊस एकच असला तरी प्रतिसाद वेगळा असतो. आता हेच बघा ना. पाऊस आला की गावाकडं आनंदीआनंद. नाचणं, भिजणं आणि इथं….. ”
“शहरात पावसाळा म्हणजे डोक्याला ताप. कधीही, कसाही पाऊस येतो आणि पार वाट लावतो. ”
“चालायचचं. काही दिवस सहन करायचं. एवढा काय बाऊ करायचा. पावसाची मजा तुम्हां लोकांना लुटता येत नाही हेच खरं! ! ”
“मजा, आनंद यागोष्टी बोलायला ठीक. पूर्वी पाऊस म्हटलं की भिजणं, भजी आणि चहा आठवायचं. आता डोळ्यासमोर येतं ते ट्राफिक जॅम, खड्डे आणि तुंबलेलं पाणी. सुखरूप घरी पोहचू की नाही याची चिंता सतावत असते. ”
“त्यात पावसाची चूक नाही. तो अजूनही तसाच पडतो. जे काही प्रॉब्लेम्स आहेत माणसांनीच केलेत. शहरं बकाल अन पब्लिक बेहाल”
“100% करेक्ट. म्हणूनच डोकं शांत नसतं. काही ना काही चालूच. ”
“टेंशन्स, काळज्या यागोष्टी आयुष्यभर असणार. परिस्थिती आणि माणसांच्या वागण्याचा त्रास करून घ्यायचा नाही. पाऊस कसं सगळं धुवून स्वच्छ करतो तसंच आपणही करायचं. पाण्यासारखं वाहतं रहायचं. ”
“पाऊस फारच लाडका दिसतोय. ”
“हो. पाऊस म्हणजे रोमान्स. भुरभुरत्या रेशमी केसांची सुंदर तरुणी… ”काकांनी डोळे मिचकावले.
“ते पूर्वी होतं. आताचा पाऊस रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भूतांसारखा आक्राळ विक्राळ असतो. ”
“पाऊस म्हणजे रिमझिम बरसती धारा. निसर्गाची मुक्त उधळण. जगण्याशी जोडला असल्यानं फार महत्वाचा. त्याच्या येण्यानं काळी आई तृप्त होते मग पेरणीची लगबग. आहाहा! ! ” काका आठवणीत हरवले.
“पाऊस म्हणजे रस्त्यावरचे तलाव, बंद पडलेल्या गाड्या. जीव मुठीत घेऊन जाणारे लोक. ”
“पाऊस म्हणजे नयनरम्य हिरवाई, मन प्रफुल्लित करणारं धुंद वातावरण”काका स्वप्नांच्या दुनियेत आणि मी वास्तवात.
“पाऊस अनुभवायचा तर गावाकडच्या मोकळ्याढाकळ्या वातावरणातच. ”
“पण शहरात परिस्थिती उलटी. पावसाळा म्हणजे डोकेदुखी. गेल्या काही वर्षांपासून तर नको इतका पडतोय. पूर येणं. माणसं, घर वाहून जाणं हे ठरलेलं. तात्पुरतं वाईट वाटतं. भावनांचे कड वाहतात, पेपरला बातम्या, फोटो, चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज, मान्यवरांच्या भेटीगाठी, कोरडी आश्वासानं. दोन दिवसांचा खेळ. पुढं काहीच होत नाही. दरवर्षीचे तेच रडगाणं. ”मी शहरवासीयांची व्यथा मांडली.
“पाऊस म्हणजे खळाळतं पाणी, धबधबे…. ”काकांचं पाऊस आख्यान सुरूच.
“पाऊस म्हणजे गर्दी, तुंबलेलं पाणी, लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी, चिडलेले,
वैतागलेले, असहाय्य गाडीवाले. आता पावसात माणसं, गाड्या वाहत असल्यानं कागदाच्या नावेचं कौतुक राहिलं नाही. ”
“एकूणच वैतागलेले दिसता”
“कशावरून? ? ”
“अंदाज. तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत. स्वतःला थोडं मोकळं सोडा. नेहमीच अडजेस्टमेंट करायला पाहिजे असं नाही. ”
“गावाविषयी फारच प्रेम दिसतयं. ”मी विषय बदलला.
“असणारच ना. सगळा जन्म तिथंच गेला. पोरं शहरात आली म्हणून इकडं यावं लागलं तरी गावाला येणं जाणं आहेच. पाऊस सुरू झालाय आता मुक्काम तिकडचं हलवायचा. ”
“नशीबवान आहात. आम्हांला हा पर्याय नाही. फारतर एक-दोन दिवसाची पावसाळी सहल. बाकी तेच ते. ”
“मुद्दाम पावसात शेवटचं कधी भिजला होता. ”काकांचा अनपेक्षित प्रश्न.
“आठवत नाही. फार वर्ष झाली असतील. असं का विचारलं. ”
“चला भिजू या. ”
“काहीही काय! ! नको. “
“आहे तो क्षण मजा करा. उद्याचं कोणाला माहीत? कसलाही विचार न करता भिजण्याचा आनंद घ्या. छान वाटेल. मोबाइल करता तसं स्वतःला रिचार्ज करा ”काकांच्या बोलण्यावर मी विचारात पडलो.
“अहो, एवढा कसला विचार करताय. चला” काकांनी हाताला धरून मला पावसात नेलं. गार गार थेंबांनी अंग शहारलं पण मस्त वाटत होतं. खूप खूप दिवसांनी हा निर्भेळ आनंद अनुभवत होतो. फार भन्नाट फिलिंग. रुटीनच्या चक्रात साध्या गोष्टी करून मिळणारा आनंद घेण्याचं विसरूनच गेलो. उद्यासाठी आज काळजीत घालवतो. पावसाळा आला की माझी कुरकुर सुरू व्हायची पण आजच्या अनुभवानं दृष्टिकोण बदलला. चक्क भिजण्याचा आनंद घेत होतो. सोबतचे काका वय विसरून गाणं म्हणत भिजत होते. नकळत मी सुद्धा गुणगुणायला लागलो “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन…… भिगे आज इस मौंसम में…”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






