सौ. अंजोर चाफेकर
☆ “परदेशातील भारतीय स्त्रियांची तारेवरची कसरत…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
स्त्री भारतातील असो वा परदेशातील, आजच्या करिअर करणा-या स्त्रीला खूप आव्हाने पेलावी लागतात.
परदेशातील माझ्या परिचयातील, नात्यातील स्त्रियांना मी जवळून पाहिलं, त्यांची जीवनशैली बघितली आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटलं….. त्यांची सजगता,त्यांचा कामसूपणा, झटपटपणा, हुषारी, आनंदी वृत्ती, कुटुंबासाठी झटण्याची तळमळ, जीवनाला वेग असला तरी जपलेली संस्कृती, अतिथ्यशीलता, स्वतःची करिअर सांभाळत मुलांच्या विकासाकडे जागरूकतेने लक्ष ठेवणे, ही सर्व तारेवरची कसरत त्या किती सक्षमतेने आणि आनंदाने करतात.
वाढत्या महागाईमुळे व उच्च शिक्षण घेतल्यावर स्त्रीला तिचं करिअर करणे, नोकरी करणे हे जरूरीचे आहे. भारतातील मुली लग्न करून जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांच्याकडे भारतातील पदवी असते. परंतु त्या पदवीच्या दाखल्यावरून नोकरी मिळत नाही. तिथला एखादा कोर्स किंवा तिथली पदवी (डिग्री) ही घ्यावी लागते. म्हणजे सुखी संसाराची स्वप्ने बघताना हातात पुस्तके घेऊन रात्री जागावे लागते.मग आपोआप मूल होणे ही लांबणीवर टाकावे लागते. त्याचाही मानसिक ताण होतोच. शिवाय उशीरा मातृत्व आले की गरोदरपण आणि प्रसवतानाही त्रास होतो.
अमिता एम्.बी.बी.एस् होऊन अमेरिकेला गेली. तिला एक मुलगी होती. नवरा शिकत होता. त्याच्या असिस्टंटशिपच्या पैशातून घराचे भाडे, मुलीचा खर्च. तिला एम एल ई च्या तीन परीक्षा दिल्याशिवाय रेसिडन्सीही करता येत नव्हती. ती दिवसभर काम करायची. मुलीला सांभाळायची. घरकामाला नोकर नसल्यामुळे स्वयंपाक, धुणीभांडी, कचरा काढणे, फर्निचर पुसणे वगैरे सर्व आटपून रात्री जागून अभ्यास करायची.त्यावेळी वालमार्ट मधून स्वतःसाठी दहा डाॅलरचे लिपस्टिक सुद्धा खरेदी करू की नको असा विचार करायची… बरं ,अमेरिकेत साधे दूध आणायचे झाले तरी गाडी घेऊन जावे लागते. (भारतात दूधवाला घरी दूध आणून देतो) रिक्शा, टॅक्सीही नाही. म्हणजे गाडी विकत घ्यावी लागते. आणि शिकण्याचा परवानाही लागतो. म्हणजे आणखी खर्च.
बरं, भारतात ड्रायव्हर ठेवता येतो. इथे स्वतःच गाडी चालवायची. म्हणजे नियम माहीत हवेत. रस्ते समजायला हवेत. रस्त्यात कुणाला गाडी थांबवून पत्ता विचारायची सोय नाही.रस्त्याचा मॅप समजला पाहिजे.
माझी मैत्रिण नेहा वयाच्या ४०व्या वर्षी अमेरिकेला गेली. तोपर्यंत तिने कधी गाडी चालवली नव्हती. सुरुवातीला ती इतकी भांबावायची.पार्किंग लाॅटमधे गाडी लावताना तिथे लिहीलेले असते “पुश द कार्ड” तिला प्रथम त्याचा संबंधच समजायचा नाही. प्रत्येक वेळी क्रेडिट कार्ड आत घुसवताना तिला भीती वाटायची, कार्ड बाहेरच आले नाही तर.! (आता भारतातही क्रेडिट कार्ड चा उपयोग सर्रास होतो म्हणा )
ज्योती चार्टर्ड अकाउंटंट आहे. अमेरिकेत गेल्यावर तिला पुन्हा परीक्षा द्याव्या लागल्या.नोकरी मिळेपर्यंत एक वर्षं गेले.त्या काळात ती घरात फक्त गृहिणी. शिवाय नोकरी मिळेल की नाही याचा मानसिक ताण होताच.
मी तिला विचारलं, “तू भारतात हिंदुस्तान पेट्रोलियममधे इतक्या मोठ्या पदावर होतीस. तुझ्या हाताखाली इतकी माणसं काम करायची. आणि तू शिकागोत आल्यावर तुझं आयूष्यच बदलून गेले ग. तू कसं स्वतःला या परिस्थितीत जुळवून घेतलेस.? “
ती म्हणाली, “त्या वेळी माझा नवरा नवीन नोकरीत स्वतःला जुळवून घेत होता.दोन्ही मुली इथल्या शाळेत जायला लागल्या. त्यांचे आजूबाजूचे वातावरण बदलले. त्याही नवीन मित्र मैत्रीणींशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होत्या.मी घरी असल्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या भावना समजू शकले.त्यांना धीर देऊ शकले. “
….. तिचा हा निस्वार्थपणा मला खूप भावला. स्वतःपेक्षा ती तिच्या मुलींचा, नवऱ्याचा विचार प्राधान्याने करत होती.त्यांची या नवीन वातावरणात सामावून घेण्याची धडपड जवळून पहात होती आणि हे सर्व करताना तिची करिअर मात्र मागे पडत होती.
प्रियांकाचे लग्न झाले.नवरा सुटी संपताच अमेरिकेला गेला.परंतु प्रियांकाला व्हिसा मिळाला नाही.
नवी नवरी… खूप रडली. आता नवऱ्याकडे जाता येणार नाही ही भीती. तिच्या सासऱ्यांनी तिला खूप धीर दिला. पुन्हा व्हिसा साठी अर्ज भरला. तिला मुलाखतीसाठी बोलावले तेव्हा तिच्या छातीत धडधड. हातपाय लटपटत होते.कारण दोनदा जर व्हिसा नाकारला गेला तर ३ वर्षं अर्ज भरता येत नाही. परंतु तिला व्हिसा दुसऱ्या वेळी मिळाला. व ती नवऱ्याकडे गेली. तिने बी.एस. सी केले होते. तिथे तिला परत शिकावे लागले. तिने कॉम्प्युटरचा कोर्स केला. इंशुरन्स कंपनीत जाॅब मिळवला. या दरम्यान तिला दोन मुलेही झाली.ती गाडी घेऊन नोकरीच्या पहिल्या दिवशी डाऊनटाऊन मधे गेली. पार्किंग चार्ज २५डाॅलर्स. तिने विचार केला मी जर रोज गाडी घेऊन गेले तर माझा सर्व पगार पार्किंग मधेच खर्च होईल. मग गाडी जवळच्या स्टेशनात पार्क करायची व ट्रेनने जायचे.कारण तेव्हा गाडी कुठेही उभी केली तर ५०डाॅलर दंड भरावा लागणार.
…… प्रियांका सकाळी ५वाजता उठून डबे बनवायची. मुलांना डे केअरला सोडून ऑफीस गाठायची.
परत येताना मुलांना डान्स क्लास, बास्केट बाॅल क्लास ला न्यायचे, आणायचे. त्यांचा अभ्यास घ्यायचा.
एकीकडे कुकर लावायचा. मग कपडे बदलायचे आणि पोळ्या करायच्या. हाताशी मदतीला कुणी कामवाली नाही.मागचं आवरायचंही आपणच. नवराही मदत करायचा. जिभेचे चोचले पुरवायला वेळ कुठे?
तरी नशीब, इंडियन स्टोअर मधे रेडीमेड पुरणपोळ्या, अळूवड्या मिळतात. तरी प्रियांका लाडू,श्रीखंड मोदक सगळं स्वतः बनवते. केक बनवते. मायक्रोवेव, ओव्हन आणि फ्रीज हे स्त्रीचे जवळचे मित्र.
इथल्या सर्वच स्त्रिया, भारतीय पदार्थांबरोबर मेक्सिकन,थाय, इटालियन वगैरे जगातले विविध प्रकार आवडीने बनवतात.पाहुण्यांना आग्रहाने खाऊ घालतात. इथले पाहुणेही समंजस. स्वतःचे ताट डिश वाॅशर मधे स्वतः ठेवतात. नवरा बायकोमधे इतके सामंजस्य असते. प्रत्येक कामात नवऱ्याची मदत असते.
नवऱ्याचा सहकार हे तिचे बलस्थान आहे. कारण स्वीगी, झोमॅटो दिमतीला नाहीत.
माझ्या दोन्ही मुली व माझ्या बहिणीची मुलगी, घरातले सर्व आटपून,स्वतःची करिअर सांभाळत, ऑफिसच्या कामाचा प्रचंड ताण सांभाळत भारतीय कलेचा वारसा जपतात. एक भरतनाट्यम् मधे निपुण आहे.दुसरी ओडिसी नृत्यप्रकारात पारंगत आहे. तिसरी कथकमधे प्रवीण आहे. शिवाय हिंदुस्तानी रागसंगीतही त्या शिकत आहेत.
मला या स्त्रियांचा अभिमान वाटतो. त्यांचे भावनिक ताण हलके करायला आपण जवळ नसतो. त्यामुळे त्यांना खूप कणखर व्हावे लागते. त्यांचा कामसुपणा, त्यांची जिद्द, त्यांची मेहनत … यासाठी त्यांना प्रणाम.
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





